Mallika Sherawat Marathi Video on Tukaram Mundhe: महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची धुरा सांभाळल्यापासून सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यात भेसळखोरांविरोधात जोरदार धडक मोहीम सुरू केली. त्यांच्या या कडक कारभाराची सर्वत्र चर्चा आहे. सेलिब्रिटी, खेळाडू, उद्योगपती, राजकारणी ते सामान्य माणूस मुंढेंच्या कार्याचे कौतुक करताना दिसतो. आता बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतनेही मुंढेंच्या कामाचे भरभरून कौतुक केले आहे. मल्लिकाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत तुकाराम मुंढे यांचे विशेष आभार मानले आहेत.

आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करताना मल्लिका इडली खाताना दिसत आहे. या व्हिडिओत तिने तुकाराम मुंढे यांच्या कार्यशैलीचा उल्लेख केला. व्हिडीओच्या सुरुवातीला ती मराठीत म्हणते, “तुकारामजी तुम्ही जे काम केले ते छान केले आहे.”

मल्लिका शेरावत पुढे म्हणाली, “तुमच्यामुळे आता मी निर्धास्तपणे आणि शांतपणे जेवण खाऊ शकते. तुमचे कडक नियम आणि कार्यपद्धतीमुळे आम्ही सर्वजण सुरक्षित आहोत, याची मला खात्री आहे. तुमच्या नजरेतून काहीही सुटू शकत नाही. तुमचे खूप खूप आभार.”

या व्हिडिओबरोबर मल्लिकाने पोस्टमध्ये लिहिले आहे, “तुकाराम मुंढे सर, तुमचे मनापासून आभार मानायचे आहेत. तुम्ही करत असलेल्या कामाचे खरोखर खूप कौतुक वाटते.”

सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

मल्लिकाने हा व्हिडिओ शेअर करताच त्यावर सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेकांनी तिच्या मराठी उच्चाराचे कौतुक केले आहे. तुम्ही छान मराठी बोलता, अशा कमेंट काही युझरनी केल्या आहेत. तर अनेकांनी मराठी भाषेत आणखी व्हिडीओ करा, अशी मागणी केली आहे.

आणखी एका युझरने लिहिले, “तुकाराम मुंढे यांच्या कामाचे जाहीर समर्थन करणारी ही पहिलीच बॉलिवूड अभिनेत्री ठरली आहे; आम्हाला तुझा अभिमान वाटतो.” तर दुसऱ्या युझरने “मल्लिका नेहमीच मुद्द्याचं बोलते,” अशी प्रतिक्रिया दिली. ‘सुरक्षित भारत, निरोगी भारत’ अशा शब्दांत अनेकांनी तुकाराम मुंढे यांच्या कारभाराला पाठिंबा दर्शवला असून, मल्लिकाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.

तुकाराम मुंढेंची कारकिर्द नेहमीच चर्चेत

सन २००५ च्या तुकडीतील आयएएस अधिकारी असलेल्या तुकाराम मुंढे यांनी आतापर्यंत विविध विभागांत महत्त्वाची जबाबदारी सांभाळली आहे. आरोग्य, कृषी, परिवहन, पाणीपुरवठा, नियोजन आणि आदिवासी विकास अशा अनेक क्षेत्रांत त्यांनी काम केले आहे. सनदी अधिकारी म्हणून तुकाराम मुंढे यांना २१ वर्षांच्या आपल्या कार्यकाळात तब्बल २५ वेळा बदल्यांना सामोरे जावे लागले आहे. तुकाराम मुंढे यांची आतापर्यंत अनेकवेळा बदली झाली आहे.

मुंढे यांची ओळख ही नियमांवर ठाम राहणारा आणि कठोर निर्णय घेणारा अधिकारी अशी आहे. करोनाकाळात नागपूर महापालिकेचे आयुक्त म्हणून त्यांनी लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी, क्वारंटाईन केंद्रांची उभारणी आणि संसर्ग नियंत्रणासाठी कठोर उपाययोजना राबवल्या होत्या. त्यामुळे काही ठिकाणी नाराजीही निर्माण झाली होती.

अभिनेत्यांवरही कारवाई

बॉलिवूड सेलिब्रिटी एकाबाजूला तुकाराम मुंढेंचे कौतुक करत असले तरी तुकाराम मुंढेंनी विमल इलायचीच्या जाहिरातीविरोधात थेट आघाडीच्या अभिनेत्यांना नोटीस पाठवलेली आहे. विमल इलायची’च्या सरोगेट जाहिरातप्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना अन्न व औषध प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. “तुमच्या दृष्टीने ते सुपरस्टार असतील; परंतु माझ्यासाठी ते केवळ जाहिरातदार आणि कायद्याचे उल्लंघन करणारे लोक आहेत. त्यामुळे कायद्यानुसारच कारवाईची प्रक्रिया पुढे जाईल”, असा रोखठोक पवित्रा तुकाराम मुंढे यांनी घेतला आहे.

गणपतीच्या देखाव्यात तुकाराम मुंढे

तुकाराम मुंढेंची चर्चा घरोघरी पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी पंढरपूरच्या वारीतही संत तुकाराम महाराज यांच्या वेषातील तुकाराम मुंढेंचे बॅनर वारीत झळकवण्यात आले होते. आता गणेशोत्सवात तुकाराम मुंढेंचे काम डेकोरेशनच्या माध्यातून दाखविले गेले आहे. @kavi_shabdanchya_duniyet हा इन्स्टाग्राम युझरने यासंबंधीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

डेकोरेशनमध्ये तुकाराम मुंढे यांनी केलेल्या कारवायांचीही माहिती सुद्धा डेकोरेशन मार्फत देण्यात आली आहे. त्यांनी कोणत्या ठिकाणी आणि किती दिवसांत छापे टाकले, तसेच कोणत्या हॉटेल्स, दुकानांवर आणि कंपन्यांवर कारवाई केली, याचे छोटे-छोटे कटआउट्स आणि वर्तमानपत्रांतील कात्रणे डेकोरेशनचा भाग म्हणून लावण्यात आली आहेत.

मल्लिका शेरावत एकेकाळी गाजलेली अभिनेत्री

मल्लिका शेरावतने आपल्या ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाजाने बॉलीवूडचा एक काळ गाजवला होता. तिचे मादक सौंदर्य आणि पडद्यावरील दमदार अभिनय यांमुळे तिने वेगळी ओळख निर्माण केली. सध्या मल्लिका सिनेविश्वामध्ये ती सक्रिय नसली तरी आजही तिचा चाहता वर्ग मोठा आहे. ग्लॅमरच्या दुनियेत मल्लिका शेरावत या नावाने प्रसिद्ध असली तरी तिचे खरे नाव रीमा लांबा असे आहे.

अभिनेता इम्रान हाश्मीबरोबर २००४ साली मल्लिका शेरावतचा ‘मर्डर’ सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमामधील तिच्या बोल्ड अंदाजामुळे ती प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली. त्यानंतर तिनं ‘बचके रहना रे बाबा’, ‘प्यार के साईड इफेक्ट्स’, ‘शादी के साईड इफेक्ट्स’, ‘वेलकम’ अशा चित्रपटांमध्ये काम केले. सध्या ती चित्रपटात फारशी सक्रिय नसली तरी विविध रिॲलिटी शोमधून ती झळकत असते.