Ajit Pawar Viral Video : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने अख्ख्या महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. गेल्या बुधवारी (२८ जानेवारी) अजित पवार हे सभांसाठी मुंबईहून बारामतीला जात होते. मात्र, बारामती विमानतळाजवळ आल्यानंतर त्यांचं विमान क्रॅश झालं आणि स्फोट होऊन आग लागली आणि यात अजित पवार यांचं निधन झालं.
अजित पवार यांच्या निधनानंतर अवघा महाराष्ट्र हळहळला. राजकारण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातल्या कलाकारांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. निधनानंतर त्यांचे अनेक जुने व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच ‘चला हवा येऊ द्या’मधील अभिषेक बारहाते-पाटील या अभिनेत्याने अजित पवारांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे.
अभिनेत्याने ‘झी गौरव चित्र गौरव पुरस्कार २०२४’ या सोहळ्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये अवधूत गुप्ते अजित पवार यांना विचारतो, “अजित पवार नावाचा बायोपिक आला, तर त्यात कोणत्या अभिनेत्याने तुमची भूमिका साकारावी, असं वाटतं?” यावर क्षणाचाही विलंब न करता अजित पवार यांनी “डॉक्टरांनी करावं असं वाटतं” हे उत्तर दिलं. डॉक्टर म्हणजे अर्थात लेखक-दिग्दर्शक डॉ. निलेश साबळे. अजित पवारांचं उत्तर ऐकून निलेश साबळेदेखील आश्चर्यचकित झाल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
अजित पवार यांनी दिलेल्या उत्तरावर पुढे निलेश साबळे म्हणतो, “मी किती चांगली नक्कल करायचो हे माहीत नाही पण, हे लोकांना आवडायचं. मला माहित नव्हतं की, दादा स्वतः हे बघतात. पण, आता मला कळलं आहे. त्यामुळे आता जरा जास्तच जपून करायला पाहिजे”.
पुढे अजित पवार म्हणाले, “मी पण कधीकधी ते काय बोलतात ते बघत असतो. आम्ही असं आरशासमोर प्रॅक्टिस करत बोलत नाही. आम्ही एकदा माईक हातात आल्यानंतर जे विचार पटतात त्या पद्धतीने बोलत असतो. परंतु, यांनी (निलेश साबळे) बऱ्याचदा मिमिक्री करताना ‘या ठिकाणी, या ठिकाणी’ म्हटलं होतं. मी तेव्हापासून ठरवलं की, हा शब्द जेवढा कमीत कमी वेळा वापरता येईल. त्यानंतरच्या काळात हा शब्द अजित पवारने कमी केला आहे. त्यामुळे डॉक्टर तुम्ही अधूनमधून माझी अशी नक्कल करत चला आणि मग त्यातून मलाही कळेल, आपलं काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. त्याप्रमाणे मला दुरुस्ती करता येईल”.
अजित पवारांनी स्वत:च्या बायोपिकबद्दल केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ
दरम्यान, ‘चला हवा येऊ द्या’मध्ये डॉ. निलेश साबळेने अनेकदा अजित पवार यांची मिमिक्री केली आहे. त्यामुळे त्याच्यापेक्षा आपली मिमिक्री आणखी जास्त चांगलं कुणीच करू शकत नाही, असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं होतं.

