Vijay Gokhale Shares Balasaheb Thackeray Memory : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मराठी कलाकारांशी एक वेगळंच नातं होतं. राजकारणात सक्रीय असण्याबरोबर त्यांचं कलेवरही तितकंच प्रेम होतं. राजकारणी असणाबरोबरच बाळासाहेब ठाकरे यांना चित्रपट आणि नाटक यांचंही नितांत वेड होतं. मराठी कलाकार आणि बाळासाहेबांच्या नात्याबद्दलचे अनेक किस्से आपण ऐकलेत आणि वाचले आहेत. अशातच ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले यांनी त्यांची एक जुनी आठवण शेअर केली आहे.

विजय गोखले हे मराठी चित्रपट, नाटक आणि मालिका विश्वातील एक लोकप्रिय नाव आहे. आजवर आपल्या विविध भूमिकांमधून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. विजय गोखले यांच्या वडिलांमुळे बाळासाहेब ठाकरेंशी त्यांचा अनेकदा संबंध आला होता. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीमध्ये विजय यांनी बाळासाहेब ठाकरे यांची आठवण सांगितली आहे.

लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत विजय गोखले म्हणाले, “मला बाळासाहेबांचा सहवास लाभला. बाळासाहेब ठाकरे म्हणजे खूप मुक्त माणूस. वडिलांमुळे त्यांच्या अनेकदा गाठीभेटी झाल्या. तेव्हा माझ्या मालिकासुद्धा सुरू होत्या. तेव्हा शिवसेनेचे गजाभाऊ शिर्के यांचे निधन झाले होते. त्यानंतर मी बाळासाहेबांना विचारलं होतं की, मला संघटनेसाठी काम कारायचं आहे.”

यापुढे ते म्हणाले, “आमचे वडील गेल्यानंतर दोन-तीन कार्यक्रमांना बाळासाहेब ठाकरे आले होते. त्यांनी अनेकदा पुस्तकांचे प्रकाशन केले. आमचा नाट्यमहोत्सव त्यांनीच सुरू करून दिला. त्यांच्यामुळेच पुढे २० वर्षे तो महोत्सव सुरू राहिला. नाट्यमहोत्सवासाठी सुरुवातीचे आर्थिक आणि मानसिक सहकार्य बाळासाहेबांनी केलं होतं. या सगळ्यामुळेच मी त्यांना विचारलं होतं की, बाळासाहेब तुम्ही इतकं करता तर मीसुद्धा आपल्या संघटनेसाठी माझ्या क्षेत्राशी संबंधित काही करू शकता का? काही जबाबदारीचे काम करायला आवडेल असं मी म्हटलं होतं. त्यावर बाळासाहेब स्पष्टपणे म्हणालेले, काही गरज नाही. काही करू नकोस. जिथे आहेस तिथे सुखी आहेस. तुझ्या वडिलांना मी इकडे खेचून आणलं. लोकांना हसवण्याचे काम करत आहेस तेच कर. ते पुरे आहे. तू काय इकडे येऊ नकोस. पुन्हा विषय काढू नकोस.”

दरम्यान, विजय गोखले यांनी ‘थरथराट’, ‘धडाकेबाज’, ‘झपाटलेला’, ‘तीन बायका फजिती ऐका’सारख्या अनेक चित्रपटांत काम केले आहे. विजय गोखले यांच्याप्रमाणेच त्यांचा मुलगासुद्धा मनोरंजन विश्वात सक्रीय आहे. आशुतोष गोखले असं त्याचे नाव असून सध्या तो ‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.