‘एकटेपणाची भीती वाटते’!

कुटुंबाप्रति तो एवढा समर्पित असतो की त्याची पत्नी आणि मुलगी त्याला नेहमीच गृहीत धरतात.

(संग्रहित छायाचित्र)

भक्ती परब

मनोज वाजपेयी हे नाव ऐकताच त्याचे ‘सत्या’, ‘शूल’, ‘पिंजर’, ‘एलओसी कारगिल’, ‘आरक्षण’, ‘गँग्ज ऑफ वासेपूर’, ‘स्पेशल २६’, ‘नाम शबाना’, ‘अय्यारी’ असे चित्रपट, त्यातील त्याची अभिनेता म्हणून व्यक्तिरेखेवरील जबरदस्त पकड, रावडी, धडाकेबाज अंदाज आणि तेवढाच शांत स्वभाव हे सगळं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. त्याच्या आगामी ‘सत्यमेव जयते’ चित्रपटातून मनोज डीसीपी शिवांशची भूमिका साकारतोय, याविषयी मनोजला बोलतं केलं तेव्हा त्याने सगळ्या प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरं दिली. ‘सत्यमेव जयते’ चित्रपटातील डीसीपी शिवांश आयुष्याकडे गंभीरपणे पाहत नाही.  कुटुंबाप्रति तो एवढा समर्पित असतो की त्याची पत्नी आणि मुलगी त्याला नेहमीच गृहीत धरतात. पण जेव्हा कर्तव्य बजावण्याची वेळ येते तेव्हा सगळे त्याला गंभीरपणे घेतात. अजिबात हार न मानणारी ही व्यक्तिरेखा आहे, असे मनोज सांगतो.

गेल्या काही चित्रपटांमधून भष्टाचार, एकूणच व्यवस्था यावर भाष्य करणारे चित्रपट सातत्याने आले आणि त्यांना प्रतिसादही तितकाच चांगला मिळाला. ‘सत्यमेव जयते’मध्येही पुन्हा एकदा भ्रष्टाचारावरच भाष्य करण्यात आलं आहे. याबद्दल त्याला विचारलं असता, भ्रष्टाचार हा देशाला पुढे जाण्यापासून रोखतो आहे. भ्रष्टाचार करणं खूप सोपं आहे, पण छोटय़ाशा मोहापायी आपण मोठय़ा भ्रष्टाचाराला समर्थन देत असतो, त्यामुळे सगळ्यात आधी आपणच आपल्याला भ्रष्टाचारापासून रोखलं पाहिजे, नाही तर भ्रष्टाचार केव्हाही भीषण स्वरूप घेऊ न आपल्यासमोर ठाकेल, असे मत तो मांडतो. मनोज समाजाप्रति, सामाजिक विषयांबद्दल नेहमी तळमळीने बोलतो. पण अशा प्रकारच्या भूमिका तो सातत्याने करत आला आहे. ‘भूमिका निवडताना ती चांगलीच असली पाहिजे, हा मी विचार करतो. पण या चित्रपटात मी निखिल अडवाणीच्या (निर्माता) मैत्रीपोटी काम करतोय. तो माझा खूप जुना मित्र आहे. त्याच्या सांगण्यावरून मी हा चित्रपट करतोय. कारण मी अशा प्रकारचे व्यावसयिक चित्रपट करत नाही, हे सगळ्यांनाच माहिती आहे. काही मोजकेच व्यावसायिक चित्रपट मी केलेत. त्यातलाच हा चित्रपट आहे, असे म्हणता येईल. पण तरीही या चित्रपटात भूमिका करण्याचं एकमेव कारण निखिल आहे. आम्ही एकमेकांना वचन दिलं होतं की एकत्र काम करायचं. आणि ते मी या भूमिकेच्या माध्यमातून पूर्ण करतोय, असं मनोज पुन्हा पुन्हा सांगतो. मात्र मैत्री हे कारण असलं तरी त्याला दिली गेलेली भूमिका अतिशय सुंदर लिहिली गेली असल्याचं त्याने सांगितलं. ‘आपल्या कर्तव्याप्रति अतिशय जागरूक असणारा हा पोलीसवाला आहे, त्याला सगळे गुन्हेगार घाबरतात. पोलीसी खात्यात त्याला मान आहे. पण दुसऱ्या बाजूला एक असा अपराधी (वीरेंद्रकुमार सिंह-जॉन अब्राहम) आहे, ज्याने पोलिसवाल्यांविरोधात एक लढाई सुरू केली आहे. तर या दोघांमधल्या संघर्षांची ही गोष्ट आहे. पण ही जॉन अब्राहम आणि माझी जुगलबंदी आहे असं म्हणता येणार नाही’, हेही तो स्पष्ट करतो. त्याचं कारणही गमतीशीर आहे. जॉनची शरीरयष्टी पीळदार आहे. त्यामुळे त्याच्यासोबत मैत्री करूनच मी पुढे जाऊ  शकतो. मी तर दुबला-पतला माणूस आहे, असं तो हसत हसत सांगतो. ‘जॉनबरोबर मी याआधी ‘शूटआऊ ट अ‍ॅट वडाला’ हा चित्रपट केला होता. तेव्हापासून आमची दोस्ती आहे.

