एका सुपरहिट मल्याळम चित्रपटाची ऑस्कर २०२४ साठी भारताची अधिकृत एंट्री म्हणून निवड झाली आहे. ‘2018: Everyone is a Hero’ असे या चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट मे महिन्यात प्रदर्शित झाला होता. समीक्षकांसह प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या या चित्रपटाने ज्युरीचीही मनं जिंकली. कन्नड चित्रपट दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली यांच्या नेतृत्वाखालील ज्युरीने यासंदर्भात घोषणा केली आहे.
ऑस्कर २०२४ साठी ‘या’ भारतीय चित्रपटाची अधिकृत एंट्री, ज्युरींकडून घोषणा




‘2018’ हा मल्याळम चित्रपट २०२४ च्या अकादमी पुरस्कारांसाठी भारताची अधिकृत एंट्री आहे. या चित्रपटात टोव्हिनो थॉमसची मुख्य भूमिका आहे. ज्युड अँथनी जोसेफ दिग्दर्शित हा चित्रपट ऑस्कर २०२४ मध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करणार आहे. याबाबतची घोषणा झाल्यावर अभिनेता टोव्हिनो थॉमसने प्रतिक्रिया दिली आहे.
‘इंडिया टुडे’शी बोलताना टोव्हिनो थॉमस म्हणाला, “मला ‘2018’ च्या संपूर्ण टीमसाठी खरोखर आनंद वाटतोय. वैयक्तिकरित्या, माझ्या चित्रपटांसाठी अशा प्रकारची शिफारस व्हावी असं नेहमी मला वाटायचं. आज हे घडत आहे आणि ते खूप मोठ्या स्तरावर घडत आहे. मी याबद्दल खूप उत्सुक आहे आणि मी खूप आनंदी आहे. हे सर्व प्रत्यक्षात घडतंय. जेव्हा २०१८ मध्ये पूर प्रत्यक्षात आला होता, तेव्हा केरळ उध्वस्त झाले होते. लोकांनी अनुभवलेल्या सर्व त्रासांवर आधारित हा चित्रपट आम्ही बनवला आहे. हा बहुतांशी मल्याळी लोकांसाठी त्यांचा स्वतःचा चित्रपट आहे. ही गोष्ट आणखी रोमांचक असल्याचे मला वाटते.”
“सलग दोन. ‘2018’ या चित्रपटातील माझ्या अभिनयासाठी मला काल आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळाला. आज हा चित्रपट अकादमी पुरस्कारांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. होय, 2018 ही ऑस्करसाठी भारताची अधिकृत एंट्री आहे. आता “An the Oscar Goes to” ऐकण्याची आशा आहे…”, असं टोव्हिनोने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
“अशा चित्रपटाचा भाग बनणे खूप छान वाटते आणि आता एवढ्या मोठ्या सन्मानासाठी त्याची निवडही झाली आहे. मी सेप्टिमियस पुरस्कारात सर्वोत्कृष्ट आशियाई अभिनेत्याचा पुरस्कार देखील जिंकला आहे. हा चित्रपट आधीच उत्कृष्ट आहे कारण त्याने आम्हाला अनेक ठिकाणी मोठ्या स्तरावर प्रशंसा मिळवून दिली आहे,” असं टोव्हिनो थॉमसने सांगितलं.