देशात सध्या लॉकडाउनचा तिसरा टप्पा सुरु आहे. या काळात कंटेनमेंट झोन सोडून रेड, ग्रीन आणि ऑरेंज या तिन्ही झोनमध्ये सशर्त सुट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासोबतच या तीन झोनमध्ये मद्यविक्रीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र या भागांमधील मद्यविक्री सुरु झाल्यानंतर मद्यप्रेमींनी मद्यविक्रीच्या दुकानांबाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली.यामध्येच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचंदेखील उल्लंघन करण्यात आलं. हा प्रकार पाहिल्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यात अभिनेत्री मलायका अरोरानेदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचा संताप व्यक्त केला आहे.

सरकारने तीन झोनमधील मद्यविक्रीवरील बंदी हटविल्यानंतर काही भागांमध्ये मद्यविक्रीची दुकाने सुरु करण्यात आली. त्यामुळे मद्यप्रेमींची दुकानाबाहेर एकच झुंबड उडाली. ही गर्दी पाहून मलायकाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली आहे.

“मद्याची दुकानं सुरु करायची एवढी काय घाई होती हेच समजत नाहीये, ती जीवनावश्यक वस्तूदेखील नाही. ही अत्यंत चुकीची कल्पना होती. यामुळे घरगुती हिंसाचार यासारख्या घटनांमध्ये वाढ होऊ शकते”, असं मलायका म्हणाली.

दरम्यान, ३ मे रोजी लॉकडाउनचा शेवटाचा दिवस होता. मात्र या लॉकडाउनच्या कालावधीत केंद्र सरकाराने वाढ केली असून या तिसऱ्या टप्प्यात कंटेनमेंट झोन सोडून रेड, ग्रीन आणि ऑरेंज या तिन्ही झोनमध्ये सशर्त सुट देण्याचा निर्णय घेतला आहे. इतकंच नाही तर या तीनही झोनमध्ये मद्यविक्रीला परवानगी देण्यात आली आहे.