बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत आता गोठ्यामध्ये गायींचे दुध काढताना व शेतामध्ये ट्रॅक्टरने नांगरणी करताना दिसणार आहे. छोट्या पडद्यासाठी एका रिअँलिटी शोचा भाग म्हणून मल्लिकाने एका खेड्यामध्ये हे चित्रीकरण पार पाडले.
‘द बॅचलरेट इंडिया-मेरे खयालोंकी मल्लिका’ या रियालिटी शोच्या चित्रिकरणासाठी ३६ वर्षीय मल्लिका हरियाणामधील धानी कुंदनपूरा या गावामध्ये गेली होती. मल्लिकाने सुरक्षेच्या कारणावरून या ठिकाणापासून जवळच असलेल्या तिच्या स्वत:च्या मोथ या जन्मगावाला भेट देणे आता पर्यंत टाळले होते.      
मल्लिकाचा स्वयंवर असलेल्या ‘द बॅचलरेट इंडिया-मेरे खयालोंकी मल्लिका’ या रियालिटी शोमध्ये सहभागी झालेल्या तिनही स्पर्धकांना मल्लिकाने गायीच्या धारा काढायला लावल्या व ट्रॅक्टर देखील चालवायला लावला. त्या नंतर ‘मर्डर’ स्टार मल्लिकाशी स्वयंवर करण्यासाठी उत्सुक असणाऱ्या स्पर्धकांना सोबत घेत मल्लिकाने गायींसाठी चारा कापण्याचे काम केले.      
दरम्यान, मल्लिकाने तिच्या हरियाणा राज्यामध्ये होत असलेल्या स्त्रीभृण हत्या व ऑनर किलींग या सामाजिक विषयांवर देखील चर्चा केली. मल्लिकाने स्त्रीभृण हत्या व ऑनर किलींगला “रानटी आणि लाजिरवाणी कृत्ये” असल्याचे म्हटले.
“ऑनर किलींग अतिशय लाजिरवाणी आणि त्रासदायक बाब आहे. मला स्त्रीभृण हत्या संपवण्यासाठी कामकरायचे आहे,” असे मल्लिका म्हणाली.  
मोथ गावामध्ये मल्लिकाला पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. या गर्दीचा फायदा घेत एका पाकिटमाराने मल्लिकाचे वडिल मुकेश लांबा यांच्याच पाकिटावर हात मारून ७,५०० रूपये आणि दोन एटीएम कार्ड पळवली असल्याचे पोलिसांनी सांगितले.   
या गोंधळामध्ये मल्लिकाच्या टीममधील एका सहकाऱ्याचा ‘आयफोन’ गहाळ झाला. खरे नाव रिमा लांबा असलेल्या मल्लिकाने तब्बल १५ वर्षांनी तिच्या जन्मगावाला भेट दिली.