देशात करोनाचं संकट गंभीर झालेलं असतानाच्या काळात उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये महाकुंभमेळा सुरू आहे. देशभरातून भाविक कुंभमेळ्यासाठी दाखल झाले असून, लाखो भाविक हरिद्वारमध्ये जमले आहेत. कुंभमेळ्यातही करोनाचा शिरकाव झाला असून, येणाऱ्या काळात कुंभमेळ्यामुळे देशातील परिस्थिती बिघडू शकते, असा इशारा तज्ज्ञांकडून दिला जात आहे. दरम्यान अभिनेत्री मलायका अरोराने देखील सोशल मीडियावर कुंभमेळ्यातील फोटो शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे.

मलायकाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी शेअर केली होती. या स्टोरीमध्ये तिने ‘करोना हा संसर्गजन्य आजार आहे… तरी देखील हे घडत आहे. हे सर्व तर खरच आश्चर्यकारक आहे’ असे म्हटले होते. त्यानंतर तिने सर्वांना घरातच रहा सुरक्षित रहा असे म्हटले आहे. ‘आपण सगळे घरात सुरक्षित राहू.. आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांचा विचार करु’ असे तिने म्हटले होते.

आणखी वाचा : ‘हा कुंभमेळा नाही तर करोना अ‍ॅटम बॉम्ब’, राम गोपाल वर्मांने व्यक्त केली नाराजी

देशात करोनाची दुसरी लाट आलेली असतानाच हरिद्वारमध्ये कुंभमेळ्यात प्रचंड गर्दीत झाली. कुंभमेळ्यातील सोमवारी शाहीस्नान पार पडले. गंगेतील दुसऱ्या पवित्र स्नानाची पर्वणी साधण्यासाठी हरिद्वारमध्ये तब्बल २८ लाख साधू आणि भाविक दाखल झाले होते. महाकुंभमेळ्यात दुसऱ्या शाहीस्नानानंतर १०२ साधू व भाविक करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.