scorecardresearch

महाराजांच्या शिलेदारांची वीरगाथा ‘पावनखिंड’

‘पावनखिंड’ चित्रपट हा नुकताच प्रदर्शित झाला आहे. लेखक – दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी संकल्पित केलेल्या आठ चित्रपटांपैंकी हा तिसरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

‘पावनखिंड’ चित्रपट हा नुकताच प्रदर्शित झाला आहे. लेखक – दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी संकल्पित केलेल्या आठ चित्रपटांपैंकी हा तिसरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पावनखिंड या घटनेचा कसून अभ्यास, त्या लढाईची नाटय़मयता, महारांजावर जीव ओवाळून टाकणारे वीर शिलेदार मावळे आणि त्यांची यशोगाथा सांगणारा ‘पावनखिंड’ हा चित्रपट साकारतानाचा अनुभव, चित्रीकरणासाठी घेतलेली मेहनत याविषयी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्यासह चित्रपटातील कलाकारांनीही मनमोकळय़ा गप्पा मारल्या.

कुठल्याही कलाकारासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करायला मिळणं हेच खूप मोठं भाग्य आहे, असं मत अभिनेता, लेखक चिन्मय मांडलेकर याने व्यक्त केलं. ‘र्फजद’, ‘फत्तेशिकस्त’ आणि आता ‘पावनखिंड’ या भव्यदिव्य चित्रपटांतून महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका चिन्मयने साकारली आहे, ज्यासाठी त्याचे प्रेक्षक, समीक्षकांकडून सर्वत्र कौतुकही झाले आहे आणि आता ‘पावनखिंड’च्या निमित्ताने तो पुन्हा एकदा शिवरायांच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आला आहे. ‘‘महाराजांची ती मूर्ती माझ्यात दिग्पाल लांजेकर यांनी पाहणं आणि त्यांची भूमिका साकारण्यासाठीची संधी पुन्हा एकदा मला देणं हे माझ्यासाठी खूपच भाग्याचं आहे.’’, अशी भावना चिन्मयने व्यक्त केली ‘पावनखिंड’ हा जरी युद्धपट असला तरी तो एक भावनाप्रधान चित्रपटही आहे, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे भावुक होणे म्हणजे काय?, हे या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळेल, असं चिन्मय पुढे सांगतो.

 पावनखिंडची लढाई आपल्याला पाठय़पुस्तकातून ज्ञात आहेच, परंतु त्यातही अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती नाहीत आणि दिग्पालची विशेष खासियत ही आहे की तो फक्त लिखित कथा-कादंबऱ्यांच्या आधारे चित्रपटनिर्मिती करत नाही, तर तो त्याच्या पुढे जाऊन इतिहासाचा शोध घेतो. ‘पावनखिंड’च्या निमित्ताने त्याने जवळपास खंडीभर त्या काळातले संदर्भ असलेली हस्तलिखितं शोधून काढली ज्याद्वारे आज असे अनेक पराक्रम गाजवणाऱ्या वीरांची नावं समोर आली आहेत. पावनखिंडची लढाई म्हटलं म्हणजे आपल्याला बाजीप्रभू देशपांडे यांचा पराक्रम आठवल्याशिवाय राहत नाही, परंतु फुलाजीप्रभू देशपांडे यांच्याबद्दल फारसे कोणास काही ठाऊक नव्हते, त्यातून ६०० बांदलसेनेमधील रायाजी बांदल, कोयाजी बांदल ही सर्व नावे विस्मृतीत गेली होती ती या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा जिवंत झाली आहेत. शिवा काशीद यांच्याबद्दलही फार काही संदर्भ नाहीत, पण त्यांचे समर्पण या लढाईत किती महत्त्वाचे होते हेही या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर येणार आहे. त्यामुळे या सर्व बाबी लक्षात घेता हा चित्रपट मला खूप जास्त महत्त्वाचा वाटतो, अशी भूमिकाही चिन्मयने मांडली. आज ऐतिहासिक चित्रपटांची धाटणी दिग्पाल लांजेकर याने पुन्हा एकदा यशस्वीरीत्या जिवंत केली आहे, असे सांगत त्याने यावेळी दिग्दर्शकाचे कौतुकही केले. ‘पावनखिंड’मधून कधीही समोर न आलेले असे भावनिक क्षण प्रेक्षकांना अनुभवायला मिळत आहेत त्यातही छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्यातील नातेही ‘पावनखिंड’मधून समोर आले आहे. बाजीप्रभू देशपांडे हे मुळात महाराजांपेक्षा वयाने मोठे होते तेव्हा चित्रपटाच्या शेवटी वेळप्रसंगी ते महाराजांच्या सुरक्षिततेपायी महाराजांना आज्ञाही करतात, असेही चिन्मय मांडलेकर याने सांगितले.

