परिस्थितीमुळे निर्माण होणाऱ्या विनोदी घटनांची मालिका आणि त्यात अडकलेल्या चारजणांची गोष्ट सुशील महादेव दिग्दर्शित ‘मांजर’ या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील कलाकार प्रसिद्ध अभिनेता सयाजी शिंदे, अभिनेत्री भाग्यश्री लिमये, अभिनेता सिद्धार्थ मेनन आणि अभिनेता तेजस राऊत यांनी ‘लोकसत्ता’ कार्यालयाला दिलेल्या भेटीत ‘मांजर’ हेच शीर्षक का? इथपासून चित्रीकरणादरम्यान झालेल्या गमतीजमती, एकत्र कामाचा अनुभव अशा विविध विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या…

‘मांजर’ हेच योग्य शीर्षक

या चित्रपटाचं शीर्षक मांजर का आहे, हे खरंतर चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल. सध्या चित्रपटाच्या प्रोमोमध्ये मांजर दिसते आहे, त्यामुळे मांजर या चित्रपटात महत्त्वाचीच आहे, अशी सुरुवात करत सिद्धार्थने या चित्रपटात खूप घट्ट मैत्री असलेल्या चौघांची गोष्ट पाहायला मिळणार असल्याचं स्पष्ट केलं. मी, तेजस, ओंकार भोजने आणि भाग्यश्री आम्हा चौघांची मैत्री आहे, त्यातही मी आणि भाग्यश्री प्रेमात आहोत, आम्हाला लग्न करायचं आहे, पण काही कारणास्तव ते होत नाही आहे. चित्रपट विनोदी आहे, पण आमची प्रत्येकाची स्वतंत्र व्यक्तिरेखा आहे. प्रत्येकाचं करिअर, त्यांची त्यांची एक गोष्ट आहे आणि शिवाय, मैत्रीचा घट्ट धागा आहे. त्यामुळे वास्तवाशी जोडून घेणाऱ्या व्यक्तिरेखा आणि त्यांच्याबरोबर घडणाऱ्या घटनांमधून उभी राहणारी विनोदी गोष्ट असा हा चित्रपट असल्याचं सिद्धार्थ मेननने सांगितलं.

विविध माध्यमांमधलं अंतर पुसट होत चाललं आहे…

‘घाडगे अँड सन्स’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री भाग्यश्री लिमयेचा ‘मांजर’ हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. मालिकेतून लोकप्रियता मिळाली, पण त्यानंतर चांगल्या भूमिका किंवा कथा फारशा आपल्याकडे आल्या नाहीत, असं तिने सांगितलं. मात्र, त्यानंतर भाडिपा, ‘मुंज्या’ हा हिंदी चित्रपट, वेबमालिका अशा विविध माध्यमांतून प्रेक्षकांसमोर आलेल्या भाग्यश्रीने सध्या ओटीटी प्लॅटफॉर्म्स, भाडिपासारख्या डिजिटल वाहिन्या, दूरचित्रवाणी अशा विविध माध्यमांमुळे कलाकारांना खूप संधी मिळते आहे. आणि या माध्यमांमधलं अंतरही पुसट होत चाललं असल्याने एकच कलाकार कधी रंगभूमीवर, कधी ओटीटीवरचे चित्रपट-वेबमालिका, समाजमाध्यमांवरील छोटेखानी लघुपट, चित्रपटातून एकाच वेळी वैविध्यपूर्ण भूमिका करू शकतो, असं सांगितलं. ‘माझ्या मते कलाकारांनी स्वतःला कुठल्याही एका माध्यमात अडकवून घेणं योग्य नाही. त्यांनी सगळ्या माध्यमांतून काम केलं पाहिजे, नवं काही शोधत राहिलं पाहिजे आणि हे सगळं त्यांना करून पाहता येतं आहे, ही गेल्या दशकभरात घडलेली चांगली गोष्ट आहे’, असं मत तिने व्यक्त केलं.