आत्ताच्या भूमिकांपेक्षा त्याला त्याच्या आधीच्या भूमिकांविषयी विचारल्यावर त्याची कळी अधिकच खुलते. ‘आतापर्यंत मी जेवढय़ा भूमिका केल्यात आणि यापुढेही करेन त्यांना मी कुठेतरी पाहिलं आहे. मी बंगल्यात किंवा पेन्टहाऊ समध्ये राहून आयुष्य जगलो नाही. माझी कायम लोकांमध्ये ऊठबस असते. मी बाजारात जातो, कधी लोकल ट्रेनमधून प्रवास करतो, कधी रिक्षातून प्रवास करतो. मला लोकांमध्ये मिसळून राहायला आवडतं. त्यातूनच मला माझ्या भूमिका सापडतात. सर्वसामान्य माणसं माझ्यासाठी हिरो आहेत. ही माणसंच माझी प्रेरणा आहेत. आणि अशा प्रेरणादायी लोकांमध्ये मीही नेहमी सर्वसामान्यांसारखा वावरत असतो. कारण सर्वसामान्य माणसापेक्षा मोठा हिरो अवघ्या जगात नाही. जेवढं त्याला मिळतं, त्यात आयुष्य साजरं करण्याची त्याची कला, कुटुंबाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठीची त्याची धडपड ही हसण्यावारी नेण्यासारखी गोष्ट नाही. अशा माणसांमधून माझ्या व्यक्तिरेखा मला सापडतात आणि मी त्या साकार करतो’, असं तो सांगतो. अभिनयाबरोबरच आपण वाचन, अधूनमधून लिहिणं हेही सुरू असतं असं सांगणाऱ्या मनोजने नाटकात काम करत असताना त्यावेळी दोन नाटकं लिहिली होती, अशी माहितीही दिली. पण तो फार लिहीत नाही. मनोजच्या मते लिहिणं ही एकटेपणा आणणारी प्रक्रिया आहे आणि त्याला एकटेपणाची भीती वाटते. ‘रायटिंग इज व्हेरी लोन्ली प्रोसेस’, असं लेखनाविषयी इंग्रजीत म्हटलं जातं. म्हणून मनोजला लिहिण्यापेक्षा त्यामुळे एकटं वाटू लागेल याचीच जास्त भीती वाटते.

आधी बॉलीवूडमध्ये ग्लॅमराईज्ड, स्टायलिश नायक-नायिका असायच्या, पण आता आपल्या जवळचे वाटतील असे नायक-नायिका दिसू लागलेत. हा खूप चांगला बदल आहे असं मनोजला वाटतं. ‘शूल’, ‘सत्या’सारखे चित्रपट तो करू शकला. अशा चित्रपटांतील व्यक्तिरेखांनी ग्लॅमरपेक्षा वेगळ्या गोष्टी सिनेजगतात आणल्या. त्याच्यासारखे कित्येक अभिनेते रिअल लाईफ व्यक्तिरेखांमुळे नावारूपाला आले, असं तो सांगतो. मनोज पुढे म्हणाला, ‘सुरुवातीला तेव्हा आमच्यासारख्या कलाकारांना कोणी विचारत नव्हतं, कोणी स्टुडिओतसुद्धा बोलावत नसत, कोणी चीफ असिस्टंट आमचे फोटो उचलून कचरापेटीत टाकायचे. पण तिथपासून आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो. चित्रपटांचा चंदेरी झगमगाट जाऊ न त्यात खरेपणा आला आहे. आता बॉलीवूडमध्ये खऱ्या आयुष्यातील कथा, वेगवेगळे दिग्दर्शक, नवे अभिनेते येत आहेत. पहिलं असं नव्हतं. हे बदललं याचं सारं श्रेय शेखर कपूर, मणिरत्नम आणि रामगोपाल वर्मासारख्या दिग्दर्शकांना द्यायला हवं, असं मत त्याने मांडलं.

चित्रपटातून समाजिक बदल घडले पाहिजेत, अशी अपेक्षा ठेवली जाते. त्याबद्दल मनोजला विचारले असता तो म्हणाला, ‘चित्रपटांमुळे सामाजिक बदल घडू शकत नाहीत. चित्रपट कुठलीही क्रांती करू शकत नाहीत. पण चित्रपट जागरूकता निर्माण करू शकतात. लोकांपर्यंत एखादी माहिती ते चांगल्या प्रकारे पोहोचवू शकतात. चित्रपट एखाद्या आंदोलनात आपली छोटीशी भूमिका निभावू शकतात, यापेक्षा जास्त चित्रपट काही करू शकत नाही. पण कलाकारांनी कुठल्याही प्रतिमेमध्ये अडकून पडू नये, असं मनोजला वाटतं. कारण कलाकारांचं कामच ते आहे की त्यांच्यावर लावल्या जाणाऱ्या र्निबधांना सतत तोडत राहणं. जे एक कलाकार म्हणून त्याने त्याच्या आयुष्यात आतापर्यंत केलंय आणि यापुढेही करत राहणार, असं तो विश्वासाने सांगतो.

मला कायम लोकांमध्ये वावरायला आवडतं. मी बाजारात जातो, कधी लोकल ट्रेनमधून प्रवास करतो, कधी रिक्षातून प्रवास करतो. त्यातूनच मला माझ्या भूमिका सापडतात. सर्वसामान्य माणसं माझ्यासाठी हिरो आहेत. ही माणसंच माझी प्रेरणा आहेत. आणि अशा प्रेरणादायी लोकांमध्ये मीही नेहमी सर्वसामान्यांसारखा वावरत असतो. कारण सर्वसामान्य माणसापेक्षा मोठा हिरो अवघ्या जगात नाही.  अभिनयाबरोबरच  वाचन, अधूनमधून लिहिणं हेही सुरू असतं. पण मी फार लिहीत नाही. कारण लिहिणं ही एकटेपणा आणणारी प्रक्रिया आहे आणि मला एकटेपणाची भीती वाटते.

मनोज वाजपेयी

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Manoj bajpayee upcoming movie satyamev jayate article