अन्याय्य परिस्थितीविरोधात बंडखोरी करणाऱ्या सहा महिलांची गोष्ट प्रसिद्ध अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर यांच्या आगामी ‘बंडखोर’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. महेश मांजरेकरांच्या दिग्दर्शनात पहिल्यांदाच सहा वेगवेगळ्या अभिनेत्रींच्या भूमिका असलेल्या ‘बंडखोर’ या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच समाजमाध्यमांवर प्रदर्शित झाले आहे. स्वतःसाठी उभं राहण्याची, प्रश्न विचारण्याची आणि अन्यायाविरोधात बंड पुकारण्याची हिंमत दाखवणाऱ्या या सहा स्त्रिया ‘बंडखोर’च्या या पोस्टरमध्ये दिसत आहेत. या पोस्टरने प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाबद्दल उत्कंठा निर्माण केली आहे.
‘बंडखोर’ या चित्रपटात खूप दिवसांनी मराठीतील नव्या-जुन्या अशा सहा अभिनेत्रींची मोट जुळून आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री छाया कदम आणि मृणाल कुलकर्णी या अनुभवी नायिकांबरोबरच प्रियदर्शनी इंदलकर, पूजा कातुर्डे, तितिक्षा तावडे आणि नित्यश्री ज्ञानलक्ष्मी या चार युवा अभिनेत्रींच्या भूमिका या चित्रपटात आहेत. पोस्टरवर एका वेगळ्याच रुबाबात त्या दिसत आहेत. त्यांच्यातील आत्मविश्वास त्यांच्या देहबोलीतून जाणवतो. त्यांची ही बंडखोरी नेमकी कशा विरोधात आहे, त्यांचा हा बेधडकपणा कुठून आला आणि त्यांच्या या वृत्तीमुळे कथेत काय घडणार, हे जाणून घेण्यासाठी अंमळ वाट पाहावी लागणार आहे.
‘बंडखोर’मधल्या या सहाजणी आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या अनेक महिलांचं प्रतिनिधित्व करतात. त्यांच्या स्वभावातच एक स्पष्टपणा आहे. चुकीचं वाटत असेल तर त्या त्याला विरोध करतात आणि स्वतःच्या आयुष्याबाबतचे निर्णय घेताना कुणाच्या परवानगीची वाट पाहात नाहीत. त्यांची ही बेधडक वृत्ती, त्यांचे वेगळे स्वभाव आणि आयुष्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन या सगळ्यामुळे ‘बंडखोर’ची गोष्ट माझ्यासाठी खूप खास आहे’, अशी भावना दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी व्यक्त केली. संजय शेट्ये, विनसन ग्राफिक प्रॉडक्शन निर्मित आणि सत्यसाई फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाचे संवाद लेखन इरावती कर्णिक यांनी केले आहे. या सहा ‘बंडखोर’ स्त्रियांची गोष्ट येत्या २४ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
