अभिनेता मनोज वाजपेयी याची प्रमुख भूमिका असलेली बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत ‘द फॅमिली मॅन २’ ही वेब सीरिज नुकतीच प्रदर्शित झाली आहे. ही सीरिज ४ जून रोजी प्रदर्शित होणार होती. मात्र चाहत्यांमधील उत्सुकता पाहाता निर्मात्यांनी सीरिज चक्क दोन तास आधी प्रदर्शित केली. सीरिज लवकर प्रदर्शित केल्यामुळे चाहत्यांनी ट्विटरद्वारे आनंद व्यक्त केला. ‘द फॅमिली मॅन २’ या सीरिजच्या माध्यमातून तेलुगू सुपरस्टार समांथा अक्किनेनीने हिंदीमध्ये पदार्पण केले आहे.

काय आहे कथा?
दिल्लीला गॅस अटॅकपासून वाचवल्यानंतर श्रीकांत तिवारी (मनोज वाजपेयी)ने ‘टास्क फोर्स’मध्ये काम करणे सोडून दिले. आता श्रीकांत एका आयटी कंपनीमध्ये ९ ते ५ या वेळात काम करताना दिसतो. तसेच आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवताना दिसत आहे. तो पत्नी सुचिला (प्रियमणि) खूश करण्यासाठी स्वयंपाक देखील करताना दिसत आहे. पण हे सगळं करताना श्रीकांत कंटाळलेला असतो आणि त्याला पूर्वीसारखे काही अॅडवेंचरस करायचे असते. दुसरीकडे श्रीकांतला जे.के. तळपदे (शारिब हाश्मी) ‘टास्क फोर्स’मधील अपडेट देत असतो आणि सतत त्याला पुन्हा कामावर रुजू होण्यास सांगत असतो. अखेर रोजच्या आयुष्याला कंटाळलेला श्रीकांत पुन्हा ‘टास्क फोर्स’मध्ये काम करण्यास सुरुवात करतो आणि इथून कथा पूर्णपणे बदलून जाते. सीरिजची कथा चेन्नई, मुंबई, उत्तर श्रीलंका, लंडन अशा विविध ठिकाणांभोवती फिरत आहे. दरम्यान श्रीकांतला राजी (समांथा अक्किनेनी) या क्रूर शत्रूचा सामना करावा लागतो. यापुढे काय होते हे पाहण्यासाठी तुम्हाला ‘द फॅमिली मॅन २’ ही ९ भागांची सीरिज पाहावी लागेल.

जर तुम्ही ‘द फॅमिली मॅन’ या सीरिजचा पहिला सिझन पाहिला नसेल तरी देखील या दुसऱ्या सिझनशी तुम्ही कनेक्ट होउ शकता. या सिझनमधील मनोज वाजपेयी आणि त्याला तोडीसतोड समांथा अक्किनेनीचा अभिनय पाहण्यासारखा आहे. त्यांच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. तसेच सध्या ‘द फॅमिली मॅन २’चा हा सिझन गाजत असल्याचे दिसत आहे.