Marathi Actress Reaction On Standup Comedy : विनोद हा खरंतर खळखळून हसायला भाग पाडतो. पण गेल्या काही दिवसांत विनोदामुळे हसण्यावर बंधनं आली आहेत. आक्षेपार्ह जोक, भाषा किंवा शब्द या साऱ्यामुळे ‘स्टँडअप कॉमेडी’ हा कलाप्रकार चर्चेचा विषय ठरत आहे. खरंतर स्टँड अप कॉमेडी म्हटली की, अनेकांच्या चेहऱ्यावर हमखास हसू येतं. पण गेल्या काही महिन्यांत स्टँडअप कॉमेडीमुळे वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.

स्टँडअप कॉमेडी शोमध्ये प्रेक्षकांची मस्करी केली जाणं, त्यांच्यावर जोक करणं किंवा विनोदाअडून कोणावर तरी टीका करणं हे सर्रास होत असतं. त्यामुळे कधीकधी प्रेक्षकांनी जोकवर हसण्याऐवजी वाद होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या सर्व परिस्थितीवर मराठी अभिनेत्रीनेही तिचं मत व्यक्त केलं आहे. यावेळी तिने दुसऱ्यावर विनोद करणं म्हणजे कॉमेडी नाही असं स्पष्टपणे म्हटलं.

मराठी अभिनेत्री अनुजा साठेने आरपारला दिलेल्या मुलाखतीत आजच्या कॉमेडीबद्दल तिचं मत व्यक्त केलं. याबद्दल अनुजा असं म्हणाली, “काही कॉमेडीयन्स आहेत, ज्यांचे विनोद मला आवडतात. काही मराठी मुलंही आहेत, जे खूप चांगली कॉमेडी करतात. अनेक स्टँडअप कॉमेडी शो हे खरंच विनोदी असतात. पण काही वेळेस कोणावर तरी विनोद केले जातात आणि ते करणं म्हणजे कॉमेडी नाही.”

यानंतर ती म्हणाली, “दुसऱ्यावर जोक करणं याला कॉमेडी म्हणत नाहीत. प्रसंगनिष्ठ जोक असेल तर मला आवडतं. मी एक उदाहरण सांगते, कपिल शर्माच्या शोमध्ये मी तीनवेळा गेले आहे आणि या तिन्ही वेळेस जी स्किट्स झाली; ती अगदी कमाल होती. पण पुन्हा तेच की, ते कोणावर तरी विनोद करून किंवा कोणाचा तरी अपमान करून जोक नाही करत. त्यांचे जोक पूर्णपणे निखळ आणि विनोदी असतात.”

दरम्यान, अनुजा साठे ही आजची आघाडीची अभिनेत्री आहे. मराठी मनोरंजन विश्वात तिने आज स्वत:ची ओळख बनवलीच आहे. मराठीसह हिंदी सिनेमा आणि अनेक गाजलेल्या वेबसीरीजमधून अनुजा साठेने प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘परमाणू’, ‘बाजीराव-मस्तानी’ अशा गाजलेल्या चित्रपटांत, तसंच ‘बेगम’ वा ‘महारानी २’ सारख्या गाजलेल्या सीरिजमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. याशिवाय अनुजा ‘पेशवा बाजीराव’, ‘झांसी की रानी’, ‘मांडला दोन घडीचा डाव’ या मालिकांमध्येही झळकली आहे.