मल्याळम सिनेसृष्टीत २००० च्या दशकात आपल्या बोल्ड अभिनयाने ब्लॉकबस्टर ठरलेली अभिनेत्री शकीला हिने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अत्यंत दुःखद आणि धक्कादायक वास्तव उघड केले आहे. अवघ्या १२ लाखांच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘किन्नराथुंबीकल’ चित्रपटाने ४ कोटींची कमाई करत शकीलाला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवले होते. मात्र, इतकी प्रचंड कमाई करूनही आज शकीला आर्थिक अडचणीत आहे. माईलस्टोन मेकर्सला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितलं की, तिच्या सख्ख्या बहिणीनेच तिच्या कमाईचे सर्व पैसे हडपले आणि तिचा विश्वासघात केला. बहिणीच्या या कृत्यामुळे मानसिक आणि आर्थिक संकटात सापडलेल्या शकीलाने आपल्या करिअर आणि नशिबाबद्दल भाष्य केलंय.
अॅडल्ट सिनेमांतून करिअरची सुरुवात करणाऱ्या शकीलाचे चित्रपट २००० च्या काळात मल्याळम सिनेसृष्टीत तुफान गाजले. त्या काळात जेव्हा बडे चित्रपट चालत नव्हते, तेव्हा शकीलाच्या अडल्ट चित्रपटांची लाट आली होती. त्याबद्दल ती म्हणाली, “माझ्या मनात कोणतीही अपराधीपणाची भावना नाही. माझे चित्रपट पाहण्यासाठी मी कोणावरही बळजबरी केली नाही. मी कोणाचंही आयुष्य बरबाद केलं नाही. पण मी दुःखी आहे, कारण माझ्या जवळच्या लोकांना मी नकोय, फक्त माझे पैसे हवे आहेत.”
शकीलाची कुटुंबियांवर नाराजी
करिअरच्या शिखरावर असताना शकीलाने कोट्यवधी रुपये कमावले, पण तरीही ती आर्थिकदृष्ट्या स्थिर नाही. कमावलेले सर्व पैसे कुठे गेले? असं विचारल्यावर ती म्हणाली की हे सर्व पैसे तिने मोठ्या बहिणीकडे विश्वासाने ठेवले होते. बहिणीने तिचा विश्वासघात करत ते पैसे बळकावले. शकीला म्हणाली, “ते पैसे माझ्या बहिणीकडे आहेत, त्यावर ती आनंदाने जगतेय. माझ्या जवळच्या माणसांना मी नको होते, फक्त माझे पैसे हवे होते. आता माझ्याकडे तिला देण्यासाठी पैसे उरले नाहीत, त्यामुळे तिने मला भेटायलाही येऊ नये.”
बहिणीनेच केला शकीलाचा विश्वासघात
शकीला म्हणाली, “माझी मोठी बहीण माझ्या मुलीला भेटायला आजवर आली नाही, याचं मला खूप दुःख आहे. पण आता तिने मला भेटायला येऊही नये कारण तिला देण्यासाठी आता माझ्याकडे कोणतेही पैसे उरले नाहीत.”
चित्रपटसृष्टीवरील आरोप फेटाळले
मल्याळम इंडस्ट्रीने तिचा वापर केला किंवा बड्या कलाकारांनी तिचे करिअर खराब केले, हे सर्व आरोप शकीलाने फेटाळले. ती म्हणाली, “मी केलेल्या कामाचे मला योग्य पैसे मिळाले. मोठे स्टार्स खूप चांगल्या मनाचे आहेत. माझा एक काळ होता, तो निघून गेला. मी केलेल्या कोणत्याही चित्रपटाचा मला पश्चाताप नाही. म्हणूनच आता २६ वर्षांनंतरही तुम्ही माझी मुलाखत घेताय.”
पुन्हा संधी मिळाल्यास IPS ऑफिसर व्हायची इच्छा
आयुष्यात पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची संधी मिळाली, तर शिक्षणावर लक्ष केंद्रित करून IPS अधिकारी व्हायला आवडेल, अशी इच्छा शकीलाने व्यक्त केली. लहानपणी अभ्यासाची आवड नसली तरी आता स्मरणशक्ती आणि समज चांगली असल्याने नवीन गोष्टी सहज शिकू शकते, असा विश्वास तिने दाखवला.
