‘वी कॅनॉट अ‍ॅफोर्ड टू बी पोस्ट-ट्रथ’ असं मल्लिका साराभाईंसारखी मनस्वी कलाकार म्हणते तेव्हा ‘सत्योत्तर’ची जाणीव अधिक धारदारपणे समोर येते.

कलेत शिरलेल्या ‘सत्योत्तर’ अभिनिवेशाची झलक ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’च्या निमित्ताने लगेचच मिळते..

कला ही केवळ मनोरंजनासाठी असता कामा नये. कलेतून काहीतरी सांगितलं गेलं पाहिजे, असं मल्लिका साराभाईंसारख्या मनस्वी कलाकाराला वाटतं. गेल्या आठवडय़ात एका कार्यक्रमादरम्यान मल्लिका साराभाई यांची भेट झाली आणि याच विषयावर त्यांच्याशी संवाद साधता आला. पोस्ट-ट्रथ अर्थात सत्योत्तर समाजातला कलाकार द्रष्टा असणं किती गरजेचं आहे याची जाणीव हा संवाद करून गेला.
मल्लिका एक नृत्य कलाकार म्हणून मोठय़ा आहेतच, पण त्याहून जास्त कार्यकर्त्यां आहेत. बाई मोठी धडाडीची. नुसतं बोलून न थांबता त्या दृष्टीने प्रयत्न करणारी. व्यवस्थेविरुद्ध बोलणारे अनेक जण असतात. पण ती बदलावी, यासाठी प्रयत्न करणारे अगदी थोडे. वादविवादासाठी हिरिरीने तात्त्विक मतं मांडणारे अनेक पण तत्त्वासाठी झगडणारे, त्यानुसार जगणारे अगदी थोडे. अशा थोडय़ांमधली एक कलाकार. आपल्यापैकी प्रत्येक जण जाता-येता राजकारण कसं आणि किती गलिच्छ आहे यावर मतं मांडत असतो. नेते नालायक आहेत, असं सांगत फिरत असतो, पण निवडणुकीत मत देण्यासाठी बाहेर पडणंही यापैकी अनेकांच्या जीवावर येतं. व्यवस्था बदलासाठी काहीतरी करणं, व्यवस्थेत सामील होणं तर दूरची गोष्ट. या बाई नुसत्या नावं ठेवून थांबत नाहीत, निषेध नोंदवून थांबत नाहीत, त्यापुढे जाणारे त्यांचे प्रयत्न असतात. देशातील प्रमुख पक्षाच्या बडय़ा नेत्याच्या विरोधात निवडणूक लढवणं असो वा सरकारविरोधात जनहित याचिका दाखल करणं असो मल्लिका साराभाई निडरपणे हे सगळं करत असतात. त्याबरोबरीने कुचिपुडी आणि भरतनाटय़म या शास्त्रीय नृत्याच्या माध्यमातून समकालीन समाजावर टिप्पणी करणंही सुरू असतं. नृत्यातून प्रभावीपणे संवाद साधणारी ही कलाकार स्वतला ‘कम्युनिकेटर’ म्हणवून घेते. सत्योत्तर काळात तर असं कम्युनिकेशन अगदी आवश्यक, नाहीतर एकच बाजू सत्य म्हणून लादली जाण्याचा धोका असतो.

कला ही आत्मसुखाय न राहता समाजासाठी असली पाहिजे, अशी आग्रही मांडणी मल्लिका साराभाई करतात. याच विचारावर बोलताना त्या म्हणतात की, कलेतून काहीतरी सांगितलं गेलं पाहिजे. ती केवळ मनोरंजनासाठी नको. सध्याचा काळ मोठा विचित्र आहे. कलाकारांना, पत्रकारांना केवळ लोकांचं मनोरंजन करून चालणार नाही. आपल्याला हे परवडणारच नाही. समानतेची, समन्यायाची प्रत्येक कल्पना उचलून धरणं आपलीच जबाबदारी आहे. आपल्या कलेतून, लिखाणांतून, कार्यक्रमातून केवळ एक व्यक्ती जरी वेगळा विचार करायला शिकली तरीही आपल्याला अपेक्षित परिणाम साधला असं म्हणता येईल. अपेक्षित बदल तेव्हाच घडेल जेव्हा आपण यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहू. बोलायला हवं, तर बदल घडेल. अ‍ॅक्शन असेल तर रिअ‍ॅक्शन उमटेल. ‘वी कॅनॉट अफोर्ड टू बी एन्टरटेनर्स अ‍ॅण्ड वी कॅनॉट अफोर्ड टू बी पोस्ट-ट्रथ..’

