scorecardresearch

“आधीच श्रद्धांजली वाहणाऱ्यांचा जीव भांड्यात पडला…” विक्रम गोखलेंच्या निधनानंतर शरद पोंक्षेंची संतप्त प्रतिक्रिया

शरद पोंक्षे यांनी खोट्या निधनवार्ता देणाऱ्या लोकांचा निषेध व्यक्त करत विक्रम गोखले यांना श्रद्धांजली वाहिली

“आधीच श्रद्धांजली वाहणाऱ्यांचा जीव भांड्यात पडला…” विक्रम गोखलेंच्या निधनानंतर शरद पोंक्षेंची संतप्त प्रतिक्रिया
विक्रम गोखले आणि शरद पोंक्षे

रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्र‌वाणी मालिका या तीनही माध्यमांतून आपल्या अभिनय कर्तृत्वाचा ठसा उमटवून, रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक विक्रम चंद्रकांत गोखले (वय ७७) यांचे प्रदीर्घ आजाराने खासगी रुग्णालयात निधन झाले. गेले काही दिवस विक्रम गोखले यांची प्रकृती नाजुक होती आणि पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. कालच ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत हे वृत्तदेखील समोर आलं होतं, पण आज सकाळी त्यांची प्रकृती आणखी ढासळली.

नुकतंच विक्रम गोखले यांनी जितेंद्र जोशीच्या ‘गोदावरी’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका केली होती. विक्रम गोखले यांच्या जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीने हळहळ व्यक्त केली आहे. कित्येक राजकीय नेत्यांनीही त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. अभिनेते शरद पोंक्षे यांनीदेखील ‘झी २४ तास’ या वृत्तवाहिनीशी संवाद साधला. विक्रम गोखले यांच्याबद्दल बोलताना शरद पोंक्षे भावूक झाले. शिवाय गेले काही दिवस विक्रम गोखलेंच्या मृत्यूबद्दल अफवा पसरवणाऱ्या लोकांचाही शरद पोंक्षे यांनी समाचार घेतला आहे.

BREAKING: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

शरद पोंक्षे म्हणाले, “विक्रम गोखले हे आमच्या सगळ्या पिढ्यांचे गुरु आहेत. त्यांच्याकडे बघून आम्ही सगळेजण अभिनय शिकलो. गेले ४ दिवस त्यांच्या मृत्यूच्या बातमीचा सोशल मीडिया आणि मीडियाने सगळा खेळखंडोबा केला होता. काहीही पुरावा हातात नसताना सगळे श्रद्धांजली वाहून मोकळे झाले होते. ज्यांनी या घाणेरड्या शब्दांत श्रद्धांजली वाहिली असेल त्यांचा जीव आज शांत झाला असेल. त्या सगळ्यांचा मी सर्वप्रथम तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो आणि मग हे दुःख व्यक्त करतो. आमचे काका गेले, आमचा गुरु गेला, आमचा पाठीराखा गेला. आमच्या पिढीला पोरकं करून गेले विक्रम गोखले. खूप आशा काल संध्याकाळी निर्माण झाली होती. ते परत उभे राहतील, काम करतील, परत बोलतील आमच्याशी पण, ही बातमी ऐकून मी अक्षरशः हादरुन गेलो आहे. परमेश्वरा त्यांच्या आत्म्याला शांती दे आणि त्यांच्या कुटुंबाला सावर.”

अशा पद्धतीने काही कळण्याआधीच श्रद्धांजली वाहणाऱ्यांचा निषेध करत शरद पोंक्षे यांनी विक्रम गोखले यांच्याबद्दल मनोगत व्यक्त केलं. विक्रम गोखले हे गोखले घराण्याच्या अभिनय परंपरेतील चौथ्या पिढीचे प्रतिनिधी होते. ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत गोखले यांचा अभिनयाचा वारसा पुढे नेताना विक्रम गोखले यांनी सीमेवरील जवानांसाठी अर्थसाह्य करण्याची परंपरा जीवनाच्या अखेरपर्यंत सुरू ठेवली.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2022 at 19:22 IST

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या