मराठी रंगभूमीवरचा पहिला सुपरस्टार म्हणजे काशीनाथ घाणेकर. काशीनाथ घाणेकरांनी ज्या भूमिका अजरामर केल्या आहेत त्यातलीच एक भूमिका म्हणजे गारंबीचा बापू. श्री. ना. पेंडसे लिखित गारंबीचा बापू ही भूमिका काशीनाथ घाणेकर शब्दशः जगले आहेत. त्यांच्या नंतर चित्तरंजन कोल्हटकर यांनीही ही भूमिका नाटकात साकारली आहे. आता हे आव्हान पेलण्यासाठी सज्ज झाला आहे मराठी अभिनेता प्रसाद ओक. गारंबीचा बापू हा चित्रपट नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. दिग्दर्शक गुरूप्रसाद यांनी श्री. ना. पेंडसे यांच्या कोकण भूमीत रूजलेल्या कथेला आजच्या काळातील दृश्य भाषेशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रसाद ओक साकारतो आहे गारंबीचा बापू ही भूमिका

दापोली परिसरातील हर्णै, मुरुड, आंजर्ले आणि मुर्डी या किनारपट्टीपासून उंचवट्यांवर पसरलेल्या कोकणच्या प्रदेशात वसलेलं गारंबी हे या कथेचं जग. नारळी-पोफळीच्या बागा, आंबा-फणसाच्या राया, समुद्राची खारट झुळूक आणि माणसांच्या स्वभावातली रांगडी बेफिकिरी या सगळ्यांनी मिळून गारंबीचं एक आगळं विश्व तयार होतं. या विश्वाच्या केंद्रस्थानी आहे बापू. स्वतःच्या मनाप्रमाणे जगणारा, कुणाच्याही दडपणाला न जुमानणारा आणि रूढ चौकटींना धडक देणारा तरुण. गारंबीवर अण्णा खोतची सत्ता आहे. अधिकाराच्या जोरावर गावकऱ्यांवर वर्चस्व गाजवणाऱ्या अण्णाच्या दहशतीला उघडपणे आव्हान देण्याचं धाडस बापू करतो. त्यामुळं त्याचा संघर्ष केवळ एका व्यक्तीशी राहत नाही, तो गावातील सत्ताकारण, सामाजिक बंधने आणि माणसाने माणसावर लादलेल्या चौकटींशी भिडणारा संघर्ष बनतो.

यतीन कार्येकर, देविका दफ्तरदार यांच्याही महत्वाच्या भूमिका

कोकणच्या मातीतील याच सिद्धहस्त कथेला श्री. ना. पेंडसे यांच्या शब्दांतून शशी पेंडसे यांनी पुन्हा पडद्यावर उतरवलंय. प्रसाद ओक बापूच्या भूमिकेत आपल्या सहज अभिनयातून त्या कलंदर वृत्तीला जिवंत करतील यात काही शंकाच नाही. तर देविका दफ्तरदार राधाच्या भूमिकेत तितक्याच ताकदीने उभ्या राहतील. यतिन कार्येकर अण्णाच्या क्रूर सत्तेला पडद्यावर आणतील, तर जयवंत वाडकर (मुसा), शशी पेंडसे (विठोबा) आणि माधवी सोमण (मावशी) या व्यक्तिरेखांमधून गारंबीचं इरसाल विश्व अधिक ठसठशीत होईल. जयसिंग यांनी छायाचित्रणाची जबाबदारी सांभाळली आहे.

गारंबीचा बापू या चित्रपटला वैशाली सामंत यांच्या संगीत लाभलं आहे. अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर, उर्मिला धनगर आणि खुद्द वैशाली सामंत यांच्या आवाजातून कोकणची गाज पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या काळजाला भिडेल. एकाधिकारशाहीविरुद्धच्या संघर्षाची आणि मानवी स्वभावाचे विविध पैलू उलगडणारी ही कथा नव्या तंत्रज्ञानाच्या साथीने प्रेक्षकांसमोर येणार आहे. कोकणच्या मातीतील हा अनोखा बाज पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी आणि ‘गारंबीचा बापू’च्या या नव्या प्रवासाचे साक्षीदार होण्यासाठी प्रेक्षकही आता उत्सुक आहेत यात शंका नाही.