मराठी अभिनेत्री उर्मला निंबाळकर हिने चित्रपटसह विविध मालिकांमध्ये काम केलं. तिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. उर्मिलाने आपली स्वत:ची ओळख कंटेट क्रिएटर म्हणूनही केली. लाइफस्टाइलच्या संबंधित व्हिडीओ उर्मिला कायमच शेअर करत असते. अलिकडेच उर्मिलाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत उर्मिलाने गुलाबी रंगाची साडी नेसली. पण या साडीवरुन अभिनेत्रीला ट्रोल करण्यात आलं. तिने खास शोसाठी ही साडी नेसली होती. एका वेगळ्या पद्धतीने तिने साडी नेसली होती. कार्यक्रमात जाण्यापूर्वी अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर केला. काहींनी तिला डायरेक्ट मेसेज आणि कमेंटमध्ये, ‘गँगरेप, Domestic Violence’ अशा प्रकारचे टेक्स्ट केले याबाबत उर्मिलाने आता एक व्हिडीओ पोस्ट केला आहे आणि तिची भूमिका मांडली आहे.

काय म्हटलंय अभिनेत्री उर्मिला निंबाळकरने?

ही साडी नेसल्यामुळे आणि अशा पद्धतीने नेसल्यामुळे मला गँगरेप, डोमेस्टिक व्हायलन्स आणि तुझा मर्डर करू अशा धमक्या देण्यात आल्या. कमेंट्समध्ये, डीएममध्ये, युट्यूबवर, इन्स्टाग्रामवर, फेसबुकवर सगळीकडे अशाच धमक्या देण्यात आल्या. फेसबुकवरची पोस्ट तर मला अर्काइव्ह करावी लागली. इतकी गंमत वाटते की कारण भारतीय संस्कृतीत साडी नेसण्याच्या १०० हून जास्त पद्धती आहेत. साडी ड्रेपिंगच्या मोजक्याच स्टाईल्स मला नेसता येतात आणि नेसवता येतात. जसं की मदुराई, सिधा पल्लू, कुरगी, मेखला, पारसी गाला अशा. खरंतर साडी नेसायच्या आणि नेसवण्याच्या वेगळ्या पद्धती आहेत. राज्याप्रमाणे साडी नेसण्याची पद्धत बदलत नाही. तर महाराष्ट्रातही पावलागणिक वेगळ्या पद्धतीने साडी नेसली जाते, मग ती सहावार असो किंवा नऊवार.

एका बाईने मला विचारलं की तू सेक्स वर्कर झाली आहे का? – उर्मिला निंबाळकर

उर्मिला याच व्हिडीओत पुढे म्हणते मधल्या काळात फ्युजन्सही आले. म्हणजे धोती किंवा मरमेड स्टाईल असेल अशा वेगवेगळ्या पद्धती आल्या. हेच तर आपल्या सौंदर्याचं वैविध्य आहे. एक तर मी जी साडी नेसून ते रिल केलं होतं ती प्युअर हँडलुम कोरा सिल्कची साडी होती. बनारसी साडीची वैशिष्ट्यं दोन आहेत ही साडी पारदर्शक असते आणि या साडीचे रंग खूप सुरेख असतात. खरंतर सिल्कची साडी नेसण्यासाठी अतिशय सुळसुळीत असते आणि नेसण्यासाठी अतिशय कठीण असते. मी साडी नेसण्याचं प्रशिक्षण घेतलं आहे आणि चित्रपटांसाठी किंवा मालिकांसाठी ड्रेपिंग केलं आहे त्यामुळे मी साडी स्वतःही वेगवेगळ्या पद्धतीने नेसू शकते आणि इतर कुणी असेल तर त्यांना नेसवू शकते. तरीही माझ्यासाठी ही साडी नेसणं आव्हानात्मक असते. त्यामुळे ती साडी चापून चोपून नेसताच येत नाही. आता आज जर का माझ्या डाव्या बाजूची कंबर दिसली तर मी अतिशय सज्जन, संस्कारी आणि संस्कृती टिकवणारी वाटते. पण उजव्या बाजूची कंबर दाखवली तर माय गॉड. एका बाईने तर मला तू आता सेक्स वर्कर झाली आहेस का? असंही म्हटलं आणि मला त्यावर इतकं हसू येत होतं. कारण तिला हे माहीतच नव्हतं की भारतीय इतिहासात साडी नेसण्याच्या खूप पद्धती आहेत त्यातल्याच एका पद्धतीने मी साडी नेसले होते. मी वेगळं काहीही केलं नव्हतं. उलट मला असं वाटतं की १०० मधल्या काहीतरी नवी पद्धतीने साडी नेसायला, ती साडी कशी नेसायची ते शिकवायला खूप आवडेल. इतकंच मला म्हणायचं आहे. आपल्याला अनेकदा कारणं, इतिहास माहीत नसतं. पण दुसऱ्यांना नावं ठेवणं सोपं असतं. मी ते सगळं खूप एंजॉय केलं असं म्हणत उर्मिला निंबाळकरने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. जो चर्चेत आला आहे.