Marathi Actor On Ranbir Kapoor Ramayan Casting : रणबीर कपूरच्या आगामी ‘रामायण’ चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. हनुमान जयंतीनिमित्त निर्मात्यांनी रामायण या बहुप्रतीक्षित चित्रपटाची खास झलक दाखवली. या टीझरमधील प्रत्येक गोष्ट अत्यंत भव्य पद्धतीने चित्रित झाल्याचे दिसून येत आहे. तर, प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत अभिनेता रणबीर विशेष लक्ष वेधून घेत आहे. त्याच्या या लूकचं नेटकऱ्यांकडून खूप कौतुक होत आहे.

काही नेटकरी रणबीरच्या भूमिकेचे कौतुक करत असले तरी काही जण त्याच्या जुन्या भूमिकांमुळे त्याच्यावर टीकासुद्धा करत आहेत. रणबीरने याआधी ‘ॲनिमल’ सिनेमा केला आहे. त्यात त्याने नकारात्मक भूमिका केली होती. याच सिनेमातील त्याच्या भूमिकेचा संदर्भ देत, त्याने ‘रामायण’मध्ये साकारलेल्या प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेबद्दल टीका केली जात आहे. सोशल मीडियावरील या चर्चांदरम्यान, आता प्रसिद्ध मराठी अभिनेते स्वप्नील राजशेखर यांनीसुद्धा त्यांचे मत व्यक्त केले आहे.

स्वप्नील राजशेखर सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. सोशल मीडियावर ते आपल्या कामाबद्दलची माहिती शेअर करताना दिसतात. तसेच एखाद्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवरसुद्धा आपली मतं व्यक्त करत असतात. अशातच त्यांनी रणबीर कपूरच्या ‘रामायण’मधील प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेवरून त्याच्यावर होत असलेल्या टीकेबद्दल स्वत:ची भूमिका व्यक्त केली आहे. तसेच रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ सिनेमानिमित्त चंद्रकांत मांढरे यांचेसुद्धा काही फोटो-व्हिडीओ शेअर केले जात आहेत. त्याबद्दलही स्वप्नील राजशेखर व्यक्त झाले आहेत.

Award Banner

नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याला प्रभू श्रीरामांची भुमिका…

सोशल मीडियावरील स्वप्नील राजशेखर म्हणतात, “रामायण या आगामी चित्रपटात ‘ॲनिमल’मध्ये खुनशी, नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याला प्रभू श्रीराम यांची भूमिका दिल्याबद्दल आक्षेप घेण्यात आला आहे. तर, छत्रपती शिवरायांची भूमिका करणाऱ्या अभिनेत्यांमध्ये सर्वांत उत्तम मानले जातात. (सध्या ते सोशल मिडीयावरसुध्दा चर्चेत आहेत, माहिती असेल.) त्याकाळी रजतपटावर सर्वांत लोकप्रिय श्रीराम साकारणाऱ्या चंद्रकांत यांनी एका सिनेमात (‘स्वयंवर झाले सीतेचे’मध्ये) रावणही केला आहे. ‘रम्य ही स्वर्गाहुन लंका’ गाणं यूट्यूबवर पाहा… त्याशिवाय खूप आधी १९४० च्या दशकात चंद्रकांत यांनी ‘जय मल्हार’ सिनेमात एक अत्यंत उन्मत्त, स्त्रीलंपट आणि नायिकेचे जबरदस्तीने अपहरण करून, तिला आपल्या वाड्यावर कोंडून ठेवणारा कडवट खलनायक उत्तम साकारला आहे. सिनेमा गोल्डन ज्युबिली झाला होता. (यातलाच तो उन्मादी खलनायक भविष्यात राजशेखर यांनी पुढे नेला)”

“खलनायकी भुमिका करणारा अभिनेता श्रीराम साकारुच शकतो…”

त्यानंतर ते म्हणतात, “तस्मात ‘ॲनिमल’मध्ये खलनायकी भूमिका करणारा अभिनेता श्रीराम साकारूच शकतो. बाकी तो ती भूमिका कशी निभावेल, ते सिनेमा पाहून बोलूया… आताच कशाला? प्रेक्षक कौल देतीलच…” स्वप्नील राजशेखर यांनी शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनीसुद्धा त्यांच्या विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. कुणी त्यांच्या मताशी सहमती दर्शवली आहे; तर कुणी बॉलीवूड अभिनेत्याची मराठी कलाकारांशी तुलना योग्य नसल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपटात रणबीर कपूरसह यश, साई पल्लवी, सनी देओल, रवी दुबे यांच्यादेखील भूमिका आहेत. येत्या दिवाळीत या चित्रपटाचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनेक जण या चित्रपटासाठी उत्सुक आहेत.