Nana Patekar Son reacts on Goa Police unnatural death case: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गुरुवारी (८ ऑक्टोबर) गोव्यात निधन झालं. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. नानांना ‘ओशन पार्क’ येथील घरातून बांबोळी येथील मणिपाल रुग्णालयात नेण्यात आलं होतं, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. दरम्यान, गोवा पोलिसांनी याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. या संपूर्ण प्रकरणावर नानांचा मुलगा मल्हार पाटेकरने प्रतिक्रिया दिली आहे.
नानांना ‘ओशन पार्क’ येथील त्यांच्या घरातून बांबोळी येथील मणिपाल रुग्णालयातील आपत्कालीन विभागात नेण्यात आलं होतं, मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं. एएनआयच्या माहितीनुसार, पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली असून पोलीस उपनिरीक्षक नितीन नाईक यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरू आहे.
मल्हार पाटेकर पोलिसांच्या कारवाईबद्दल काय म्हणाला?
“मला याबाबत आताच समजतंय. माझं रुग्णालयातील डॉक्टर व पोलीस खात्यातील ज्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालं, तेव्हा मला असं काहीच सांगण्यात आलं नाही. पण त्यांना वाटत असेल की असं काही आहे तर त्यांनी नक्कीच तपास करावा. आम्ही सहकार्य करू,” असं मल्हार पाटेकर न्यूज नेशन टीव्हीशी बोलताना म्हणाला.
नाना पाटेकर निधन घटनाक्रम
नाना पाटेकर गोव्यात राहत्या घरी एकटेच होते, तेव्हा त्यांना मध्यरात्री अस्वस्थ वाटू लागलं. त्यांनी आपल्या मित्राला मेसेज केला आणि सांगितलं की त्यांना बरं वाटत नाहीये. पण मध्यरात्र असल्याने मित्राने मेसेज पाहिला नाही, त्यानंतर नानांनी फोन केला. त्यांचा मित्र जवळपास ४ वाजता नानांच्या घरी पोहोचला. तेव्हा नानांना खूप घाम येत होता. नाना मणिपाल रुग्णालयाजवळच राहत होते. मित्राने त्यांच्या केअरटेकरला रुग्णवाहिका बोलावण्यासाठी तातडीने रुग्णालयात पाठवलं.
रुग्णवाहिकेसह डॉक्टरांचे इमर्जेन्सी पथकही त्यांच्या घरी पोहोचले आणि त्यांनी उपचार सुरू केले, पण नाना प्रतिसाद देत नव्हते. नंतर पथकाने ‘कार्डियाक मसाज’ सुरू केला आणि रुग्णालयात नेलं. त्यांना पहाटे ४:२० ते ४:३० च्या सुमारास रुग्णालयात आणण्यात आलं, पण त्यांचं निधन झालं होतं. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले, असं मणिपाल रुग्णालयातील डॉक्टर शेखर साळकर यांनी सांगितलं.
नाना गोव्यात होते तर त्यांची पत्नी व मुलगा पुण्याला होते. नानांबद्दल समजताच ते गोव्याला गेले आणि तिथून त्यांचं पार्थिव डोणजे येथील फार्महाऊसमध्ये आणलं आणइ त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