खूप छान झोप लागते…

‘दशावतार’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सिद्धार्थच्या भूमिकेचं कौतुक झालं. त्याची सध्या झी फाइव्हवर सुरू असलेली ‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’ ही वेबमालिकाही चर्चेत आहे. करिअरच्या या टप्प्यावर मिळालेल्या यशाबद्दल मनात कृतज्ञतेची भावना आहे, असं सिद्धार्थने सांगितलं. ‘या वर्षभरात हिंदी आणि मराठी धरून हा माझा चौथा चित्रपट आहे जो या आठवड्यात प्रदर्शित होतो आहे. पण, माझा कुठला चित्रपट कधी प्रदर्शित होईल, तो लोकांपर्यंत कसा पोहोचेल, हे मी ठरवू शकत नाही. काही चित्रपटांच्या बाबतीत याला चांगला प्रतिसाद मिळायला हवा होता, असं वाटतं. म्हणजे ‘राजवाडे अँड सन्स’ हा चित्रपट चित्रपटगृहात त्यावेळी फारसा चालला नाही, पण आज कुठेही गेलो तर लोक माझ्याशी त्याच चित्रपटातील भूमिकेविषयी बोलतात. त्यामुळे चित्रपट लोकांना कधी, कसा आवडेल हे आपल्या हातात नाही. एखादा चित्रपट चालला नाही, वाईट वाटलं, थोडं रडून घ्यावं… पुन्हा नव्या उत्साहाने काम करावं, इतक्या सहजतेने मी सध्या काम करतो. मला आजवर चित्रपटसृष्टीतील सगळ्यांनी कायम पाठिंबा दिला आहे, प्रेक्षकांनी उचलून धरलं आहे, चांगल्या कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली आहे. यापेक्षा अजून काय हवं?

दहा गोष्टी जर आपल्या मनासारख्या घडल्या नसतील, तरी थोडा विचार केल्यावर लक्षात येतं की तीसेएक गोष्टी छान जमूनही आल्या आहेत. त्यामुळे चुकलेल्या दहा गोष्टी धरून बसण्यापेक्षा चांगल्याचा शोध घेत राहणं, आपलं काम मन लावून करणं महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे सध्या मला झोपही छान लागते’ असं सिद्धार्थने सांगितलं.

मोठं होण्यापेक्षा चांगला माणूस होणं गरजेचं

दाक्षिणात्य, हिंदी-मराठी चित्रपटांतून विविधांगी भूमिका करण्याचा प्रदीर्घ अनुभव गाठीशी असलेल्या सयाजी शिंदे यांनी ‘मांजर’ या चित्रपटात चार तरुण कलाकारांबरोबर काम करताना आपल्या मनात आपण कोणीतरी मोठे आहोत, अशी भावना कधीच नव्हती, असं सांगितलं. ‘माणसाने आयुष्यात मोठं होण्यापेक्षा चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करावा. आपल्याला नेहमी स्वतःतल्या चुका जाणवत असतात, त्या लक्षात घेऊन स्वतःत सुधारणा करत राहिलं की आपल्यातला चांगुलपणा वाढत जातो’, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

झाडांपेक्षा मोठा सेलिब्रिटी नाही…

या जगात झाडांपेक्षा अन्य कोणीही सेलिब्रिटी नाही, असं मत सयाजी शिंदे यांनी व्यक्त केलं. झाड सावली देतं, अन्न-पाणी देतं. आपण ज्या माणसांना सेलिब्रिटी म्हणतो ते भरपूर पैसे कमावतात, गाड्या घेतात, पण समाजाला काही देत नाहीत. आपल्या आयुष्यात आई महत्त्वाची असते, तितकीच महत्त्वाची असतात झाडं. आईमुळे जन्म मिळतो आणि झाडांमुळे त्या जगण्यासाठी लागणारा श्वास… ऑक्सिजन मिळतो. त्यामुळे झाडं लावणं, ती जगवणं हेच महत्त्वाचं आहे, असं त्यांनी नमूद केलं.

दक्षिणेतील कलाकारांच्या वागण्या-बोलण्यात नम्रता जाणवते

सयाजी शिंदे यांचा दक्षिणेतही मोठा चाहतावर्ग आहे. तिथे काम करण्याच्या अनुभवाबद्दल बोलताना हिंदी-मराठीपेक्षा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील वातावरण वेगळं असल्याचं त्यांनी सांगितलं. विशेषतः हिंदीत एकदा कलाकार नावारूपाला आला की त्याचं वागणं बदलतं. अभिनेता विजय थलपतीबरोबर तीन-चार चित्रपट केले आहेत. आपले लेखक अरविंद जगताप यांची एकदा त्याच्याशी गाठभेट घालून दिली. जगताप यांनी आमच्या ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ या चित्रपटाचं पटकथा लेखन केलं आणि तो चित्रपट खूप चालला, अशी माहिती त्याला दिल्यानंतर त्याने खूप आपुलकीने जगताप यांच्याशी संवाद साधला. चिरंजीवी, रजनीकांत यांच्यासारखे महानायक सहकलाकारांबरोबर मिळून मिसळून राहतात. एकदा चित्रीकरणादरम्यान मी झाडाखाली जेवायला बसलो आहे हे रजनीकांत यांनी पाहिलं आणि त्यांनी व्हॅनिटी व्हॅनमध्ये बसून एकत्र जेवण करण्याचा आग्रह धरला. मी त्यांना म्हटलं, ती व्हॅन स्टारसाठी आहे. ते ऐकताच त्यांनी इथे कोणीही स्टार नाही, असं स्पष्टपणे सांगितलं आणि आम्ही व्हॅनमध्ये एकत्र जेवलो. आपल्याच इंडस्ट्रीतील कोणी नवीन चित्रपटकर्मी काही चांगलं करत असेल, तर आवर्जून त्याच्या चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमांना हजर राहणं, त्यांना पाठिंबा देणं हे तिथले नामांकित कलाकार खूप श्रद्धेने करतात, जे मला हिंदीत कधीच पाहायला मिळालं नाही, असा अनुभव त्यांनी सांगितला.

