बॉलिवूड नव्हे तर ‘या’ क्षेत्रात मिस वर्ल्ड मानुषीला करायचंय करिअर

मानुषीने एका मुलाखतीमध्ये तिच्या करिअरविषयी मत व्यक्त केलं आहे

मानुषी छिल्लर

बॉलिवूडमध्ये आजवर अनेक अभिनेत्रींनी मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर बॉलिवूडची वाट धरली आहे. त्यामुळे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत मानुषी छिल्लरदेखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा रंगली होती. इतकंच काय तर फराह खान आणि करण जोहर मानुषीला बॉलिवूडमध्ये लॉन्च करणार असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र मानुषीला बॉलिवूडमध्ये पदार्पण करायचं नसून तिने करिअरसाठी वेगळ्या एका क्षेत्राची निवड केल्याचं समोर आलं आहे. या क्षेत्राविषयी मानुषीने एका मुलाखतीमध्ये सांगितल्याचं पाहायला मिळालं.

मानुषीच्या करिअरविषयी अनेक चर्चा रंगल्या होत्या. मात्र या चर्चांवर मानुषीने कधीही तिचं मत मांडलं नव्हतं. त्यामुळे तिच्या करिअरची गोष्ट अद्यापही गुलदस्त्यातच होती. परंतु आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. मानुषीने एका मुलाखतीमध्ये तिला अभिनेत्री व्हायचं नाही असं स्पष्टपणे सांगितलं आहे.

मानुषी सध्या वैद्यकीय शिक्षण घेत असून तिला अभिनेत्री न होता हृदयरोग तज्ज्ञ व्हायचं आहे. अभिनेत्री होणं हे तिचं स्वप्न कधीच नव्हतं. तिने कायम एक गुणी डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं आहे. त्यामुळे मानुषीला वैद्यकीय क्षेत्रात रस असल्याचं स्पष्ट झालं आहे.

मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर माझ्यावरील जबाबदाऱ्या वाढल्या होत्या. मात्र या जबाबदाऱ्या पार पाडताना मला माझ्या शिक्षणाकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नव्हतं. माझ्याप्रमाणेच अशा अनेक मिस इंडिया, मिस वर्ल्ड आहेत ज्यांनी त्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ दिलं नाही. वैद्यकीय शिक्षणातून तुम्हाला जीवनात बऱ्याच गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव येतो. त्यामुळेच मला माझं वैद्यकीय शिक्षण अपूर्ण सोडायचं नाही. मी काही काळ ब्रेक घेऊन माझ्या शिक्षणावर लक्ष केंद्रीत करायचं ठरवलं आहे.” असे मानुषीने स्पष्ट केले आहे.  मुख्य म्हणजे मिस वर्ल्ड संस्थेच्या माध्यमातून जे काही करता येईल ते करायला आवडेल असेही यावेळी मानुषी हिने म्हटले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Manushi chhillar shifted mumbai her mbbs study no chance bollywood