दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू त्याच्या अभिनयासह फिटनेससाठीही चर्चेत असतो. अभिनेता आजही तितकाच तरुण दिसत असल्याने त्याच्या देखणेपणासाठीही अनेक जण कौतुक करतात. त्यामुळे त्याच्या डाएटबद्दल, फिटनेसबद्दल जाणून घेण्यासाठी त्याच्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता असते. वयाच्या ५१व्या वर्षीही तेलुगू सुपरस्टार खूप फिट आहे.

अनेकदा सेलिब्रिटींना त्यांचा फिटनेस जपण्यासाठी आणि स्क्रीनवर छान दिसण्यासाठी विशिष्ट डाएट फॉलो करावा लागतो. त्यामुळे काही पदार्थ टाळावे लागतात तर काही जण त्यांना विशिष्ट पदार्थांचा त्रास होतो म्हणून ते टाळतात. असंच काहीसं महेश बाबूच्याबाबातही आहे.असा एक पदार्थ आहे जो महेश बाबू कधीच खात नाही.

महेश बाबू ‘हा’ पदार्थ कधीच खात नाही

मनी कंट्रोलच्या वृत्तानुसार महेश बाबूने यापूर्वी सांगितलं आहे की तो डेअरी पदार्थ आणि दहीभातासारखे पदार्थ खात नाहीत. त्याच्या आहारातील या निवडी प्रामुख्याने स्वच्छ आणि नियंत्रित आहार घेण्याच्या सवयीशी संबंधित आहेत. मात्र, याचा अर्थ दहीभात प्रत्येकासाठी आरोग्यदायी नाही, असा होत नाही. पोषणतज्ज्ञांच्या मते, दहीभात पूर्णपणे आहारातून वगळण्याचं कोणतंही सार्वत्रिक कारण नाही. एखाद्या व्यक्तीने दहीभात खावा की टाळावा, हे तिच्या वैयक्तिक आहाराच्या गरजा, पचनशक्ती आणि आरोग्याशी संबंधित समस्यांवर अवलंबून असतं.

महेश बाबूंचा डाएट प्लॅन

उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृत्तानुसार महेश बाबू प्रत्येक डाएट ट्रेंडच्या मागे धावण्याऐवजी आपल्या वैयक्तिक दिनचर्येनुसार काही पदार्थ टाळण्यावर भर देतो. त्याच्या आहारात प्रामुख्याने भाज्यांचा समावेश असल्याचं सांगितलं जातं. तसेच, तो ब्रेड, पेस्ट्री आणि बर्गरसारखे पदार्थ खाणं टाळतो. महेश बाबूच्या डाएटची चर्चा त्याच्या फिटनेस रुटीन आणि शिस्तबद्ध जीवनशैलीबरोबर केली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून त्याने आपली सडपातळ आणि फिट शरीरयष्टी कायम राखली आहे.

निरोगी आहारासाठी पदार्थांचं योग्य प्रमाण आणि आहारातील एकूण संतुलन ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. मात्र, एखाद्या व्यक्तीच्या आहारातील निर्बंध किंवा पचनाशी संबंधित समस्यांबाबत योग्य सल्ल्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणं अधिक योग्य ठरतं. शेवटी, महेश बाबूंचा डाएट हा त्याचा वैयक्तिक आहाराचा पर्याय आहे. फिट राहण्यासाठी तो पाळत असलेल्या शिस्तबद्ध जीवनशैलीचा तो एक भाग आहे.