scorecardresearch

‘मन उडू उडू झालं’ मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर इंद्रा-दिपू भावूक, पोस्ट शेअर करत म्हणाले…

नुकतंच हृता दुर्गुळे हिने एक पोस्ट शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

‘मन उडू उडू झालं’ मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर इंद्रा-दिपू भावूक, पोस्ट शेअर करत म्हणाले…
मन उडू उडू झाला

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणून ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेकडे पाहिले जाते. सध्या ही मालिका चांगलीच लोकप्रिय ठरताना दिसत आहे. या मालिकेत इंद्रा आणि दिपूची हटके लव्हस्टोरी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. या मालिकेत अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि अभिनेता अजिंक्य राऊत यांची पात्र अल्पावधीतच प्रेक्षकांना आवडली होती. नुकतंच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. यावर प्रेक्षकांसह मालिकेतील अनेक कलाकारांनी भावूक पोस्ट शेअर केल्या आहेत. नुकतंच हृता दुर्गुळे हिने एक पोस्ट शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हृता दुर्गुळे हिने या मालिकेत दीपिका देशपांडे हे पात्र साकारले होते. मालिका संपल्यानंतर हृताने मालिकेतील एका रोमँटिक क्षणाचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे. याला तिने खास कॅप्शनही दिले आहे. “मला मिळालेल्या या संधीसाठी मी झी मराठीची कायमच कृतज्ञ असेन. माझ्यातील काहीसा भाग मागे ठेवत आहे. पण काही सर्वोत्तम माणसांसोबतच्या अनेक आठवणी माझ्यासह घेऊन जातेय”, असे तिने या पोस्टला कॅप्शन देताना म्हटले आहे.
‘मन उडू उडू झालं’ मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप, कारण आले समोर

त्यासोबतच अजिंक्य राऊत यानेही ‘मन उडू उडू झालं’चे दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करताना अजिंक्य राऊतने मालिकेच्या सेटवरील एक फोटो पोस्ट केला आहे. त्यात अजिंक्य राऊत म्हणाला, “आणि माझं आयुष्य बदललं. माझी मंदार देवस्थळी सरांप्रती असणारी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द पुरेसे नाही आहेत. प्रार्थना आणि आशा करतो की मला येणाऱ्या काळात त्यांच्यासह पुन्हा पुन्हा काम करता येईल.”

फक्त अजिंक्य राऊत आणि हृता दुर्गुळे नव्हे तर मालिकेतील इतर कलाकारांनीही ही मालिका संपल्यानंतर भावूक पोस्ट शेअर केल्या आहेत. यात रीना मधुकर, ऋतुराज फडके, श्रावणी कुलकर्णी, अजिंक्य यांनीही पोस्ट करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

या मालिकेतील शेवटच्या भागात कार्तिक-सानिकाला त्यांची चूक कळत असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यानंतर ते दोघेही इंद्रा-दीपूची माफी मागतात. त्यानंतर आता या जोडीचा सुखी संसार सुरू झाला आहे. त्यामुळे इंद्रा आणि दिपूच्या लव्ह स्टोरीचा शेवट गोड दाखवण्यात आला आहे. आता या मालिकेच्या जागी येत्या १५ ऑगस्टपासून नवी मालिका पाहता येणार आहे. दीपा परब, धनश्री काडगावकर यांच्या भूमिका असलेल्या ‘तू चाल पुढं’ ही मालिका ‘मन उडू उडू झालं’च्या वेळेत दाखवली जाणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Man udu udu zhala tv serial off air hruta durgule ajinkya raut share emotional note nrp

ताज्या बातम्या