मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून सिद्धार्थ जाधवला ओळखले जाते. तो कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. बिग बॉसच्या चौथ्या पर्वाची घोषणा झाल्यापासूनच तो कायम चर्चेत असल्याचे पाहायला मिळाले. सुरुवातीला या चर्चा तो बिग बॉस होस्ट करणार म्हणून सुरु होत्या. मात्र त्यानंतर कलर्स मराठीने यंदाचा बिग बॉस महेश मांजरेकर होस्ट करणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर सिद्धार्थ जाधव हा बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून दिसणार असल्याचे बोललं जात होतं. पण सध्या तो स्टार प्रवाहवर आता होऊ दे धिंगाणा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. मात्र नुकतंच सिद्धार्थने बिग बॉसच्या घरात जाण्याबद्दलचे संकेत दिले आहेत.
आणखी वाचा : Exclusive : ‘मी शूटींग बंद करतोय…’ म्हणत सिद्धार्थ जाधववर संतापले महेश मांजरेकर, वाचा नेमकं काय घडलं?

या कार्यक्रमाच्या निमित्ताने महेश मांजरेकरांनी एबीपी माझा या वृत्त वाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अनेक गोष्टींचा उलगडा केला. यादरम्यान महेश मांजरेकरांना ‘बिग बॉस मराठी’च्या घरात तुम्हाला कोणते स्पर्धक बघायला आवडतील? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी अनेक नावं घेतली.

यावेळी ते म्हणाले, ‘बिग बॉस मराठी’च्या घरात मला सिद्धार्थ जाधव, गौरव मोरे, शिवाली परब, नम्रता संभेराव, प्रवीण तरडे या कलाकारांना बघायला नक्कीच आवडेल. हे स्पर्धक बिग बॉस मराठीच्या घरात चांगलाच कल्ला करतील. तसेच ते हा कार्यक्रम एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतील.”

आणखी वाचा : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात कोणते स्पर्धक बघायला आवडतील? महेश मांजरेकर म्हणाले “गौरव मोरे, शिवाली…”

महेश मांजरेकरांच्या या विधानानंतर सर्वत्र याबद्दल चर्चा सुरु झाल्या. यानंतर नुकतंच अभिनेता सिद्धार्थ जाधवने प्रतिक्रिया दिली. त्यावर सिद्धार्थ म्हणाला, “मी बिग बॉसच्या घरात धिंगाणा घालेन, असं महेश सरांना वाटतं. पण सध्या मी एक धिंगाणा घालतोय. मांजरेकरांचा प्रत्येक शब्द माझ्यासाठी मोलाचा आहे. त्यामुळे जर ते म्हणत असतील तर मला बिग बॉसमध्ये सहभागी व्हायला नक्कीच आवडेल.

दरम्यान सिद्धार्थ जाधव हा स्टार प्रवाहवरील आता ‘होऊ दे धिंगाणा’ या कार्यक्रमात निवेदक म्हणून काम करत आहे. सध्या हा शो चांगलाच लोकप्रिय ठरताना दिसत आहे. यात त्याच्या हटके स्टाईलने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. तसेच लवकरच तो एका हिंदी चित्रपटातही झळकणार आहे. तर दुसरीकडे बिग बॉस मराठी हा कार्यक्रम येत्या २ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदा या कार्यक्रमाची थीम ऑल इज वेल असणार आहे.