मैत्री, धमाल, वेडेपणा आणि नॉस्टॅल्जियाने भरलेल्या एका भन्नाट ट्रिपची गोष्ट आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. दिग्दर्शक विजू माने यांचा आगामी ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ हा चित्रपट येत्या ३१ जुलैला प्रदर्शित होणार आहे. यामध्ये कुशल बद्रिके, अभिजीत चव्हाण आणि संतोष जुवेकर ही ‘स्ट्रगलर साला’मधून लोकप्रिय झालेली तिकडी पुन्हा एकदा एकत्र झळकणार आहे. यानिमित्ताने या कलाकारांनी लोकसत्ताच्या डिजिटल अड्डाला उपस्थिती लावत दिलखुलास संवाद साधला.
अंकुश खऱ्या आयुष्यात कधीही अपशब्द वापरत नाही किंवा शिव्याही देत नाही. ‘स्ट्रगलर साला’ सीरिजचे एपिसोड काही प्रमाणात शिवराळ असायचे त्यामुळे, अंकुश या सीरिजमध्ये सहभागी झाला नव्हता. पण, जेव्हा आमच्या टीमने सिनेमा करायचा निर्णय घेतला तेव्हा अंकुशला विचारलं असं दिग्दर्शक विजू मानेंनी सांगितलं.
‘मामाच्या गोव्याला जाऊया’ टीमशी संवाद पाहा…
‘असा’ आहे ट्रेलर
‘मामाच्या गोव्याला जाऊया’ ट्रेलरची सुरुवात गोव्याच्या मजेशीर ट्रिपने होते. संत्या, बाबा, कुश्या आणि मामा यांची भन्नाट केमिस्ट्री, त्यांच्या धमाल गंमती-जंमती आणि सतत ओढवणारे गोंधळ पाहत असतानाच कथा अचानक वेगळ्याच वळणावर पोहोचते. अंकुश चौधरी साकारत असलेला साधा, भोळाभाबडा आणि निरागस मामा एका क्षणात डॉनच्या अवतारात समोर येतो आणि ट्रेलरचा संपूर्ण रंगच बदलून जातो.
कुशल बद्रिके, अभिजित चव्हाण, संतोष जुवेकर आणि अंकुश चौधरी यांची अफलातून केमिस्ट्री हा ट्रेलरचा मोठा प्लस पॉइंट ठरते. त्यांच्यातील संवाद, टायमिंग आणि धमाल प्रसंग प्रेक्षकांना खळखळून हसवतात. नेटकऱ्यांनी या ट्रेलरवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. चाहते अंकुशचा सुरुवातीचा लूक अन् नंतर त्याचं डॉनचं रूप पाहून थक्क झाले आहेत.
त्याचबरोबर महेश मांजरेकर, संजय जाधव, सचिन गोस्वामी, मकरंद अनासपुरे, अवधूत गुप्ते, मकरंद देशपांडे आणि प्रवीण तरडे यांच्या दमदार भूमिका चित्रपटाची उत्सुकता आणखीनच वाढवतात. नेहा खान, रुचिरा जाधव आणि विदुला चौगुले यांचा ग्लॅमरस अंदाजही ट्रेलरमध्ये वेगळी रंगत आणतो.
