सहा स्त्री पात्रांची एक दमदार गोष्ट, त्या साकारण्यासाठी तितक्याच ताकदीच्या अनुभवी आणि काही नव्या अभिनेत्रींचं पडद्यावर एकत्र येणं… हे सगळं छान जुळवत खास आपल्या शैलीत चित्रपट रंगवणारे प्रख्यात दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर. ‘बंडखोर’ या आगामी मराठी चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना एक वेगळा कथाप्रयोग अनुभवता येणार आहे. या चित्रपटाची कथाकल्पना कशी सुचली ते एकूणच मराठी चित्रपटांची या वर्षभरातील यशस्वी वाटचाल अशा विविध मुद्द्यांवर महेश मांजरेकर यांच्याबरोबर चित्रपटातील कलाकार अभिनेत्री छाया कदम, मृणाल कुलकर्णी, प्रियदर्शिनी इंदलकर, पूजा कातुर्डे, नित्यश्री ज्ञानलक्ष्मी आणि अभिनेता संकेत पाठक यांनी ‘लोकसत्ता’ कार्यालयात दिलेल्या भेटीत गप्पा मारल्या…

‘बंडखोर’ची कथा मी साधारण बारा वर्षांपूर्वी लिहिली होती, पण काही कारणांनी तो चित्रपट होऊ शकला नाही. आज हा चित्रपट प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी योग्य वेळ आहे, कारण आत्ताचा काळ असा आहे की स्त्रिया निडरपणे कुठल्याही विषयावर व्यक्त होतात. आपल्याला काय वाटतं, काय करायचं आहे, याबाबत त्यांच्या विचारांमध्ये स्पष्टता आहे आणि ते सांगायला त्या अजिबात घाबरत नाहीत, असं दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी सांगितलं. या चित्रपटाची कल्पना त्यांना त्यांची मोठी कन्या अश्वमी हिच्यावरून सुचली होती, असंही त्यांनी सांगितलं. माझ्या मुलीबरोबर संवाद साधताना मला अनेक गोष्टी लक्षात आल्या. ती अगदी दहा वर्षांची असल्यापासून सेटवर येऊन बसायची, चित्रीकरणादरम्यान निरीक्षण करत राहायची. चित्रपट नेमका काय सांगू पाहतो आहे, हे तिला उत्तम समजायचं, त्यातलं काय चांगलं आहे, काय वाईट याबाबत ती उत्तम विश्लेषण करत असे. त्यामुळे ती मोठी झाल्यावर तुला चित्रपट करायचा असेल, तर मला सांग असं मी तिला म्हटलं. तर तिने लगेच तुझ्याबरोबर मी चित्रपट करणार नाही, कारण तुम्ही मध्ये ढवळाढवळ करणार, असं मला स्पष्ट सांगून टाकलं. ती फटकळ असली तरी तिच्या मनात जे सुरू असेल ते स्पष्ट समोरच्याला सांगून टाकण्याचा तिचा स्वभाव मला अधिक आवडला, असं सांगतानाच हे फक्त तिच्याबाबतीतच नव्हे, माझी आई, माझी पहिली पत्नी आणि आता मेधा अशा प्रत्येक स्त्रीमध्ये मी बंडखोरी पाहिलेली आहे, असं त्यांनी सांगितलं. पुरुषांपेक्षा स्त्री कायम सक्षम असते, यावर माझा विश्वास आहे आणि हेच कुठेतरी या चित्रपटातही पाहायला मिळेल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

आधीच्या पिढीतील स्त्रियांनी बदल घडवून आणला…

आत्ताच्या काळातील स्त्रिया या अधिक सक्षम, स्वतंत्र बाण्याने वावरणाऱ्या आहेत, पण बदलाची खरी सुरुवात आधीच्या पिढीतील स्त्रियांनी केली होती, असं मत मांजरेकर यांनी व्यक्त केलं. ‘माझी आई जेमतेम शिकलेली होती. वडिलांना दारूचं व्यसन होतं आणि इतक्या कठीण परिस्थितीत तिने आम्हा सहा भावंडांना एकहाती वाढवलं. तिच्यात जी ताकद होती ती मी कुठल्याही पुरुषात पाहिलेली नाही. सुरुवातीला तर ती फक्त मालवणीत बोलायची. हळूहळू मुंबईत इमारतीत राहणाऱ्या बायकांबरोबर ती त्यांच्यासारखं मराठी बोलायला शिकली. हा चित्रपट एका अर्थी तिला दिलेली मानवंदना आहे’, अशा शब्दांत या चित्रपटामागची आपली प्रेरणा काय होती, हे मांजरेकर यांनी स्पष्ट केलं.

