काही कलाकारांची एखादी भूमिका इतकी लोकप्रिय होते की ते त्यासाठीच ओळखले जातात. अशीच एक दाक्षिणात्य अभिनेत्री आहे. तिचं नाव अंजू. बालकलाकार असताना ती बेबी अंजू म्हणून ओळखली जायची. ‘किलीये किलीये’ आणि ‘थुंबी वा थुंबाकुडथीन’ या मल्याळम गाण्यांमधील चिमुरडी म्हणजेच अंजू होय. अवघ्या १३ व्या वर्षी तिने मुख्य अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं होतं. पण तिने १७ व्या वर्षी तिच्याहून ३१ वर्षांनी मोठ्या अभिनेत्याशी लग्न केलं आणि तिचं आयुष्यच बदललं.
अंजूने दोन वर्षांची असताना ‘उथिरीपुक्कल’ (१९७९) या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं होतं. ती मुळची तामिळनाडूची होती. तिने रजनीकांत यांच्या ‘पोल्लाधवन’ आणि कमल हासन यांच्या ‘उल्लासा परावईगल’ सारख्या मोठ्या चित्रपटांमध्ये काम करून यश मिळवलं. मग तिला मल्याळम इंडस्ट्रीतून ऑफर येऊ लागल्या. १९८२ हे वर्ष तिच्यासाठी खूप महत्त्वाचं ठरलं. त्यावर्षी तिने ‘आ रात्री’, ‘ओलांगल’ आणि ‘ओर्माक्काई’ सारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं. ‘आ रात्री’ चित्रपटात तिने सुपरस्टार मम्मुट्टी यांच्या मुलीची भूमिका साकारली होती.
बालकलाकार ते राज्य पुरस्कार विजेती अभिनेत्री
१९८५ पर्यंत अंजूने खूप काम केलं. ‘कट्टाथे किलिकूडू’, ‘सागरम शांतम’, ‘ओमाना थिंगल’, ‘कोडथी’ आणि ‘राक्षसू’ हे तिचे चित्रपट खूप गाजले. मल्याळम चित्रपटांसह तिने तमिळ आणि काही तेलगू चित्रपटांमध्येही भूमिका केल्या.
१९८९ मध्ये ‘रुक्मिणी’ या चित्रपटात अंजूने वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. तिच्या या भूमिकेचं खूप कौतुक झालं. तिला ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’चा केरळ राज्य चित्रपट पुरस्काराचा पुरस्कार मिळाला. नंतर तिला ‘थाझवरम’ या क्लासिक चित्रपटात मोहनलाल यांच्या पत्नीची भूमिका मिळाली. तिने मम्मुट्टी यांच्याबरोबर ‘नीलगिरी’ मध्ये महत्त्वाची भूमिका साकारली, तर ‘किझाक्कन पाथ्रोस’ मध्ये तिने त्यांच्या बहिणीची भूमिका केली.
त्या भूमिकेसाठी मम्मुट्टींचा विरोध
यादरम्यान प्रसिद्ध दिग्दर्शक के. बालचंदर यांनी ‘अळगन’ या तमिळ चित्रपटात मम्मुट्टी यांची हिरोईन म्हणून अंजूला घ्यायचं ठरवलं होतं, पण मम्मुट्टी यांनी खूप विरोध केला. अंजू अजूनही एक बालकलाकारच आहे, त्यामुळे ती आपल्या जोडीदाराच्या भूमिकेत योग्य दिसणार नाही, असं त्यांचं मत होतं. म्हणून त्या भूमिकेसाठी अखेर मधुबालाची निवड करण्यात आली होती.

जेव्हा मम्मुट्टी अंजूला भेटले…
काही वर्षांनी ‘नीलगिरी’ चित्रपटाच्या सेटवर मम्मुट्टी अंजूला भेटले, तेव्हा त्यांना जाणवलं की अंजू आता लहान राहिली नसून मोठी झाली आहे. ‘अळगन’ चित्रपटातून तिला काढल्याबद्दल मम्मुट्टी यांनी खेद व्यक्त केला. मग त्यांनी स्वतः पुढच्या चित्रपटासाठी अंजूचे नाव सुचवले. अशा प्रकारे, मम्मुट्टी यांच्या मुलीची आणि बहिणीची भूमिका साकारल्यानंतर, अंजूने ‘कौरवर’ या गाजलेल्या गँगस्टर चित्रपटात त्यांच्या पत्नीची भूमिका साकारली.
अंजूने पुढे ‘एझारा पोन्नाना’, ‘उटीपट्टणम’, ‘वराफलम’, ‘मिन्नाराम’ आणि ‘नरिमन’ यांसारख्या अनेक चित्रपटांत महत्त्वाच्या भूमिका केल्या. मात्र, बालकलाकार आणि मुख्य अभिनेत्री म्हणून मोठ्या सुपरस्टार्सबरोबर काम करूनही तिला मिळालेल्या या संधीचा ती फायदा घेऊ शकली नाही. हळूहळू तिला मल्याळम सिनेमाच्या ऑफर येणं कमी झालं. मग तिने तमिळमध्ये काम सुरू ठेवलं.
अंजूचे १७ व्या वर्षी लग्न आणि घटस्फोट
अंजूने वयाच्या १७ व्या स्वतःपेक्षा ३१ वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेत्याशी लग्न केलं. तिच्या या निर्णयाचा सर्वांनाच धक्का बसला. अंजूने कन्नड आणि तेलगू चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते टायगर प्रभाकर यांच्याशी लग्न केलं. तेव्हा अंजू १७ वर्षांची तर प्रभाकर ४८ वर्षांचे होते. या जोडप्याला अर्जुन नावाचा मुलगा झाला. मात्र, ‘मनोरमा ऑनलाइन’नुसार, लग्नानंतर अंजूला समजलं की ती प्रभाकर यांची चौथी पत्नी आहे. प्रभाकर यांचे इतर स्त्रियांशी असलेले संबंध आणि इतर काही कारणांमुळे त्यांचं लग्न फक्त दीड वर्षातच मोडलं.
अंजू आता मालिकांमध्ये करतेय काम
‘आयड्रीम फिल्मनगर’ला दिलेल्या मुलाखतीत अंजूने कबुल केलं होतं की, या लग्नाने तिला इतका मानसिक त्रास दिला की तिने पुन्हा कधीही लग्न करण्याचा विचार केला नाही. तिने कुटुंबाच्या मदतीने सिंगल मदर म्हणून आपल्या मुलाचा सांभाळ केला. मुलगा मोठा झाल्यानंतर अंजूने अभिनयात पुनरागमन केलं. मागील काही वर्षांपासून ती मल्याळम आणि तमिळ मालिकांमध्ये काम करतेय.
