नसिरुद्दीन शहांच्या भूमिकेत मानव कौल

काही चेहरे असे असतात जे आपले स्वप्न उराशी बाळगून हळूहळू ते सत्यात उतरावे यासाठी प्रयत्न करत असतात.

काही चेहरे असे असतात जे आपले स्वप्न उराशी बाळगून हळूहळू ते सत्यात उतरावे यासाठी प्रयत्न करत असतात. त्यांना मुक्कामाला पोचायची घाई नसते. किंबहुना, मुक्कामापर्यंतचा जो वळणावळणांचा प्रवास आहे तोच त्यांच्यासाठी महत्त्वाचा असतो. मध्य प्रदेशमधील काश्मिरी पंडिताच्या घरात जन्मलेला कोणी एक मानव कौल रंगभूमीच्या प्रवाहात योगायोगाने सामील झाला. आणि मग अभिनयाच्या ध्येयाने झपाटून त्यानेही मुंबई गाठली. गेली १४ र्वष मानव बॉलीवूड नामक इंडस्ट्रीत कार्यरत आहे. मात्र एक सक्षम अभिनेता म्हणून त्याची ओळख लागोपाठ आलेल्या त्याच्या अवघ्या दोन चित्रपटांनी करून दिली आहे. ‘काय पो चे’ आणि ‘सिटीलाइट’ या दोन्ही चित्रपटांमधून मानवमधील कलाकाराला इंडस्ट्रीने पंसतीची पावती दिली. आता ‘सोलो’ भूमिकेत शिरायचे स्वप्न पाहणारा मानव नसिरुद्दीन शहांनी गाजवलेली भूमिका पुन्हा जिवंत करणार आहे.
‘काय पो चे’ या अभिषेक कपूरच्या चित्रपटाने आपल्याला अभिनेता म्हणून ओळख करून दिली. मात्र हंसल मेहता दिग्दर्शित ‘सिटीलाइट’ चित्रपटातील विष्णूच्या भूमिकेने एक कलाकार म्हणून खरी प्रशंसा मिळवून दिली, असे मानवने सांगितले. एकाच वेळी रंगभूमीवरचा दिग्दर्शक, लेखक आणि आता अभिनेता या तिन्ही आघाडय़ांवर वावरताना आजही आपल्यातला दिग्दर्शक अभिनेत्यापेक्षा जास्त वरचढ असतो. त्यामुळेच असेल पण एक दिग्दर्शक म्हणून मी नेहमी मोजक्या कलाकारांना भेटतो, त्यांना कथा वाचून दाखवतो किंवा भूमिकेविषयी विचारणा करतो. आज एक कलाकार म्हणून माझ्याबाबतीत तोच प्रकार होतो. त्यामुळे आजवर मी इंडस्ट्रीतील लोकांपर्यंत एक कलाकार म्हणून पोहोचू शकलो नाही, अशी खंत त्याने व्यक्त केली. मात्र आता चित्रपटांवरच लक्ष कें द्रित करायचा निर्णय घेतला असल्याने स्वत:च निर्माता-दिग्दर्शकांना भेटणं, ऑडिशन्स देणं सुरू असल्याचे तो सांगतो. पण यालाही मर्यादा आहेत. कारण इतकी र्वष रंगभूमीवर वावरलेलो असल्याने कोणते चित्रपट करायचे, कोणत्या दिग्दर्शकांना भेटायचं याची माझी काही गणितं आहेत. गेल्या काही वर्षांत माझ्याकडे ऑफर्सच आल्या नाहीत असे झाले नाही. पण माझं सगळं लक्ष होतं अनुराग कश्यप, हंसल मेहतांसारख्या दिग्दर्शकांवर.. हंसलचा ‘शाहीद’ हा चित्रपट बघितला तेव्हाच त्यांना भेटून मी ऑडिशन दिली आणि काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर वर्षभराने माझ्या हातात ‘सिटीलाइट’ चित्रपट होता, असे मानवने सांगितले.
‘सिटीलाइट’ चित्रपटात त्याच्या भूमिकेसाठी त्याचे कौतुक झाले. मात्र याचे श्रेय तो दिग्दर्शक हंसल मेहता आणि चित्रपटातील त्याचा सहकलाकार राजकुमार यादवला असल्याचे तो सांगतो. राजकुमार इतको सहज आणि चांगला अभिनय करतो. त्याच्याकडून सहज क्रिया झालेली असते त्यावर तुम्हाला तुमची उत्तम प्रतिक्रिया द्यायची असते. दोन कलाकारांमधली अभिनयाची ही जुगलबंदी खरे तर राजकुमारसारख्या चांगल्या अभिनेत्याच्या साथीनेच होऊ शकते, असे मानव म्हणतो. या चित्रपटामुळे त्याला बॉलीवूडची मोठी कवाडे खुली झाली आहेत, तीही त्याच्या मनपसंत दिग्दर्शकांकडून. ‘कहानी’ फेम दिग्दर्शक सुजॉय घोषच्या आगामी थ्रिलर चित्रपटात मानवला महत्त्वाची भूमिका मिळाली आहे. मात्र त्याचे लक्ष लागले आहे ते त्याची सोलो भूमिका असलेल्या चित्रपटाकडे. नसिरुद्दीन शहांनी गाजवलेला चित्रपट ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है.’ या चित्रपटाचा रिमेक आम्ही करत आहोत. आणि यात नासिरजींची भूमिका करायची संधी मला मिळाली. या चित्रपटाबद्दल आपल्याला जास्त उत्सुकता असल्याचे त्याने सांगितले. चित्रपटांबरोबरच नाटकातही तो अजून तितकाच सक्रिय आहे. रवींद्रनाथ टागोर यांच्या आयुष्यावर आधारित ‘कलर ब्लाईंड’ या नाटकाचे दिग्दर्शन मानवने केले असून ‘कल की कोचलिन’ या नाटकात मुख्य भूमिका करते आहे. सध्या हे नाटक रंगभूमीवर दाखल झाले आहे. त्यामुळे त्यात अडकून पडावे लागत नाही. नाटकात मी लेखक असतो, दिग्दर्शक असतो. जवळपास सगळ्या भूमिका मी करतो. मात्र आता चित्रपटांवरच लक्ष केंद्रित करायचे आहे, असे त्याने सांगितले. चित्रपटात काम करताना तुम्हाला बाकीचे सगळे उद्योग सोडून द्यावे लागतात. भोपाळमध्ये शाळेच्या निमित्ताने माझी रंगभूमीशी नाळ जोडली गेली आणि मी मुंबईत आलो. आता चौदा वर्षांनंतर एक नवा अध्याय माझ्या आयुष्यात सुरू झाला आहे, असे सांगणाऱ्या मानवने आता या नव्या अध्यायाला दूरवर न्यायचा मानस व्यक्त केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Manav kaul in naseeruddin shahs role

Next Story
चित्रगीत : सॅक्रेड चॅण्टस ऑफ शक्ती
ताज्या बातम्या