एकमेकांबरोबरच्या संवादामुळे मैत्री पडद्यावर खुलली

अभिनेता तेजस राऊतचा हा तिसरा चित्रपट आहे. त्याने याआधी ओंकार भोजनेबरोबर काम केलं होतं, पण बाकीच्यांशी पहिल्यांदाच ओळख झाली होती. ‘आपापल्या व्यक्तिरेखेबरोबरच सहकलाकाराची व्यक्तिरेखा, त्यांचा एकमेकांशी असलेला संबंध हे चित्रीकरणाआधी समजून घेणं गरजेचं असतं. आणि माझ्या बाबतीत मी सिद्धार्थबरोबर पहिल्यांदाच काम करत होतो. तर त्याच्याशी कसं बोलू? असा प्रश्न माझ्या मनात होता. पण, सिद्धार्थने स्वतःच मला हाक मारून आपल्या व्यक्तिरेखांमधल्या मैत्रीविषयी बोलूयात असं म्हणत सुरुवात केली. या एकमेकांमधल्या संवादाने, चर्चेने ही कागदावरची मैत्री पडद्यावर अधिक खुलली’, असं तेजसने सांगितलं. शिवाय, या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी आम्ही एकत्र राहात होतो, त्याचाही फायदा झाला. काही गोष्टी पटकथेत नसतात, पण तुम्ही त्या समजून घेऊन त्यावर चर्चा केली तर अनेक नव्या गोष्टी तुमच्या हाताला लागतात, असं त्याने सांगितलं.

माझंच चांगलं व्हावं ही धडपड पुढे नेत नाही

मी गेली ४०-५० वर्ष चित्रपटसृष्टीत काम करतो आहे. एक गोष्ट खात्रीने सांगतो, फक्त माझीच व्यक्तिरेखा चांगली व्हावी, त्याच्यापेक्षा माझा संवाद चांगले असावेत, यासाठी धडपडणारे टिकलेले नाहीत, असं सयाजी शिंदे यांनी सांगितलं. ज्या ज्या कलाकारांनी सहकार्याची भावना ठेवून काम केलं त्यांची कारकीर्द दीर्घकाळ सुरू राहिली. नाटक-चित्रपट हे माध्यम असं आहे की तिथे सगळ्यांचं काम उत्तम झालं तर त्याचा योग्य परिणाम साधला जातो. त्यामुळे तुझं काम चांगलं होऊ दे, मग माझं आपोआप होईल, ही भावना महत्त्वाची आहे. त्यामुळे आपण चांगलं होत जाण्यावर भर दिला पाहिजे, हा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला. चरित्रपट करण्याइतकं मोठं काम आपण केलेलं नाही, त्यामुळे त्याचा विचार करणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

तुम्हाला जे आवडतं ते करा…

आपल्या आवडीच्या गोष्टी सातत्याने करत राहिल्या पाहिजेत. झाडाझुडपांविषयी कुतूहल वाटू लागलं तेव्हापासून नवनवीन झाडं, वेलींविषयीची माहिती, रोपं-फळांची लागवड याचा अभ्यास यात रस वाढत गेला. इतकी वर्ष चित्रपट क्षेत्रात असल्याने कुठलीही कथा हातात आली किंवा पाहात असलो तरी पुढे काय होणार, कसं होणार, कॅमेरा कुठे असेल, अशा सगळ्या गोष्टी आधीच लक्षात येतात. त्यात रोमहर्षक असं काही वाटत नाही. उलट, जंगलातली भटकंती, मध्येच एखादा आवाज आल्यानंतर अरे इथे हरण आहे आणि चित्तेही आहेत या जाणिवेने शरीरावर उठणारा रोमांच अधिक खरा वाटतो. त्यामुळे तुम्हाला जे आवडतं आहे ते दुसऱ्यांना त्रास न देता करत राहा, असे अनुभवी बोल सयाजी शिंदे यांनी सांगितले.