Mohanlal on hema committee report: केरळमधील मल्याळम सिनेसृष्टीला मॉलीवूड असे म्हटले जाते. इतर सिनेसृष्टीच्या तुलनेत ही सिनेसृष्टी लहान असली तरी याठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून महिला कलाकारांचे लैंगिक शोषण, त्यांना दुय्यम वागणूक आणि त्यांचा मानसिक छळ होत असल्याची बाब हेमा समितीच्या अहवालातून समोर आली होती. राज्य सरकारने हा अहवाल सार्वजनिक केल्यानंतर यावर अनेकांनी टीका-टीप्पणी केली आहे. तसेच अनेक महिला पुढे येऊन त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडत आहेत. यानंतर आता मल्याळम सिनेसृष्टीतील आघाडीचे अभिनेते मोहनलाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणात अनेक लोक गुंतलेले असू शकतात, असे ते म्हणाले.

मल्याळम सिनेसृष्टीतील कलाकारांची संघटना असलेल्या “असोसिएशन ऑफ मल्याळम मुव्ही ॲक्टर्स”च्या (अम्मा) सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते. मोहनलाल या संघटनेचे अध्यक्ष होते. त्यांनीही नैतिकतेच्या आधारावर स्वतःहून राजीनामा दिला होता. लैंगिक शोषण प्रकरणात मल्याळम सिनेसृष्टीतील १० ते १२ मोठ्या कलाकारांचा समावेश असल्याचा आरोप करण्यात येत आहे. हे १० ते १२ लोक संपूर्ण सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवत असून विरोधात जाणाऱ्या महिला कलाकारांवर बहिष्कार टाकण्याचे काम या लॉबीकडून केले जात असल्याचाही आरोप करण्यात आला होता.

हे वाचा >> Minu Muneer : “तो खोलीत आला आणि बेडवर खेचून…”, मल्याळम सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीचा सहकलाकारांवर गंभीर आरोप!

काय म्हणाले मोहनलाल?

मोहनलाल यांनी नुकतीच या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले, “हेमा समितीच्या अहवालाचे आम्ही स्वागत करतो. केरळ सरकारने अहवाल सार्वजनिक करून चांगले काम केले. अम्मा सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाही. खरेतर सर्वांनी मिळून याची उत्तरे दिली पाहिजेत. खरेतर ही सिनेसृष्टी खूप मेहनती आहे. शोषण प्रकरणात अनेक लोक गुंतलेले असू शकतात. पण प्रत्येकाला यासाठी जबाबदार ठरविता येणार नाही. जे दोषी आहेत, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. त्याप्रमाणे तपास सुरू आहे.”

मोहनलाल पुढे म्हणाले की, मल्याळम सिनेसृष्टीला नियंत्रित करणाऱ्या त्या १० ते १२ लोकांच्या गटात माझा समावेश होत नाही आणि असा काही गट या सिनेसृष्टीत आहे, याचीही मला कल्पना नाही. मल्याळम सिनेसृष्टीत हजारो लोक काम करतात. अम्माला या सर्वांच्या समस्या सोडविता आलेल्या नाहीत, हेही त्यांनी मान्य केले. हेमा समितीचा अहवाल सार्वजनिक झाल्यानंतर मोहनलाल यांनी पहिल्यांदाच माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका जाहीर केली.

हे ही वाचा >> Me Too : “बलात्काराचं दृष्य १७ वेळा चित्रीत करायला लावलं, दिग्दर्शकाने त्यानंतर…”, मल्याळम अभिनेत्रीने सांगितली आपबिती

मोहनलाल यांनी मल्याळम आणि इतर दाक्षिणात्य भाषेत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. दृश्यम या गाजलेल्या चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका केलेली आहे. मोहनलाल म्हणाले की, ज्या लोकांनी चुकीचे काम केले आहे, त्यांना शिक्षा झालीच पाहीजे. अम्माच्या सदस्यांवर जर लैंगिक शोषणाचे किंवा अत्याचाराचे आरोप झाले, तर त्याची दखल घेण्यात येईल.

आणखी वाचा >> “अभिनेत्रींचे नग्न व्हिडीओ रेकॉर्ड करतात,” ज्येष्ठ अभिनेत्रीचा मोठा दावा; म्हणाल्या, “माझ्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये…”

६४ वर्षीय अभिनेते मोहनलाल यांनी मागच्या महिन्यात अम्माच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तसेच संघटनेच्या इतर सदस्यांनीही आपला राजीनामा दिला होता.