Akshay Waghmare Post For Yogita Gavli : नुकतीच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीचा निकालही समोर आला आहे. या महापालिका निवडणुकीच्या रिंगणात डॅडी म्हणजेच अरुण गवळीची मुलगी योगिता गवळीदेखील उभी राहिली होती; मात्र तिचा पराभव झाला. मुंबईतील प्रभाग क्रमांक २०७ मधून रोहिदास लोखंडेंनी योगिता गवळीला पराभूत केलं. योगिता ही मराठी अभिनेता अक्षय वाघमारेची पत्नी आहे. योगिताच्या निवडणुकीतील पराभवानंतर अक्षयनं तिच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्यानं पत्नीचा फोटो शेअर करीत भावुक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तो म्हणतो, “प्रिय बायको, सर्वांत आधी तुझे मनःपूर्वक आभार आणि मला तुझा प्रचंड अभिमान आहे. Pregnancy आणि त्यानंतर अवघ्या एका महिन्याच्या मुलीची आई… ही सर्व जबाबदारी खांद्यावर असताना तू ज्या धैर्यानं ही निवडणूक लढवलीस, ते खरंच थक्क करणारं आहे. सत्ताधारी असो वा विरोधी पक्ष – भाजप, शिंदे गट, ठाकरे गट किंवा मनसे – कोणापेक्षाही वैयक्तिकरीत्या तुला सर्वाधिक ६३०० मतं मिळाली आहेत. तुझ्या आसपासही कोणी नाही, हे तू सिद्ध केलंस.”

त्यानंतर तो म्हणतो, “​डॅडी, मम्मी, तू आणि अखिल भारतीय सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रामाणिक कष्टांची ही पावती आहे. भायखळ्याच्या जनतेनं तुला जे प्रेम दिलंय, ते पाहून हे स्पष्ट होतंय की, लोकांसाठी तू आधीच निवडून आली आहेस. त्यांनी जातीपातीच्या राजकारणापेक्षा तुझ्या ‘कामावर’ आणि ‘विकासावर’ विश्वास दाखवला आहे. गेल्या काही महिन्यांत तू घेतलेले कष्ट आणि तुला होणाऱ्या वेदना मी खूप जवळून पाहिल्या आहेत. मोठी मुलगी आणि आताच जन्मलेलं आपलं बाळ… या दोघींना सोडून तू रोज १२-१२ तास काम करायचीस. दिवसातून एकदाही तुला त्यांना भेटता येत नव्हतं. तरीही फोनवरून तुझी त्यांच्याबद्दलची काळजी आणि तुझ्यातली ती हळवी ‘आई’ मी सतत अनुभवत होतो. तुला शारीरिक वेदना होत होत्या; पण तू कधीच तक्रार केली नाहीस की कोणावर चिडली नाहीस. तुझा तो शांत आणि संयमी स्वभाव हीच तुझी खरी ताकद आहे.”

अक्षय वाघमारेची पत्नी योगिता गवळीसाठी पोस्ट

शेवटी अभिनेता बायकोसाठी लिहितो, “​एक गोष्ट लक्षात ठेव, जर सर्व पक्ष स्वतंत्र लढले असते, तर मतांच्या बाबतीत तुझ्या जवळपासही कोणी नव्हतं. लोकांनी तुझ्या आणि डॅडींच्या कर्तृत्वावर मोहोर उमटवली आहे. ​हा तुझा पराभव नक्कीच नाही, तर ही तुझी राजकारणातली एक ‘धमाकेदार एन्ट्री’ आहे. मला तुझा खूप अभिमान वाटतो. बाळा, आता अधिक जिद्दीनं कामाला लागूया.” अक्षयच्या या पोस्टवर चाहत्यांनीसुद्धा कमेंट करीत योगिताला शुभेच्छा दिल्या आहेत आणि तिचं कौतुक केलं आहे.