मराठीत सध्या आशय-विषयाच्या बाबतीत किती वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत, याची प्रचीती गेल्या आठवड्यात झालेल्या तीन मोठ्या चित्रपटांच्या ट्रेलर अनावरण सोहळ्याच्या निमित्ताने आली. महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर भाष्य करणारा ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’, दोन भावांमधल्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘बंधू’ आणि आजच्या काळातील श्रद्धा, अंधश्रद्धा, मानवी मूल्ये, समाजातील व परंपरेतील काळानुरूप बदलणारी स्थित्यंतरे, वारकरी आणि त्यांचा निस्सीम भक्तिभाव या सगळ्यांचा वेध घेणारा ‘कीर्तन’ अशा तीन मराठी चित्रपटांची पहिली झलक थाटामाटात झालेल्या सोहळ्यांमध्ये प्रदर्शित करण्यात आली.
वर्तमान घटनांवरून प्रेरित चित्रपटांची संख्या मराठीत तुलनेने कमी आहे. त्यामुळे ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली तेव्हापासूनच प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दल उत्सुकता लागून राहिली होती. स्वरूप सावंत दिग्दर्शित या चित्रपटात भोंदूबाबा अशोक खरात यांची भूमिका कोण साकारणार? हा प्रश्न होता. चित्रपटाच्या ट्रेलरमधून या प्रश्नाचे उत्तर रसिकांना मिळाले आहे. प्रसिद्ध अभिनेते मनोज जोशी यांनी अशोक खरात यांची भूमिका केली असून अभिनेता सुबोध भावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यांच्या जोडीला अभिनेत्री दीपाली सय्यद महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. आनंदी पिक्चर्स अमरावती आणि सचिन रोडे पाटील प्रस्तुत ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या मराठी चित्रपटाची निर्मिती मातोश्री एन्टरटेन्मेंट वर्ल्डच्या बॅनरखाली करण्यात आली आहे. देवेंद्र भट, सूर्यकांत भुंडे आणि प्रशांत कदमपुरे यांनी या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवादांची जबाबदारी संजय नवगिरे यांनी समर्थपणे पेलली असून संकल्पना सागरकुमार एस. जैन यांची आहे. उदय टिकेकर, अक्षय टंकसाळे, माधुरी पवार, सुरेश विश्वकर्मा, भारत गणेशपुरे, अनिल नगरकर, मोनिका, शिवराज वालवेकर, सिद्धेश्वर झाडबुक्के, श्रेया कुलकर्णी, राहुल बेलापूरकर आदी कलाकार या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. एकीकडे श्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेला खेळखंडोबा प्रेक्षकांसमोर येणार आहे, तर दुसरीकडे पुन्हा एकदा वारकरी परंपरा आणि त्यांची विठ्ठलावरची निस्सीम भक्ती, संकटकाळात देवावरचा उडणारा विश्वास आणि भक्तांची कसोटी यांची कथा सांगणाऱ्या ‘कीर्तन’ या चित्रपटाचा ट्रेलर अनावरण सोहळा सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या चित्रपटाची निर्मिती कॉर्पोरेट क्षेत्रातील यशस्वी कारकीर्द सोडून देऊन समर्पित कीर्तनकार होण्याचा निर्णय घेणाऱ्या डॉ. चेतनानंद महाराज यांची आहे. ‘बोलतो तेच करतो’ असा विश्वास देणारी व्यक्तिमत्त्व सध्याच्या काळात दुर्मीळ झाली आहेत. मात्र, डॉ. चेतनानंद महाराज पुणेकर हे त्या दुर्मीळ व्यक्तिमत्त्वांपैकी एक असून त्यांनी त्यांच्या संकल्पित जीवनकार्यातून व कृतीतून हे दाखवून दिले आहे. सध्या स्पर्धेच्या युगात समाजमाध्यमांसह विविध माध्यमांतून केवळ तणाव निर्माण होत असल्याने ‘कीर्तन’ हा चित्रपट समाजाच्या दुःखाचे निवारण करून त्यांचे प्रबोधन करून योग्य मार्ग दाखवण्यात महत्त्वाचे योगदान देऊ शकेल, असा विश्वास सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी व्यक्त केला. अतुल जगदाळे दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेते उपेंद्र लिमये मध्यवर्ती भूमिकेत असून संदीप पाठक, प्राजक्ता हनमघर, आर्या घारे, तेजस बर्वे, सुरेश विश्वकर्मा, बालकलाकार गोरज देखणे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. गीतकार गुरू ठाकूर यांच्या गीतांना संगीतकार विजय नारायण गवंडे यांनी स्वरसाज चढवला आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे.
तर दिवाळीतील सुट्ट्यांचा मुहूर्त साधून २० नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘बंधू’ या चित्रपटाच्या ट्रेलरचेही एका दिमाखदार सोहळ्यात अनावरण करण्यात आले. या चित्रपटात अभिनेता उपेंद्र लिमये आणि अभिनेता जितेंद्र जोशी हे दोघे सख्ख्या भावांच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची प्रस्तुती हिंदीतील प्रसिद्ध अभिनेता रजत बेदी याने केली असून दिग्दर्शन नितीन सुपेकर यांचे आहे. या चित्रपटाची निर्मिती प्रणव देसाई, जुही देसाई आणि कुलदीप सुनील ओझा यांनी केली आहे. चित्रपटाचे लेखन, संवाद आणि दिग्दर्शन नितीन सिंधुविजय सुपेकर यांनी केले आहे. मिताली जगताप आणि मृण्मयी देशपांडे दिसणार आहेत. यांच्यासह
रेणुका दफ्तरदार, स्मिता तांबे, श्रीकांत यादव, विठ्ठल काळे, यशपाल सरणात, ज्ञानरत्न अहिवळे, चैतन्य सोलणकर, श्रीपाद पानसे, बालकलाकार शौर्य पाटील, देवा गाडेकर, वर्षा अजित, प्रशांत जाधव, अनिल कांबळे आणि प्रणाली भालेराव हे कलाकार चित्रपटात दिसणार आहेत.
‘चांगल्या कथा भाषेच्या सीमा ओलांडून प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचतात. ‘बंधू’ची कथा अशीच मनाला स्पर्श करणारी आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी सिनेमाशी प्रस्तुतकर्ता म्हणून जोडले जाणं माझ्यासाठी एक खास अनुभव आहे. उपेंद्र लिमये, जितेंद्र जोशी आणि इतर कलाकारांनी आपल्या अभिनयातून या नात्याचं भावविश्व जिवंत केलं आहे. प्रेक्षकांनीही या चित्रपटाला आपलंसं करावं’, अशी अपेक्षा रजत बेदी यांनी व्यक्त केली.
या चित्रपटातील गीतांना गुरू ठाकूर आणि वैभव देशमुख यांनी शब्दबद्ध केले असून, विजय नारायण गवंडे यांच्या संगीताने ती सजली आहेत.
