Malhar Patekar on parents Nana Patekar Neelkanti Patekar separation : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाबद्दल बरीच चर्चा होत आहे. कारण नाना पत्नी नीलकांती पाटेकर यांच्यापासून वेगळे राहायचे. नीलकांती पाटेकर त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होत्या, त्यावरून त्यांच्या नात्याबद्दल चर्चा सुरू झाल्या. खरं तर नाना पाटेकर व नीलकांती यांनी १९७८ साली प्रेमविवाह केला होता. त्यांना दुर्वासा व मल्हार ही दोन मुलं झाली. त्यापैकी दुर्वासाचं बालपणीच निधन झालं. मुलांच्या जन्मानंतर काही वर्षांनी कायदेशीर घटस्फोट न घेता नाना पाटेकर व नीलकांती तब्बल ३५ वर्षे वेगळे राहिले. आता नानांचा मुलगा मल्हार पाटेकर याने आई-वडील घटस्फोट न घेता वेगळे का राहिले, त्याचा खुलासा केला.

लोकांना काय वाटतं, याचा फरक पडत नाही – मल्हार पाटेकर

हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना मल्हार आपल्या कुटुंबातील नात्यांबद्दल सुरू असलेल्या चर्चांवर व्यक्त झाला. नाना पाटेकर व नीलकांती वेगळे राहूनही त्यांच्यात भावनिक नातं होतं, असं मल्हारने स्पष्ट केलं. सोशल मीडियावर दिसणाऱ्या गोष्टीवरून त्यांच्या नात्याबद्दल उलटसुलट बोलणाऱ्यांना मल्हारने सुनावलं. “लहानाचा मोठा होत असताना मी माझ्या आई-वडिलांकडून खूप हिंमत आणि धैर्य शिकलो. बाहेरच्या लोकांना काय वाटतं याचा मला काही फरक पडत नाही. कारण प्रत्यक्षात एक कुटुंब म्हणून आम्ही भावनिकदृष्ट्या खूप घट्ट जोडलेले होतो. अगदी माझे काका आणि चुलत भाऊसुद्धा. मला सर्वांचं नेहमीच प्रेम मिळालं आणि तेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे,” असं मल्हार म्हणाला.

Nana Patekar with son Malhar Patekar and wife Neelkanti Patekar
नाना पाटेकर, त्यांच्या पत्नी नीलकांती पाटेकर व मुलगा मल्हार पाटेकर (फोटो- फेसबूक)

त्यांचं ३८-३९ वर्षांचं नातं होतं – मल्हार पाटेकर

मल्हार पुढे म्हणाला, “इंटरनेटवर जे काही व्हायरल होत आहे, ते किती चुकीचं आहे. आम्ही इन्स्टाग्रामवर कौटुंबिक फोटो शेअर करत नाही म्हणजे आमचं आपापसात नातं नाही असं होत नाही. वेगळे झाल्यानंतरही माझ्या आई-वडिलांचे संबंध चांगले होते. त्यांचं ३८-३९ वर्षांचं नातं होतं आणि गोष्टी जशा दिसतात तशा कधीच नसतात. मी त्यांच्याबद्दल सोशल मीडियावर जे काही वाचलं त्याचं उत्तर एवढंच देईन की ते कधीच एकटे नव्हते आणि ते आजारीही नव्हते. कारण आम्ही कोणीही त्यांची साथ सोडली नव्हती, आमच्यापैकी कोणी ना कोणी नेहमी त्यांच्याबरोबर असायचं. ते खूप अॅक्टिव्ह होते आणि जिममध्ये अडीच तास वर्कआउट करायचे. आजकालचे तरुणही तेवढं करू शकत नाहीत, असा त्यांचा फिटनेस होता.”

दरम्यान, नाना पाटेकर यांचे ७५ व्या वर्षी गोव्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. पण त्यादिवशी ते एकटे नव्हते. त्यांच्याबरोबर त्यांच्या भावाचा मुलगा होता, पण केबीसीच्या शूटिंगची तयारी करण्यासाठी नानांनी त्याला मुंबईला पाठवलं होतं, असंही मल्हारने सांगितलं.