पोस्ट-ट्रथ या शब्दाची धार या संवादातून तीव्र झाली. मग जागोजागी या सत्योत्तर काळाची, या काळातल्या समाजाची उदाहरणं दिसायला लागली. ऑक्सफर्ड डिक्शनरीतर्फे दरवर्षी एका शब्दाची निवड ‘वर्ड ऑफ द इअर’ म्हणून केली जाते. यंदा ‘पोस्ट-ट्रथ’ हा शब्द ‘वर्ड ऑफ द इअर २०१६’ ठरला. हा शब्द नव्हे, ही संकल्पना आहे, खरं तर एक काळाचा टप्पा आहे, असं म्हणावं लागेल. शब्दकोशाने सांगितलेला याचा अर्थ म्हणजे घडामोडींची संगती तथ्याला धरून न लावता भावनेला हात घालत श्रद्धेला धरून लावणे आणि त्याचा समाजमनावर तथ्यापेक्षा अधिक प्रभाव पडणे आणि त्यानुसार जनमत तयार होत जाणे. पोस्ट-ट्रथ हा शब्द जगभरात राजकीय संदर्भात जास्त वापरला जातो. वर्षभरापूर्वीपर्यंत ब्रिटन युरोपीय महासंघाचा भाग असावा असं वाटणारा समाज एकदम या महासंघातून बाहेर पडायचं मत देऊन मोकळा होतो आणि सर्वसमावेशक, धर्मनिरपेक्ष आणि बहुसांस्कृतिक असण्याचा अभिमान बाळगणारी महासत्ता अचानक ‘यू आर फायर्ड’ म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्पच्या हाती राज्यकारभार सोपवते, ही या सत्त्योत्तर जमान्याची किमया. आपल्याकडे भावनांचं राजकारण नवीन नव्हतंच कधी. पण आता ते प्रकर्षांनं जाणवतंय कारण मुद्दय़ांऐवजी या प्रपोगंडय़ावरच निवडणुका जिंकल्या जाताहेत.

कलाही ‘पोस्ट-ट्रथ’मध्ये अडकवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तथाकथिक परंपरा आणि संस्कृतीचा उदोउदो करत वेगळा विचार मांडणाऱ्यांना गप्प करायचे प्रयत्न होताहेत. ज्यांच्या वतीने आवाज उठवला गेलाय, त्यांना समजूही नये की, आपल्याला गप्प केलं गेलंय इतकं हे सहाजिक वाटतंय या सत्यापार काळात. मल्लिका साराभाईंशी भेट, त्या भेटीत पोस्ट-ट्रथची झालेली चर्चा यानंतर दोनच दिवसांत ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’चा वाद कानावर पडतो आणि सत्योत्तर काळ आपल्या कलेसाठी नवा नाही, हेच उमगतं.

‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या नावाच्या चित्रपटावर सेन्सॉर बोर्डाने बंदी घातली ही बातमी गेल्या आठवडय़ात वाऱ्यासारखी पसरली होती. चित्रपटाला कुठलं प्रमाणपत्र द्यायचं हे ठरवायच्या ऐवजी चक्क चित्रपटावर बंदीच घातली बोर्डाने. असं काय खटकलं सेन्सॉर बोर्डाला चित्रपटात? स्त्रीच्या उघडपणे बोलू नयेत अशा इच्छा-आकांक्षांबद्दल हा चित्रपट थेट बोलणारा असावा असं याच्या ट्रेलरवरून जाणवतं. संस्कृतिरक्षक बोर्डाला नेमकं हेच नको असावं. स्त्रियांनी का असं उघडपणे व्यक्त व्हायचं असतं? बोर्डाचं जे पत्र समाजमाध्यमांवर व्हायरल झालंय त्यात चित्रपटबंदीचं कारण लिहिलंय – ‘हा स्त्रीकेंद्रित चित्रपट आहे आणि स्त्रियांच्या कल्पनारम्य आकांक्षांविषयी आहे. त्यात काही अश्लील संभाषणं आहेत आणि दृश्य आहेत. ती विशिष्ट समाजाच्या भावना दुखावू शकतात.’ मुळात पत्रात लिहिलेल्या मजकुराचं ‘स्त्रीकेंद्रित’ हे सुधारित भाषांतर झालं. त्या पत्रात यासाठी ‘लेडी ओरिएंटेड’ असा शब्द वापरला आहे. यावर हसावं की रडावं? आता पत्रलेखकाच्या इंग्रजी वकुबाची, शब्द निवडीची चिरफाड करायची नाही ठरवली, तरी या लेडी शब्दाविषयी बोललंच पाहिजे. लेडी म्हणजे सभ्य स्त्री. हे सभ्यासभ्यतेचे नियम ठरवले पुरुषसत्ताक समाजानं. ते आता संस्कृतिरक्षकाच्या भूमिकेत आहेत आणि संस्कृती नेहमी स्त्रियांनीच जपायची असते.

