बंगाली ज्ञानपीठविजेत्या लेखिका महाश्वेतादेवी माहीत नाहीत असा साहित्यप्रेमी विरळाच. त्यांच्या कथा-कादंबर्यांवर आजवर अनेक चित्रपट आलेत… ‘हजार चौराशी की मां’, ‘रुदाली’, ‘माती माय’ हे चित्रपट तरी नक्कीच अनेकांनी पाहिले असतील. महाश्वेतादेवी या आदिवासी, तळागाळातले कष्टकरी यांचा बुलंद आवाज होत्या. त्यांनी पीडित, शोषितांचं जगणं आपल्या लेखनातून जगासमोर मांडलं. इतकंच नव्हे तर त्या केवळ हस्तीदंती लेखनवीर नव्हत्या, तर प्रत्यक्ष कृतीशीलतेतही त्या आघाडीवर होत्या. अनेक जनआंदोलनांत त्यांनी सक्रीय सहभाग घेतला. आपलं जगणं आणि आपलं लेखन यांची फारकत होऊ न देणार्या महाश्वेतादेवींचं हे जन्मशताब्दी वर्ष. त्यानिमित्तानं सावित्री मेधातुल लिखित आणि मंगेश सातपुते दिग्दर्शित ‘महोगाथा’ हे नाटक कालीबिल्ली प्रॉडक्शनने रंगभूमीवर आणलं आहे. महाश्वेतादेवींच्या साहित्यातील तीन पात्रं- द्रौपदी, बुधन आणि मोयना- यांना एकत्र आणून हा रंगाविष्कार घडवण्यात आला आहे.
या तिघांना एका कथासूत्रात बांधण्यासाठी पुराणातील बळी राजाच्या गोष्टीचा आधार घेण्यात आला आहे. असुर कुळात जन्माला येऊनही बौद्धिकतेची कास धरणारा, पृथ्वीसह तिन्ही लोकांत राज्य करू इच्छिणार्या बळीच्या या कर्तृत्वानं वर्णविद्वेषी देवलोकांत खळबळ माजते. आणि मग बळीला नेस्तनाबूत करण्यासाठी एक कपट डाव टाकला जातो आणि त्याला पाताळात गाडले जाते. त्याचा ज्ञानाधिकार काढून घेतला जातो. त्याला अस्पृश्याचं जिणं जगायला लावलं जातं. तेच आजचे बळीचे वंशज म्हणजे पददलित, शूद्र होत. त्यांच्या जगण्याचा, त्यांच्या संघर्षाचा आरसा महाश्वेतादेवींनी आपल्या साहित्यातून आपल्यासमोर धरला आहे. त्यांच्या प्रातिनिधिक कथा द्रौपदी, बुधन आणि मोयनाच्या जगण्यातून आपल्याला भेटतात. या तिघांच्या कथा जरी वेगवेगळ्या असल्या तरी त्या इथे एका सूत्रात गुंफण्यात आल्या आहेत.
बुधन… एक भूमीहीन शेतकरी. त्याला भूदानातून मिळालेल्या जमिनीचा एक छोटा तुकडा दिला जातो. तोही नापीक, खडकाळ, पडीक. पण बुधन अक्कलहुशारीनं त्यावर अनुदान मिळवतो आणि ते आपल्या उदरनिर्वाहासाठी वापरतो. त्यातून पडीक जमीन कसायचं ठरवतो. पण जमीनदार लछमनसिंहला ते आवडत नाही. तो बुधनचं उभं पीक नष्ट करतो. बुुधनचा मुलगा लछमनसिंहाच्या मनमानीविरुद्ध उभा ठाकतो, तेव्हा लछमनसिंह त्यालाही गोळ्या घालून ठार करतो. असहाय, हतबल बुधन प्राणांतिक आक्रोश करण्याशिवाय काहीही करू शकत नाही. कारण लछमनसिंहाचे हात वरपर्यंत पोहोचलेले असतात.
