Aniket Vishwasrao On Fitness : अलीकडे अनेक कलाकार स्वतःला फिट ठेवण्यासाठी खूप मेहनत घेताना दिसतात. तसेच जिम-योगाद्वारे स्वत:चा फिटनेस जपतात. व्यवस्थितपणे डाएटसुद्धा फॉलो करतात. कलाकार स्वत: तर फिट राहतातच, पण ते आपल्या चाहत्यांनासुद्धा फिट राहण्यासाठी विविध माहिती देत असतात.
मराठी कलाविश्वातदेखील असे कलाकार आहेत, जे त्यांच्या स्वत:च्या फिटनेसची काळजी घेतात. पण असा एक अभिनेता आहे, जो डाएट वगैरे न करतादेखील फिट आहे. हा अभिनेता म्हणजे, अनिकेत विश्वासराव. मराठी नाटक, मालिका आणि सिनेमांमधून अनिकेतने प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. नुकत्याच एका मुलाखतीत अनिकेतने त्याच्या फिटनेसबद्दल सांगितलं.
अभिजात मराठी फिल्मी या यूट्यूब वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनिकेत डाएटबद्दल म्हणाला, “मी डाएट वगैरे काही करत नाही. मी अगदी खूप कठोरपणे डाएट करत नाही. लहानपणापासून पिझ्झा-बर्गरसारखे बाहेरचे पदार्थ खात नाहीय. मी आतापर्यंत मोजून ४०-५० वेळा पिझ्झा किंवा बर्गर खाल्ला असेल. मला हे सगळं आवडतं… आवडत नाही; म्हणून खात नाही असं नाही. तसेच मी कायम घरचं जेवण खातो. आपलं पारंपरिक जेवण असतं, तेच मी खातो. यामुळे मला कोणतं डाएट करण्याची वगैरे गरज नाही. त्यामुळेच अनेक वर्ष माझं वजन सत्तरच आहे.”
यानंतर अभिनेता म्हणाला, “सुरुवातीला मी खूपच बारीक होतो. कॉलेजमध्ये असताना माझं वजन ४६ किलो होतो. तेव्हा कॉलेजमध्ये अनेकजण माझ्या वजनावर विनोद करायचे. माझं Metabolism खूप चांगलं आहे. पण नंतर ‘नकळत सारे घडले’ नाटकाच्या अमेरिकेतील दौऱ्यादरम्यान मी ठरवलं की आता वजन वाढवायचं आहे. तेव्हा तिकडे अनेकजण जेवायला बोलवायचे. तेव्हा प्रत्येकाचा घरी मेजवानीच असायची. मग एका महिन्यात माझं वजन वाढलं. वजन वाढवण्यासाठी मी काही बर्गर वगैरे नाही खाल्लं. तिकडे गेल्यानंतर मी तिथल्या जेवणाचा आनंदसुद्धा घेतला. इथल्या बर्गर आणि तिथल्या बर्गरमध्ये खूप फरक आहे. “जगण्यासाठी खाल्लं पाहिजे, खाण्यासाठी जगू नये असं मला वाटतं. जितकी भूक असते तेवढंच खाल्लं पाहिजे. किंबहुना जितकी भूक असते, त्यापेक्षा २० टक्के कमीचं खाल्लं पाहिजे.”
यापुढे अनिकेतने “मी ग्रीन टी, ब्लॅक कॉफी, भिजवलेल्या जिऱ्याचं पाणी हे सगळं घेत असल्याचे सांगितले. तसेच तो काही इतर पदार्थ खाणेसुद्धा तितकेच एन्जॉय करतो. तो म्हणाला, “माझी आई घरीच खूप छान पाणीपुरी बनवते, तर मी एकाच वेळी ३५-४० पाणीपुऱ्या खातो.” यानंतर अनिकेतने स्वत:चं स्कीन केअर रूटीनसुद्धा शेअर केलं. याबद्दल तो म्हणाला, “मी त्वचेची काळजी घेतो. मी खूप तेलकट पदार्थ वगैरे खात नाही.”
सूचना – या लेखातील फिटनेस आणि आहाराबाबतचे विचार अभिनेत्याचे वैयक्तिक अनुभव आहेत. शरीर प्रकृतीनुसार आहाराचे परिणाम प्रत्येकासाठी भिन्न असू शकतात. वरील माहिती म्हणजे कोणताही वैद्यकीय सल्ला नाही. यासाठी आहारतज्ज्ञ किंवा डॉक्टरांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.