स्त्री मुळातच बंडखोर असते…

या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी महत्त्वाच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहेत. आपल्या भूमिकेचे तपशील न उलगडता या चित्रपटातील सहा स्त्रियांना अतिशय वेगळ्या पद्धतीने लोकांसमोर आणलं आहे, असं मृणाल कुलकर्णी यांनी सांगितलं. स्त्री मुळातच बंडखोर असते. काहींची बंडखोरी उघड उघड दिसते. तर काही वरवर सौम्य राहून खंबीरपणे आपल्याला हवं ते करतात. काहींना त्यांचं ध्येय पूर्ण करण्यासाठी कोणाच्यातरी पाठिंब्याची गरज भासते, तर काही स्वतःच इतक्या खंबीर असतात की त्यांना दुसऱ्या कोणाची मदत लागत नाही. आपली क्षमता काय आहे, हे पूर्णपणे उमगलेल्या सहाजणींची गोष्ट या चित्रपटात आहे आणि इतकी सुंदर कथा महेश मांजरेकर यांच्यासारख्या अतिशय ताकदीच्या दिग्दर्शकाने तितक्याच उत्कटतेने मांडली आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटांतूनही सातत्याने स्त्रियांचे विषय मांडणारा, तिच्यातली ताकद दाखवून देणारा त्यांच्यासारखा दुसरा दिग्दर्शक नाही. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करणं ही पर्वणी होती, अशी भावना मृणाल कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

पात्राचं वय, भूमिकेची लांबी महत्त्वाची नसते…

एकापाठोपाठ एक दमदार व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्री छाया कदम यांनी या चित्रपटात वयस्कर स्त्रीची भूमिका साकारली आहे. ‘महेश मांजरेकर हे चित्रपटसृष्टीत बापमाणूस म्हणून ओळखले जातात. त्यांनी मला तुला ही भूमिका करायची आहे, असं सांगावं आणि मी ते आनंदाने करावं, इतकं ते सहज आहे. दिग्दर्शक म्हणून त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे, एखाद्या कलाकाराचं काम आवडलं तर ते भरभरून कौतुक करतात, मात्र तरीही त्या कलाकाराला जमिनीवर कसं ठेवायचं, हेही त्यांना चांगलंच माहिती आहे. त्यामुळे ‘बंडखोर’ या चित्रपटात त्यांनी जी भूमिका मला देऊ केली ती मी माझ्या परीने केली’, असं सांगतानाच आपल्यासाठी भूमिकेची लांबी वा कुठल्या वयाची व्यक्तिरेखा साकारायला मिळते आहे, हे फारसं महत्त्वाचं नसल्याचंही छाया कदम यांनी स्पष्ट केलं. खरं तर, अगदी सुरुवातीच्या काळात कुमार कला केंद्राच्या स्पर्धेत नाटक करत होते, तेव्हाच मी आजीची भूमिका केली होती. पहिल्या चित्रपटातही आजी केली आहे, त्यामुळे हे वय, लांबी या गोष्टींनी मला फरक पडत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. ‘बंडखोर’ चित्रपटातील भूमिकेविषयी बोलताना हा चित्रपट पाहिल्यावर प्रत्येक स्त्रीला आयुष्यात कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर आपण अशी बंड करणारी स्त्री एकतर पाहिली आहे, किंवा आपण स्वतः रूढ गोष्टींविरोधात बंड पुकारताना एखादी तरी स्त्री खमकेपणाने आपल्या पाठीशी होती, याची आठवण होईल, असं आपल्याला वाटत असल्याचं छाया कदम यांनी सांगितलं.