स्त्रीच्या तोंडी अश्लील संवाद, स्त्रियांचं सिगरेटी ओढणं किंवा सेक्सविषयी काही अपेक्षा ठेवत त्याविषयी बोलणं ‘संस्कृती’च्या  आणि ‘सभ्यते’च्या विरोधातच खरं, पण हे सगळं पुरुष करताना आपण कित्येक चित्रपटात बघतोच ना! इथे कुठल्या गोष्टीचं समर्थन करायचा हेतू नाही, पण स्त्रीकडे आपण एक व्यक्ती म्हणून बघूच शकत नाही, हे खरं आहे. स्त्री नेहमीच सभ्य असावी, हेच ठसवलं गेलंय. या निर्णयाचं समर्थन करताना सेन्सॉर बोर्डाचे पहलाज निहलानी सत्योत्तर जाणिवेचं अगदी ठसठशीत उदाहरण देताना म्हणतात, की ‘समाजमाध्यमाच्या दबावाला मी बळी पडणार नाही. मी माझं काम करतच राहणार. हिंदुस्तानच्या परंपरेला पुढे नेणारे चित्रपट बनवा. महोत्सवांमध्ये दाखवायला चित्रपट बनवलेत तर नुसत्या टाळ्या वाजतात, थिएटरमध्ये चित्रपट पाहायला कुणी जात नाही.’ पाच स्त्रियांना हा चित्रपट आम्ही दाखवला आणि त्यांनीदेखील हा प्रदर्शित होता कामा नये, असंच मत दिलं, असं बोर्डाच्या वतीने सांगण्यात आलंय. कसं बघवेल हे कुठल्याही स्त्रीला, अशी स्त्री कधी वागू शकते असं त्यांना कल्पनेतही वाटलेलं नाही. कारण असं वागायला ती काय पुरुष आहे असंच मनात येणार त्यांच्या. आपण दुय्यम हे इतकं बिंबवलंय न कळत्या वयापासून की, स्त्री म्हणून विचार करताना व्यक्ती म्हणून विचार करूच शकत नाही ती कधी स्वतचा.

स्त्रीच्या भावना, शारीरिक गरजा, आकांक्षा म्हणजे वासनांचा बाजार. स्त्रियांच्या संवेदना, इच्छा यांची किंमत परंपरेपुढे शून्य, हेच सत्य आणि हेच योग्य असल्याचं बिंबवलं गेलंय. म्हणूनच हिरोबरोबर झाडामागे धावणारी नायिका आपल्याला चालते. आयटेम साँगवर नाचणारी स्त्री चालते. उघडपणे आपल्या लैंगिक गरजांबद्दल बोलायला मात्र तिला बंदी. छान दिसायचं, गोड हसायचं, पुरुषांना खूश ठेवायचं, मुला-बाळांना सांभाळायचं. हे केलं की, ती महान. तिच्या इच्छा दागिने आणि हळदीकुंकू समारंभापुरत्याच ठेवल्या गेल्या. त्यापलीकडे सार्वजनिक जीवनात स्त्रियांचं काम काय, आम्ही देऊ ती मागेल ते, असं म्हणणारे दिलदार पुरुष आणि आमच्या मुलीला अमुक करायची बंदीच आहे आमच्या घरात. बाहेरख्यालीपणा मुलीच्या जातीला चांगला नाही, असं अभिमानाने सांगणाऱ्या संस्कृतिरक्षक सभ्य स्त्रिया आहेतच की आपल्यात. त्यांची तरी काय चूक म्हणा.. सत्योत्तर काळात हे असंच चालायचं. काळच असा आहे- पोस्ट-ट्रथ!

सौजन्य- लोकप्रभा
अरुंधती जोशी ट्विटर- @aru001
response.lokprabha@expressindia.com