अभिनेत्री कंगना रणौतचा बहुचर्चित व बहुप्रतिक्षित चित्रपट ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’चा टीझर मंगळवारी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात कंगना झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची भूमिका साकारत आहे.

अमिताभ बच्चन यांच्या दमदार आवाजाने ‘मणिकर्णिका’च्या टीझरची सुरुवात होते. इंग्रजांनी कशाप्रकारे भारतात प्रवेश केला आणि त्यांच्याविरुद्ध झाशीच्या राणीने कशाप्रकारे लढा दिला हे ते सांगतात. झाशीच्या राणीच्या भूमिकेतील कंगना या टीझरमध्ये विशेष लक्ष वेधून घेते. तलवारबाजी करणारी, मांडीवर बाळाला घेऊन राजगादी सांभाळताना, घोडदौड करणारी झाशीची राणी या टीझरमध्ये पाहायला मिळत आहे.

चित्रपटाच्या घोषणेपासूनच ‘मणिकर्णिका’ बऱ्याच कारणांमुळे चर्चेत राहिला. चित्रपटाच्या कथानकावरून त्याला आधी विरोध करण्यात आला. त्यानंतर दिग्दर्शकांनी चित्रपट अर्ध्यावर सोडला. जेव्हा कंगनाने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली, तेव्हा अभिनेता सोनू सूदनेही काढता पाय घेतला. कंगनाच्या वारंवार हस्तक्षेपामुळे त्याने हा निर्णय घेतल्याची चर्चा होती.

या चित्रपटाचे दिग्दर्शन क्रिश यांनी केले आहे. यामध्ये कंगनासोबतच जिशू सेनगुप्ता, सुरेश ओबेरॉय, डॅनी डॅन्झोप्पा, अतुल कुलकर्णी, अंकिता लोखंडे आणि झीशान अयुब यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. २५ जानेवारी २०१९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

पाहा टीझर-