बऱ्याच काळासाठी चित्रपटांपासून दूर राहिलेली अभिनेत्री मल्लिका शेरावतने पुनरागमन केले आहे, चर्चेत राहण्यासाठी नेहमीप्रमाणे आपल्याबरोबर वादालादेखील आमंत्रण दिले आहे. शरिराभोवती तिरंगा रंगाचे कापड गुंडाळून अॅम्बेसिडर गाडीच्या टपावर बसलेल्या मल्लिकाचे ‘डर्टी पॉलिटिक्स’ या तिच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रसिध्द झाले आहे. या पोस्टरमध्ये पार्श्वभूमीवर राजस्थान विधानभवन दाखविले असून, अंगावर थोडफार तिरंगा रंगाचे कापड गुंडाळलेली आणि हातात सीडी असलेली मल्लिका निदर्शनास पडते. या पोस्टरवरून लोकांमध्ये प्रचंड क्रोध निर्माण झाला आहे, खास करून राजस्थानमधील जनतेत याचे प्रमाण जास्त आहे. भांवरी देवीच्या सत्यघटनेवरून प्रेरणा घऊन या चित्रपटाची निर्मीती करण्यात आल्याचे दिग्दर्शक के. सी. बोकाडीया यांचे म्हणणे आहे. २०११ साली भांवरी देवी गायब झाली होती, जिच्या शरिराच्या सापळ्याचे अवशेष २०१२ साली सापडले होते. तिचे एका राजकीय नेत्याबरोबर संबंध होते, पैसे न दिल्यास त्यांच्यातील संबंध दर्शविणारी सीडी माध्यामांकडे देण्याची धमकी तिने या राजकीय नेत्याला दिली होती. भांवरी देवी अचानक गायब झाल्यानंतर तिच्या पतीने सदर राजकीय नेत्यावर तिच्यावर बलात्कार केल्याचा आणि तिचा खून केल्याचा आरोप केला होता.
दिग्दर्शक के. सी. बोकाडीया यांच्या या चित्रपटात जॅकी श्रॉफ, अनुपम खेर, ओम पुरी आणि अतुल कुकर्णीदेखील काम करत आहेत.