गुरुवारी लोकसत्ता फेसबुक लाइव्ह चॅटसाठी आलेले ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी अनेक विषयांवर दिलखुलास गप्पा मारल्या. विनोद, सिनेमे, राजकारण, लहानपणीचे किस्से सांगताना मामा जणू भूतकाळात हरवून गेले होते. या आठवणींचे गाठोडे उघडत असताना सहजपणे सह-कलाकारांचाही विषय निघाला. तेव्हाची मराठी सिनेसृष्टीतील हमखास हीट जोडी म्हणून अशोक सराफ आणि रंजना यांच्याकडे पाहिले जायचे. रंजनासोबतचा काम करण्याता अनुभव शेअर करताना मामा जणू भुतकाळातच रममाण झाले.
रंजना यांच्याबद्दल सांगताना ते म्हणाले की, ‘तेव्हा मराठी सिनेमांना लाभलेली ती एक सर्वात सुंदर आणि गुणी अभिनेत्री होती. एखादी गोष्ट जर आपल्याला येत नसेल तर त्यासाठी कितीही मेहनत करण्याची तिची तयारी असायची. एखादी गोष्ट करताना जर ती डावी- उजवी झाली तर तिला आवडायचं नाही. ही गोष्ट मला जमत नाही म्हणजे काय असा सतत प्रश्न ती विचारायची. काहीही झालं तरी मी ती गोष्ट करणारच असा दुर्दम्य आशावाद तिचा असायचा. तिच्या याच स्वभावामुळे तिने आयुष्यात अनेक नवनवीन गोष्टी केल्या. तिच्या या मेहनतीमुळे तिची प्रत्येक भूमिकाही वैशिष्ट्यपुर्ण झाली.’




वाचा : प्रियदर्शन आणि कुशलची खडाजंगी!
‘माझ्यासोबत काम करण्याआधी तिने कधीही विनोदी भूमिका साकारल्या नव्हत्या. गोंधळात गोंधळ हा तिचा पहिला विनोदीपट होता. तिच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. विनोदी सिनेमे करण्यात पटाईत असल्याप्रमाणे तिचा अभिनय झाला होता. लोक तिचं कौतुक करण्यासाठी यायचे तेव्हा ती स्पष्ट सांगायची की, या सिनेमात मी फक्त अशोकला फॉलो केलं. तिचे ते फॉलो करणंही इतकं जबरदस्त होतं की ती नेहमीच तोडीस तोड उभी राहायची. मी एखाद्या व्यक्तीला फॉलो करते हे कबुल करणंच किती मोठेपणाचं लक्षण आहे ते तिने दाखवून दिलं होतं. सध्याच्या घडीला कोणीही असं म्हणताना दिसत नाही. हा माझा गुरू आहे किंवा मी अमुक एका व्यक्तीला फॉलो करतो असं कोणीही म्हणत नाही. एवढा मनाचा मोठेपणा सध्या कोणामध्येही नाही,’ या शब्दांत अशोक सराफ यांनी रंजनाच्या आठवणींना उजाळा दिला.