बंदीही सही..

मालिका-चित्रपटाच्या सेटवर शूटिंगसाठी प्लॅस्टिक थर्माकोलचा वापर हा सर्रास केला जातो.

|| मितेश जोशी

राज्यात २२ जूनपासून लागू झालेल्या प्लॅस्टिक व थर्माकोल बंदीच्या निर्णयाचं स्वागत सामान्य जनतेसह कलाकारमंडळींनीसुद्धा त्यांच्या पातळीवर केलं आहे. पर्यावरणासाठी प्लॅस्टिक हे जणू विषच आहे. त्याच्या वापरावर उठवलेली बंदी म्हणजे भविष्यातील पर्यावरणासाठीचा एक सुवर्णकाळ असेल यात शंका नाही. बंदी जाहीर झाल्यानंतर जसा सर्वसामान्यांना घरातील प्लॅस्टिक थर्माकोलचं पुढे काय करायचं?, हा प्रश्न पडला अगदी त्याचप्रमाणे निर्माते-तंत्रज्ञ-कलादिग्दर्शक व कलाकार या सर्वांनाच सेटवरील प्लॅस्टिक-थर्माकोलचं काय करायचं? त्याला कोणता पर्याय उपलब्ध करून दयायचा?, हा प्रश्नार्थक गुंता निर्माण झाला. काही मालिकांच्या सेटवर हा गुंता सुटला असून काही मालिकांच्या सेटवर हा गुंता अजूनही जैसे थे आहे.

मालिका-चित्रपटाच्या सेटवर शूटिंगसाठी प्लॅस्टिक थर्माकोलचा वापर हा सर्रास केला जातो. शूटिंग करत असताना कलाकाराच्या चेहऱ्यावर फोकसचा प्रकाश जास्त पडू नये, यासाठी त्यांच्या पुढय़ात थर्माकोलचा जाडजूड आयत धरला जातो. सेट डिझाइन करताना कलादिग्दर्शक थर्माकोलच्या नानाविध शोभिवंत वस्तू वापरतो. सेटवरच्या सर्वच तंत्रज्ञ, कॅमेरामॅन, स्पॉटदादा अगदी कलाकार मंडळींचासुद्धा चहा म्हणजे आळस झटकण्याचं साधन असतं. दिवसभरात ठरलेल्या वेळात प्लॅस्टिकच्या कपमधून सेटवर प्रत्येकाला चहा कॉफी दिली जाते. दुपार व रात्रीच्या जेवणानंतर मोठय़ा बास्केटमध्ये (सेटवरील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीनुसार) जवळपास ३५ ते ४० हवाबंद प्लॅस्टिकच्या बाटल्या स्वतंत्रपणे प्रत्येकाला दिल्या जातात. बऱ्याचशा सेटवर त्याच प्लॅस्टिकच्या बाटल्या पुन्हा धुवून वापरल्या जातात. छोटय़ा मोठय़ा गोष्टी भरून ठेवण्यासाठी अगदी सहजपणे तुमच्या आमच्यासारखाच प्लॅस्टिकच्या  पिशव्यांचा वापर केला जातो. प्लॅस्टिकबंदी घोषित झाल्यापासूनच मालिकेच्या निर्मात्यांपुढे या सगळ्याच गोष्टींबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.   कलादिग्दर्शकाची सुद्धा अचानक झोप उडाली आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरच्या ‘छत्रीवाली’ या  मालिकेचे कलादिग्दर्शक सुमीत पाटील यांनी या मालिकेचा सेट प्लॅस्टिक थर्माकोल बंदी जाहीर होण्यापूर्वी २ महिन्याआधीच डिझाइन केला होता. म्हणून त्यांनी थर्माकोलच्या शोभिवंत वस्तूंचा उपयोग केला. जशी बंदी जाहीर झाली तशी त्यांना सेटवरच्या थर्माकोलच्या छोटय़ामोठय़ा सर्व वस्तू हटवून त्या वस्तूंना पर्याय म्हणून रबरच्या वस्तू वापराव्या लागल्या. थर्माकोलवर रंग काही तासात वाळतो. पण रबरच्या वस्तूंवर दिलेला रंग वाळयला दिवस जातो. त्यामुळे मालिकेचं शूटिंग एक दिवस बंद ठेवून सेट पुन्हा नव्याने डिझाइन करण्यात आला, असे सुमीत यांनी सांगितले.

नाटकांच्या बाबतीत कलादिग्दर्शक वगळता प्लास्टिक बंदीमुळे कोणी फारसे अडचणीत आले नाही. मात्र नाटकांचे सेट डिझाइन करताना वापरलेल्या थर्माकोल-प्लॅस्टिकला त्यांना नवा पर्याय उपलब्ध करून दयावा लागला. कलाकारांनी मात्र या बंदीचे स्वागत करत स्वत:पासूनच बदल घडवायला सुरूवात केली आहे.