एकमेकींच्या मागे ढाल बनून उभ्या राहणाऱ्या स्त्रियांची गोष्ट

सर्वसाधारणपणे मालिका किंवा चित्रपटात आपण एकमेकांचे पाय खेचणाऱ्या, कुचाळक्या करणाऱ्या स्त्रिया पाहात असतो. या चित्रपटाचं वैशिष्ट्य असं की यातली सगळी स्त्री पात्रं एकमेकींचं दुःख, जगणं समजून घेतात. अतिशय़ कठीण प्रसंगात तू लढ, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, म्हणून जगण्याचा विश्वास देतात, असं अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर हिने सांगितलं. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या माध्यमातून महेश मांजरेकर यांच्याशी कशी ओळख झाली, याची आठवणही तिने सांगितली. महेश मांजरेकर यांचं ‘हास्यजत्रे’वर खूप प्रेम आहे, त्यांनी एका भागात आमच्याबरोबर कामही केलं होतं. माझं काम पाहिल्यानंतरच त्यांनी मला ‘तुला माझ्या चित्रपटात काम करायचं आहे’ असं सांगितलं होतं, माझ्यासाठी खरं तर तीच कौतुकाची पावती होती, असं प्रियदर्शिनीने सांगितलं. या चित्रपटात तिने मीरा ही मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. तरुण, तडफदार मीरा या चित्रपटातील इतर स्त्रियांपेक्षा वेगळी आहे, स्पष्टवक्ती आहे, तथाकथित रुढी-परंपरा तिला मान्य नाहीत, त्यामुळे फॅशनेबल कपडे घालणं, शिव्या देत बोलणं हे तिचं वागणं लोकांना आवडत नाही. ते तिला नावं ठेवतात. मुळात, ती चुकीचं वागतच नाही आहे, ती फक्त तिच्या पद्धतीने स्वतःचं स्वातंत्र्य जपण्याचा प्रयत्न करते आहे. माझ्या आजवरच्या भूमिकांपेक्षा अत्यंत वेगळी अशी व्यक्तिरेखा माझ्या वाट्याला आल्याने मलाच सुखद धक्का बसला होता, अशी आठवण प्रियदर्शिनीने सांगितली.

नव्या चेहऱ्यांना नवी संधी…

या चित्रपटात अभिनेत्री पूजा कातुर्डे आणि नित्यश्री ज्ञानलक्ष्मी हे दोन नवे चेहरेही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ‘मी वास्तवात जशी आहे, त्यापेक्षा अगदी विरोधी अशी भूमिका माझ्या वाट्याला आली आहे’ असं पूजाने सांगितलं. आजवर मी कायम मोकळेपणाने वागत आले आहे, जिथे मला एखादी गोष्ट पटली नाही, तिथे तिथे मी विरोध केलेला आहे. इथे या चित्रपटात माझी व्यक्तिरेखा अतिशय शांत, सोशिक अशी आहे. तिला सगळ्या बायका कशा साथ देतात आणि पुन्हा उभं करतात, अशा पद्धतीची गोष्ट असल्याचं पूजाने सांगितलं. तर नित्यश्रीनेही ती साकारत असलेल्या उर्वशी या पात्राविषयी थोडक्यात माहिती दिली. उर्वशीला स्वतःचा आवाजच नाही आहे, आजवर ती फक्त सहन करत आली आहे. तिच्या मनात वेदना आहेत, खदखद आहे, असा एक प्रसंग तिच्यासमोर येतो जेव्हा तिला स्वतःसाठी ठाम निर्णय घ्यावा लागतो. पटत नसलेल्या गोष्टीविरोधात ती बंड पुकारते म्हणून तिला बंडखोर असं लेबल लावलं जातं. आजही उर्वशीसारख्या अनेक स्त्रिया समाजात आहेत, त्यांचं प्रतिनिधित्व करणारी एक वेगळी भूमिका मला महेश मांजरेकर यांच्या दिग्दर्शनाखाली करता आली, याचा मला खूप आनंद आहे, असं नित्यश्रीने सांगितलं.

नायिकाप्रधान चित्रपटातली पुरुष भूमिका…

‘बंडखोर’ हा चित्रपट प्रामुख्याने नायिकाप्रधान आहे, त्यात अभिनेता संकेत पाठक यानेही छोटेखानी पण महत्त्वाची भूमिका केली आहे. हा चित्रपट नायिकाप्रधान आहे, असं म्हणण्यापेक्षा तो आजच्या काळानुसार बदलत्या परिस्थितीचे भान ठेवून खंबीरपणे जगणाऱ्या स्त्रियांची क्रांतिकारी गोष्ट सांगतो, असं मत संकेतने व्यक्त केलं. त्यामुळे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी चित्रपटाची कथा ऐकवली तेव्हा माझ्या भूमिकेच्या लांबीचा विचारही न करता मी चटकन होकार दिला, असं त्याने सांगितलं.