Sunil Tawde Talk About His Financial Struggle : मनोरंजन विश्वात अनेकदा कामाची अनिश्चितता असते. कधी कधी तुमच्याकडे खूप काम असतं; पण कधी कधी तुमच्या हातून ते काम निघूनही जातं. अनेक कलाकारांनी अशा वाईट अनुभवांचा सामना केला आहे. असाच संघर्ष काळ मराठी अभिनेते सुनील तावडे यांनीसुद्धा अनुभवला आहे.
मराठी नाटक, मालिका, चित्रपट तसेच रिअॅलिटी शोद्वारे सुनील तावडे यांनी प्रेक्षकांचे मनोरजन केले आहे. आजवर त्यांनी गंभीर, विनोदी, तसेच खलनायकाच्या भूमिका साकारल्या आहेत. अशातच एका मुलाखतीत त्यांनी सात मालिका बंद झाल्या आणि त्यानंतर आलेला कठीण काळ कसा होता, याबद्दल सांगितले आहे.
‘आरपार’ला दिलेल्या मुलाखतीत सुनील तावडे म्हणाले, “एका दिवसात मी तीन-तीन मालिकांचे शूटिंग करीत होतो. एकेक करीत महिनाभराने माझ्या मालिका बंद पडल्या. त्याचे कारण काय ते माहीत नाही. ‘सीआयडी’मध्ये तीन-तीन महिन्यांनी काम असायचं. दिग्दर्शक बदलला की, तो त्याची माणसं घ्यायचा. नंतर त्याचं स्वरूपसुद्धा बदललं.”
पुढे ते म्हणाले, “तेव्हा मी वडिलांनी घेतलेलं घर विकलं आणि म्हाडाची जागा घेऊन तिथे घर बांधण्याचा निर्णय घेतला होता. एकानं मला स्वस्तात घर बनवता येईल, असं सांगितलं होतं; पण तसं काही झालं नाही. तो एक राजकारणी होता, मदत करेल, असं म्हणाला; पण त्यानं मदत केलीच नाही. त्यावेळी तेव्हा माझं मलाच सगळं करावं लागलं. तसेच माझ्या नातेवाइकानं जो इंजिनीयर नेमला होता. त्यानंच मला फसवलं. मला त्यातलं काहीच ज्ञान नव्हतं. पुढे ते घर बांधल्यानंतर एका चॅनेलनं सुनील तावडे यांचं घर म्हणून ते कव्हर केलं. तर माझ्या बायकोची मैत्रीण ते बघत होती, तेव्हा तिथे एक बाई आली आणि ती बायकोच्या मैत्रिणीला म्हणाली हे घर त्यांना विकायला सांगा. ते घर त्यांना मानवणार नाही.”
“आपण म्हणतो ना एखादी वास्तू फळत नाही तसं ते झालं. यावर कुणी विश्वास ठेवेल किंवा नाही ठेवणार; पण मला याचा अनुभव आला आहे. तेव्हा अनेक वाईट गोष्टी घडत गेल्या. मालिका बंद पडल्या. घरात फक्त १५० रुपये होते. गाडीचे हप्ते भरण्यासाठी बहिणीकडून पैसे घ्यावे लागलेले, बँकवाले हप्ता दिला नाही म्हणून घरी आले होते. एक दुकान घेतलं होतं तेसुद्धा बंद पडलं. त्यामुळे माझ्यावर २५ लाख रुपयांचं कर्ज झालं. पण, या सगळ्यामुळे मी डिप्रेशनमध्ये गेलो नाही. काही आर्थिक समस्या आली, तर घर विकायचा प्लॅन मी केला होता. मग मी बँकेला सांगितलं की, मी घर विकणार आहे. मला एक वर्षाची मुदत द्या. मग मी वर्षभरात ते घर विकलं. पूर्ण कर्ज फेडलं आणि मिरा रोडला नवीन घर घेतलं. नशिबानं मला ते घर मिळालं” असंही ते पुढे म्हणाले.
त्यानंतर सुनील तावडे म्हणाले, “मिरा रोडचा फ्लॅट घेतला आणि गणपतीची मूर्ती ठेवायला म्हणून मी तिकडे जात होतो. तेव्हाच मुलगा (शुभंकर) एका मित्राला भेटायला गेला. कारण- आम्ही तिथून शिफ्ट होणार होतो. तेव्हा घरातून जरा पुढे गेल्यानंतर एक अपघात झाल्याचं आम्ही बघितलं आणि म्हणालो, ‘ज्याचा कुणाचा अपघात झालाय, तो वाचू दे रे बाबा.’ तेवढ्यात शुभंकरला कुठे आहे हे विचारायला फोन केला, तर तो म्हणाला, ‘पप्पा मी हॉस्पिटलमध्ये आहे.’ तो जो अपघात झाला, तो त्याचाच होता. ते बाईकवरून जात असताना अचानक एका गाडीने वळण घेतल्यानं तो अपघात झाला होता. पण बघणाऱ्यांना यातून कुणी वाचणार नाही, असं वाटलं होतं. ते घर सोडल्याच्या शेवटच्या दिवशी ही भयानक गोष्ट घडली.”
शेवटी ते म्हणाले, “नंतर मिरा रोडच्या घरी पाऊल ठेवताच क्षणी आयुष्य पूर्ण बदललं. मला काम मिळालं. त्यानंतर मी कामात सतत व्यग्र राहिलो. मुलगा, मुलगी सेट झाले. हे सगळं घडेल असं कुठे तरी वाटलं होतं. ती तयारी होती आणि या सगळ्यात मला मुलांची साथ खूप मिळाली. त्या कठीण काळात त्यांनी खूप पाठिंबा दिला.”