अजूनही संभ्रमच

प्लॅस्टिक-थर्माकोल बंदी लागू होऊ न १० दिवस उलटून गेले असले तरीही अजूनही आमच्या सेटवर आणि आजूबाजूच्या  लोकांमध्ये अजूनही याबाबतीला गोंधळच दिसून येतो आहे. प्लॅस्टिकच्या मोठय़ा बॉटलवर बंदी आहे की छोटय़ा?,  इथपासून ते जाड प्लॅस्टिकची पिशवी वापरलेली चालते ना?, अशा अनेक मुद्दयांवर संभ्रम आहे. सेटवर प्लॅस्टिकच्या अनेक वस्तूंवर पर्याय आणण्यात आम्ही यशस्वी झालो असलो. तरी काही गोष्टींवर पर्याय शोधला जातो आहे. आम्ही कलाकार मंडळी बऱ्याचदा बाहेरून पार्सल मागवतो मग आता प्लॅस्टिकबंदी झाल्यावर काय करायचं?, असा प्रश्न सर्वासमोर उभा राहिला. आता आम्ही प्रत्येक जण घरून रिकामे स्टीलचे डबे सेटवर घेऊ न येतो आणि त्या डब्यांमध्ये हवे ते खाद्यपदार्थ पार्सल घेऊ न जातो. वैयक्तिक पातळीवर मी या बंदीचं खूप मनापासून स्वागत करतो.  – अभिजित खांडकेकर

 

इच्छा तिथे मार्ग

‘अनन्या’ नाटकात ज्या ज्या सेटला थर्माकोल वापरला गेला होता त्या त्या सेटला नव्याने झळाळी दयायचं काम करावं लागलं. विंगेत अगोदर प्रत्येकाला प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये पाणी दिलं जायचं. ज्याची जागा आता स्टीलच्या बॉटलने घेतली आहे. आम्ही कलाकार मंडळी आता शिस्तीत कापडी पिशवीचा वापर करतोय. वैयक्तिक जीवनात मी आधीपासूनच कापडी पिशवी वापरत होते. प्लॅस्टिक थर्माकोलला पर्याय काय ?, हा प्रश्न सर्रास विचारला जातोय. पण मला असं वाटते ‘इच्छा तिथे मार्ग’. शासनातर्फे अनेक ठिकाणी प्लॅस्टिक थर्माकोलला पर्याय असलेल्या गोष्टींचे प्रदर्शन भरवत आहेत. त्यातून मदत मिळेल शिवाय सर्वसामान्य नागरिकांना  घरातील प्लॅस्टिकचं काय करायचं?, हा प्रश्न पडला आहे त्यासाठीही अनेक सेवाभावी संस्था पुढे आल्या आहेत शिवाय इंटरनेटचीही मदत घेता येईल.     – ऋतुजा बागवे

 

बंदी आपल्या फायद्याची

कोणतीही सवय सोडताना अतिशय त्रास होतो. परंतु ती गोष्ट किंवा सवय सोडल्यानंतर पुढे आपला फायदाच असतो.  ही बंदीही अशीच आहे. ‘संभाजी’ मालिका ही ऐतिहासिक मालिका असल्यामुळे सेटवर प्लॅस्टिक—थर्माकोलचा वापर तसा फार होत नव्हता. केवळ शूटिंगच्या वेळी कॅमेऱ्यासमोर थर्माकोल वापरला जात होता. पूर्वी थर्माकोल न धरता ट्राय बोर्डला रंग देऊ न त्याला सॅटिन लावून तो बोर्ड धरला जायचा आता आम्ही अशाच प्रकारचा बोर्ड धरतोय. मातीच्या कुल्लडमध्ये चहा पितोय. जिथे जिथे छोटय़ा प्रमाणावर प्लॅस्टिक वापरलं जातंय त्याला उपाय शोधण्याचं काम आम्ही सर्वच जण एकत्र येऊन करतोय. या बंदीच्या माध्यमातून वैयक्तिक पातळीवर देखील बदल घडवलेला आहे. अगोदर मी जिमला जाताना जिमचे शूज प्लास्टिक पिशवीत बांधून न्यायचो, जे मी आता कापडी पिशवीतून नेतोय.     – डॉ अमोल कोल्हे

 

बदल स्वत:पासून

प्लॅस्टिक थर्माकोल बंदी जाहीर झाल्या दिवसापासून मी सर्वप्रथम माझ्यात बदल घडवते आहे. छोटय़ा—मोठय़ा पातळीवर मी जिथे जिथे प्लॅस्टिक वापरत होते ते वापरणं मी पूर्णत: सोडून दिलं  आहे. ‘चला हवा येऊ  द्या’ या कथाबा कार्यRमाच्या सेटवर प्लॅस्टिक थर्माकोलला पर्याय उपलब्ध करून देण्याचं काम तज्ञ मंडळींच्या सहाय्याने सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. सगळाच भार दिग्दर्शक डॉ निलेश साबळेंवर न घालता तो भार आम्ही आमच्या पातळीवर देखील उचलत आहोत. चहासाठी आता सगळ्यांनीच त्यांच्या घरून स्टीलचा किंवा काचेचा मग सेटवर आणून ठेवला आहे. जे सांभाळणं थोडं कठीण जरूर आहे परंतु अशक्य नाही. सेटवर जिथे जिथे थर्माकोल वापरला गेला आहे तो काढून त्याला पर्याय उपलब्ध केला जातोय. सेटवर बदल जरूर घडेल पण त्याला काही दिवसांचा अवधी जाईल एवढं मात्र निश्चित !    – श्रेया बुगडे

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Marathi actors on maharashtra plastic ban