तीच गोष्ट द्रौपदीची. तिचं ज्याच्यावर प्रेम असतं, तो इंग्रजांविरोधात, त्यांच्या दमनशाहीविरोधात शड्डू ठोकून उभा ठाकलेला असतो. साहजिकच पोलीस यंत्रणा त्याच्यामागे हात धुऊन लागते. तो आणि द्रौपदी जंगलाच्या आश्रयाला जातात. ते दोघं लपतछपत आपला लढा जारी ठेवतात. पण एके दिवशी तो पोलिसांच्या टप्प्यात येतो आणि मारला जातो. त्याचं प्रेत दोन दिवस उघड्यावर सडत ठेवलं जातं; जेणेकरून ते घेण्यासाठी द्रौपदी येईल आणि आपण तिला पकडू शकू. पण द्रौपदी पोलिसांची ही चाल ओळखून असते. त्यामुळे ती तिकडे फिरकतच नाही. पुढे फितुरीमुळे ती पोलिसांच्या हाती लागते. पोलीस तिच्यावर अत्याचार करतात. पण तरीही ती त्यांंना शरण जात नाही. वाघिणीसारखी ती त्यांना उलट जाब विचारते…
मोयना ही मनमुक्त जगणारी आदिवासी मुलगी. सकाळीच गुराढोरांपाठीमागे जाणारी. तिला शाळेत घातलं जातं. पण घरच्या या जबाबदारीमुळे तिला वेळेवर शाळेत जाणं जमत नाही. शिक्षक त्यावरून तिला ओरडतात. शिक्षा करतात. पण तिचं म्हणणं असतं- मी गुरंढोरं घेऊन रानात जाते, त्यामुळे मला उशीर होतो. तर मग शाळाच उशिरा का भरवत नाही? तिचा प्रश्न रास्त असतो. पण शिक्षण धोरण ठरवणार्यांच्या तो गावीही नसतो. मोयना हुशार आहे. तिचे जगण्याचे प्रश्न तिच्या शिक्षणाआड येतात. ती शिक्षकांना जे मूलभूत व्यावहारिक प्रश्न विचारते त्यांची उत्तरं त्यांच्यापाशी नसतात. कारण ते प्रश्न तिच्या रोजच्या जगण्यातून आलेले असतात…
अशा प्रकारे आदिवासी, वनवासींचे प्रश्न, त्यांचं पीडित, शोषित जगणं महाश्वेतादेवींनी एका कळकळीनं मांडलंय. सावित्री मेधातुल यांनी त्याला नाट्यरूप दिलंय. त्यांच्या कथा एकत्र गुंफून त्यांनी आदिवासींच्या जगण्याचं एक सम्यक चित्र आपल्यासमोर उभं केलं आहे. हे करताना बळी राजाच्या गोष्टीचा त्याला आधार देऊन त्यांनी आपल्या पुराणकथांतील अन्याय, उपेक्षेलाही वाचा फोडली आहे. आपल्या सनातन धर्मापुढे एक प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या कथा एका सूत्रात गुंफताना लेखिकेला तारेवरची कसरत करावी लागली आहे. त्यासाठी त्यांनी लोककलेतील सूत्रधाराची नियुक्ती केली आहे; जेणेकरून कथा पुढे सरकेल… त्यावर भाष्य करता येईल.
दिग्दर्शक मंगेश सातपुते यांनी हा रंगाविष्कार उत्तम बांधला आहे. वारली चित्रांच्या सांकेतिक नेपथ्यातून आणि तिकाटण्याच्या वापरातून त्यांनी आदिवासी जीवनाची वातावरणनिर्मिती यथार्थपणे केली आहे. त्याचबरोबर वेशभूषेतून पात्रांना योग्य ते संदर्भ दिले आहेत. ही कामगिरी नेपथ्य आणि वेशभूषाकार डॉ. सुमित पाटील यांनी वास्तवदर्शीत्वानं बजावली आहे. विक्रम होता यांचं संगीत कथानकाची मागणी पुरवतं आणि ते पुढे नेण्यासाठीही उपयोगी पडतं. विलास हुमणे यांची प्रकाशयोजना नाट्यस्थळं आणि नाट्यात्म मूड्स अधोरेखित करते. मंगेश सातपुते यांनी बंगाली वातावरणाचा ‘फील’ देत हा कथाविष्कार मोठ्या मेहनतीनं साकारला आहे. यातला उद्वेग, उद्रेक, आक्रोश, वेदना, लढा, त्यासाठीची समर्पितता, यातला जीवघेणा संघर्ष त्यांंनी उत्कटतेनं मंचित केला आहे. पात्रांच्या तीव्र भावभावना, त्यांतले चढउतार, कल्लोळ त्यांनी नेमकेपणानं टिपलेत. त्यांचा अतिरेक न होऊ देता जेवढ्यास तेवढं ठेवल्याने ते अक्षरश: अंगावर येतात.
बुधनच्या भूमिकेत हृदयनाथ जाधव अक्षरश: ही भूमिका जगलेयत. आपलं फाटकं जिणं जगतानाचं उपजत शहाणपण, जमीनदाराच्या अन्याय-अत्याचारांचा मुकाटपणे केलेला स्वीकार, मुलाच्या बंडखोरीनं त्याचा बळी घेतल्यानंतरचा बुधनचा आक्रोश आपल्याला हेलावून टाकतो. द्रौपदी झालेल्या सावित्री मेधातुल तिची जगण्याला बिनधास्त सामोरं जाण्याची वृत्ती, अन्यायाविरुद्धची चीड, प्रियकराच्या हत्येनंतरही लढा सुरू ठेवण्याची तिची जिद्द आणि पकडले गेल्यानंतर पोलिसी यंत्रणेनं तिची अब्रू लुटल्यावरचं तिचं शब्दश: खवळून उठणं… या विविध भावावस्थांचे आंदोळ त्यांनी उत्कटतेनं दाखवलेत. मोयनाचं भावविभोर जगणं, त्यातून तिला जगण्यासंदर्भात पडणारे प्रश्न मुक्ती साधना यांनी भावोत्कटरीत्या मांडले आहेत. एका वनकन्येचं मुक्त, मोकळं जगणं म्हणजे काय, हे त्यांनी आपल्या वागण्या-वावरण्यातून दाखवलं आहे. या इन्टेन्स नाटकात जगण्यातील कोवळीक त्यांनी पेश केली आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये. विक्रम होता यांनी सूत्रधाराची कामगिरी चोख बजावली आहे. त्यांचा लोकगीतांतील खुला आवाज श्रवणीय. एकुणात, आदिवासी-वनवासींचं जिणं चितारणारं हे नाटक एकदा तरी अनुभवावं असंच.