‘‘सुप्रसिद्ध लेखक आणि अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचे आजोबा गो.नी.दांडेकर यांच्या ‘कादंबरीमय शिवकाल’ या कथारूपी पुस्तकातून मला अधिक प्रेरणा मिळाली. ज्यातून छत्रपती शिवाजी महाराज हे नायक होतेच, पण त्यावेळच्या परिस्थितीचा वेध घेता त्यांनी जे काही केले ते अतुलनीय ठरले. त्यामुळे त्यांचा कालखंड हा या पुस्तकात मध्यवर्ती आहे, त्यामुळे त्याचे नाव ‘शिवकाल’ आहे. चित्रपटाची मांडणी करताना एक प्रकारे हा शिवकाळ हा कालखंडच नायक आहे, अशा पद्धतीने रचना केली आहे. मुळात अप्पा म्हणजे गो. नी. दांडेकरांचा माझ्यावर प्रचंड प्रभाव आहे. मी त्यांच्या लेखनाचा प्रामाणिक भक्त आहे म्हणून तो आत्मा मला या चित्रपटातून रंगवण्याचे बळ मिळाले’’, असे मत लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी मांडले. ‘‘याअगोदरच्या चित्रपटात कालखंड जरी सारखा असला तरी प्रत्येक चित्रपटातील कथा ही वेगळी आहे. ‘पावनखिंड’बद्दल म्हणाल तर अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांची सुरक्षा हा महत्त्वाचा भाग आहे कारण शिवरायांची सुरक्षा म्हणजेच स्वराज्याची सुरक्षा ही दूरदृष्टी शिवरायांच्या मावळय़ांची होती. हे सर्व एका हळव्या भावनिक पदरासह या चित्रपटातून समोर आणण्याचा मी प्रयत्न केला आहे. आम्ही या चित्रपटाची संहिता रायगडावर शिवरायांच्या पायाशी ठेवून तिचे पूजन केले. तिथपासून कलाकारांना प्रशिक्षित करण्याची प्रक्रिया सुरू झाली. ज्यात त्यांच्या शस्त्रांच्या प्रशिक्षणापासून ते शारिरिक प्रशिक्षणाचा समावेश होता’’, अशी माहिती पुढे दिग्पाल यांनी दिली. ‘‘पावनखिंडच्या लढाईमागे जो कार्यकारणभाव निर्माण झाला तो राजकीय परिस्थितीमुळे झाला. अफजलखानाच्या वधानंतर महाराजांनी आदिलशाही भागात मुसंडी मारून तो ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आणि हे पाहून चिडलेला सिद्दी जोहर पुढे आला. त्यात बिजापूर येथील बडी बेगम साहेबाँ या स्त्री व्यक्तिरेखेकडे सल्तनत होती, जिची प्रचंड दहशत होती. त्या बाईने सिद्दी जोहरला कसं तेथे पाठवलं त्यानंतर कसा सिद्दी जोहर फसला ही राजकीय परिस्थिती समोर मांडण्याचाही प्रयत्न यात केला आहे’’, असंही त्यांनी पुढे सांगितलं.   

‘‘मी एका मुलाखतीत माझ्या ड्रीम रोलबद्दल सांगताना शिवरायांच्या वीर शिलेदारांपैकी असलेले बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका करायला आवडेल अशी इच्छा व्यक्त केली होती. माझी ही मुलाखत दिग्पाल यांनी पाहिली आणि मला भूमिकेसाठी विचारले. अर्थात, माझे पंचावन्न वय नसल्याने बाजीप्रभूंचे लढाईच्या वेळी जे वय असेल त्या वयानुसार तो राग, ती परिपक्वता आणि शहाणपणा आणण्यासाठी त्यांचा कसून अभ्यास करावा लागला आणि हे सर्व मी त्या व्यक्तिरेखेच्या देहबोलीतून पडद्यावर साकारले आहे. त्यातून विविध छटा या पात्राला असल्याने पती, मार्गदर्शक आणि एक वीर म्हणून ते भाव समोर आणले आहेत. मी त्यांच्यासारखी शरीरयष्टी आणण्यासाठी शंभरच्या वर वजन वाढवले. त्यात स्नायूंचे वजन हवे असल्याने पाव किलो रोज बासुंदी खाण्याची सवय सुरू केली. लढाईच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण करताना मला पहिल्यांदाच जाणवले की आम्ही तिथे एकटे नाही आहोत तर त्या तीनशे वीर शिलेदारांची छाया तिथे आहे आणि या जाणिवेनंतर मात्र मी तीन दिवस फारसा कोणाशी बोललोही नाही’’, अशी आठवण बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका करणाऱ्या अभिनेते अजय पुरकर यांनी सांगितली.

‘‘इतिहासातही नवनवे शोध  लागत असतात. साठ-सत्तर वर्षांपूर्वी जो इतिहास चित्रपटातून आला तोच आजही प्रेक्षकांसमोर येईल, असे नाही. दुसरी गोष्ट म्हणजे गेल्या तीन ते चार दशकांत चित्रपटाचे तंत्रही प्रचंड बदलले आहे. त्यातून या दोन्ही गोष्टी आज एकमेकांशी संलग्न असल्याने ऐतिहासिक चित्रपटांचे महत्त्व आज वाढले आहे.’’

– चिन्मय मांडलेकर, अभिनेता – लेखक

‘‘आपल्या संस्कृतीत देवांची स्तुती करण्यासाठी अष्टकं असतात, उदाहरणार्थ भवानी अष्टक तसेच पांडुरंग अष्टक लिहिले गेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची स्तुती करण्यासाठी हे श्रीशिवराजअष्टक आहे. महाराजांच्या चरित्रातील स्फूर्तिदायक वीरगाथा ज्या आजही आपल्याला प्रेरणा देतील या भावनेने या आठ घटना चित्रपटाच्या माध्यमातून मी त्या विस्तारपूर्ण रचनेने शक्य तेवढय़ा उपलब्ध साहित्यातून आणण्याचा प्रयत्न करतो आहे.’’

– दिग्पाल लांजेकर, लेखक-दिग्दर्शक

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharaj shiledar epic pavankhind film battle war history ysh

ताज्या बातम्या