हंसा वाडकर यांच्याबद्दल तुम्हाला माहीत आहे का? मागील पिढीतील ज्या व्यक्तींनी त्यांचे चित्रपट पाहिले आहेत किंवा जवळजवळ ५० वर्षांपूर्वी आलेलं त्यांचं आत्मचरित्र वाचलेलं आहे. त्यांच्याही आज त्या विस्मृतीत गेल्या असतील.
‘हंसाबाई एक उत्तम अभिनेत्री होती’ या एका वाक्यापलीकडे त्यांचे सिने-नाट्यसृष्टीतील योगदान माहीत नसलेले आपण कोरी पाटी घेऊन जेव्हा ‘सांगत्ये ऐका’ या एकपात्री प्रयोगाला जाऊन बसतो तेव्हा खुद्द हंसाबाईच, आपणच आपल्या दु:खाकडे पाहणे या त्रयस्थ वृत्तीने तिचा जीवनपट आपल्यासमोर उलगडते.
संत सखू, रामशास्त्री, लोकशाहीर राम जोशी, पुढचं पाऊल व सांगत्ये ऐका हे हंसा वाडकर यांचे गाजलेले सिनेमे आहेत. सामान्य रसिकांच्या लेखी, अस्सल गावरान ठसका असलेली तमाशा कलावंतीण हीच त्यांची पडद्यावरील ओळख आहे. मात्र, एका कलावंतिणीच्या पोटी जन्माला आलेल्या या अभिनेत्रीने साकार केलेल्या संत सखूच्या सोज्वळ भूमिकेने हंसा वाडकर या नावाला एक वेगळी ओळख दिली आणि त्यांनीही ती ओळख शेवटपर्यंत जपली.
अगदी बालवयापासून सिनेमात नायिकेच्या भूमिकेत दिसणाऱ्या या अभिनेत्रीच्या वैवाहिक जीवनात उठलेले वादळ, त्यांचे मद्याचे व्यसन, मातृसुखाची आस, संसार आणि अभिनय यांत करावी लागणारी तारेवरची कसरत, जवळच्या लोकांकडून झालेली फसवणूक, मानहानी, नवऱ्याकडून होणारी शारीरिक मारझोड, ज्यानं न्याय द्यायचा त्या मॅजिस्ट्रेटनेच केलेला बलात्कार अशा अनेक बऱ्या-वाईट अनुभवांनी भरलेली हंसा वाडकर यांची जवळपास अर्ध्या शतकाची कारकीर्द अवघ्या सव्वा तासाच्या दीर्घांकात दीर्घांकात रंगमंचावर सादर करण्यात लेखक-दिग्दर्शक विश्वास सोहोनी आणि अभिनेत्री मानसी कुलकर्णी व त्यांची टीम यशस्वी झाले आहेत.
“हंसाबाई यांच्याकडे उत्तम कलागुण…”
हंसाबाई यांच्याकडे उत्तम कलागुण होते; पण त्यांच्या कलागुणांची कोणालाच कदर नव्हती. विशेष म्हणजे त्यांना स्वतःला कोणतीही महत्त्वाकांक्षा नव्हती. अशा या हंसाबाईंच्या वैयक्तिक आणि पडद्यावरील जीवनपटातले नेमके प्रसंग वेचून विश्वास सोहोनी यांनी नेटका म्हणता येईल असा एक दीर्घांक लिहिला आहे. हा दीर्घांक हंसाबाईची व्यथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यात कुठेही कमी पडत नाही. तो त्या दुःखाचं उदात्तीकरण करीत नाही. आपल्याच मातीतल्या परिस्थितीचे चटके भोगलेल्या कलावंतांचे जीवन विश्वास सोहोनी यांना विशेष आकर्षित करीत असावे, हे त्यांनी याआधी सादर केलेल्या ‘मी मिठाची बाहुली’ आणि आताच्या ‘सांगत्ये ऐका’ या प्रयोगावरून दिसून येते.
मोजके नेपथ्य, स्टेजवरील हार्मोनियम व ढोलकी या वाद्यांचा एखाद्या पात्रासारखा वापर करून, कलाकृतीतून दिग्दर्शक अगदी डोकावणारही अशी दक्षता घेत विश्वास सोहोनी यांनी हा दीर्घांक चोखरीत्या बांधलेला आहे. अभिनेत्री मानसी कुलकर्णीने परकायाप्रवेश केल्याप्रमाणे हंसाबाई या हतबल स्त्रीची मनोव्यथा कलात्मकरीत्या सादर केली आहे. हंसाबाईची पडद्यावरील नखरेल अदा, वैयक्तिक आयुष्यातील आनंद, दुःख, केलेल्या चुकांची कबुली हे सगळे तिने आपल्या कायिक-वाचिक अभिनयाने अगदी सहजपणे सादर केले आहे. कथनाच्या ओघात येणाऱ्या इतर पात्रांची गुणवैशिष्ट्ये व लकबी सादर करताना या भूमिकेची विविधांगे म्हणजे कुठेही मिमिक्री वाटत नाही.
नंदलाल रेळेंच्या ध्वनिसंकलनाचा लेखन, दिग्दर्शन आणि अभिनयाइतकाच या नाटकाची परिणामकारकता गडद करण्यात महत्त्वाचा वाटा आहे.
हा प्रयोग शोकात्मतेचं सावट दाटलेला असला तरी त्यात आक्रस्ताळेपणा किंवा ऊर बडविणे नाही. त्यामुळे प्रयोग संपतो तेव्हा, एकीकडे हंसा वाडकरचे दुःख आपलेच वाटावे इतके ते काळजाला भिडते आणि त्याच वेळी एक उत्तम कलाविष्कार पाहिल्याचा आनंदही होतो अशा दोन टोकांच्या भावना घेऊन प्रेक्षक रंगमंदिरातून बाहेर पडतात.
