scorecardresearch

‘या सर्व गोष्टींमुळे माझं करिअर…’ अरबाजशी लग्न आणि आई होण्यावर पहिल्यांदाच बोलली मलायका

लवकर केलेलं लग्न आणि त्यानंतर आई होण्याचा करिअरवर काय परिणाम झाला यावर मलायका पहिल्यांदाच बोलली.

malaika arora, arbaaz khan, malaika arora marriage, malaika arora motherhood, malaika arora son, मलायका अरोरा, अरबाज खान, मलायका अरोरा करिअर, मलायका अरोरा बॉयफ्रेंड
करिअरच्या उभारत्या काळात मलायकानं अरबाज खानशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानं त्यावेळी अनेकांना धक्का बसला होता.

मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा मुलगा ज्यावेळी १९ वर्षांचा झाला त्यावेळी दोघंही वेगळे झाले होते. १९९८ साली या दोघांनी लग्न केलं होतं आणि २०१७ साली त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर मलायकानं स्वतःचं लक्ष करिअरवर केंद्रीत केलं तर अरबाज सुद्धा त्याच्या आयुष्यात पुढे गेला. पण जेव्हा मलायका बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये नवीन होती. तेव्हा तिच्याकडे बरंच काम होतं. करिअरच्या उभारत्या काळात मलायकानं अरबाज खानशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानं त्यावेळी अनेकांना धक्का बसला होता. एवढंच नाही तर त्यानंतर तिने लगेचच आई होण्याचा निर्णय घेतला आणि अरहान खान, अरबाज आणि मलायकाच्या आयुष्यात आला.

अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत मलायकानं लवकर केलेलं लग्न आणि त्यानंतरचं मातृत्व यावर भाष्य केलंय. या सगळ्याचा तिच्या करिअरवर काय परिणाम झाला का? याबद्दल तिनं सांगितलं. मलायका म्हणाली, ‘हा माझा निर्णय होता. या सर्व गोष्टी माझ्या करिअरसाठी कधीच अडथळा ठरल्या नाहीत. मी स्वतः या सर्व गोष्टींचा पुरावा आहे. जेव्हा मी लग्न करण्याचा किंवा आई होण्याचा निर्णय घेतला तेव्हा ही माझी निवड होती. मी या सर्व गोष्टींचा फारसा विचार केला नव्हता. या सर्व गोष्टींचा माझ्या करिअरवर काहीच फरक पडला नाही. त्यावेळी माझ्या आजूबाजूला जे लोक होते ते बरंच काही बोलायचे. माझे विचार बदलण्याचा प्रयत्न करत होते. पण मी माझ्या करिअरच्या बाबतीत कोणाचंच ऐकलं नाही.’

प्रेग्नन्सीच्या वेळीही केलं होतं काम
मलायका म्हणाली, ‘पूर्वी लग्न झालेल्या किंवा मुलं असलेल्या स्त्रिया काम करताना फारशा दिसत नव्हत्या किंवा ज्या होत्या त्या फार कमी होत्या. पण आज यात बरंच काही बदललं आहे. स्त्रिया लग्न करत आहेत, मुलांना जन्म देत आहेत आणि काम देखील करत आहेत. एवढंच नाही तर त्या प्रेग्नन्सीमध्येही काम करत आहेत. आता सर्व संकल्पनाच बदलल्या आहेत. पण पूर्वी असं नव्हतं. त्यामुळे मी ठरवलं होतं की, या गोष्टींना मी स्वतःवर भारी पडू देणार नाही. स्वतःला दुःखी करणार नाही. मनात जे येईल ते करेन. स्वतःला थांबवणार नाही. मी माझ्या प्रेग्नन्सीमध्ये काम केलं. त्यावेळी मी एमटीव्हीवर शो करत होते. प्रेग्नन्सीमध्ये मी बराच प्रवास केला.’

मलायका पुढे म्हणाली, ‘मी पूर्वीपासूनच ग्लॅमरमध्ये वावरणारी होते. लग्न आणि मुलांच्या जन्मानंतर अनेकदा लोक त्यांचं काम किंवा जुन्या गोष्टी सोडून देतात. पण मी असं केलं नाही. स्वतः पुढे जात राहिले आणि मला आवडणारं काम करत राहिले. मी हे सर्व केलं याचा मला आनंदच आहे.’ दरम्यान मलायकाचा मुलगा आता परदेशात शिक्षण घेत आहे. अलिकडेच तो सुट्ट्यांसाठी भारतात परतला असून मलायका सध्या आपल्या मुलासोबत टाइम स्पेंड करत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Malaika arora open on how marriage with arbaaz khan and having child effect on her career mrj