Neerad Sumeet shares Protest Video: नीट पेपरफुटीनंतर विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. कॉक्रोज जनता पार्टीने सुरू केलेल्या आंदोलनाला आता मोठे स्वरूप प्राप्त झाले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. सध्या जंतर मंतर येथे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात विद्यार्थी, पालक, अनेक लोकप्रिय कलाकार सहभागी झाले आहेत. शबाना आझमी, प्रकाश राज, स्वरा भास्कर असे कलाकार या आंदोलनामध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांना, आंदोलनाला पाठिंबा देत आहेत.
या आंदोलनातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता लोकप्रिय मराठी अभिनेत्री चिन्मयी सुमीत, त्यांचा मुलगा नीरद व मुलगी दिया हेही या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
‘चलो संसद’ म्हणत सुमित राघवन यांचं कुटुंब आंदोलनात सहभागी
नीरदने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो त्याच्या आई व बहिणीबरोबर जंतर मंतरवर गेला असून, या आंदोलनात सहभागी झाल्याचे पाहायला मिळते. व्हिडीओच्या सुरुवातीला ते बाहेर जाण्यासाठी तयार असल्याचे पाहायला मिळते. त्यांनी पाठीला बॅग अडकवल्या आहेत. त्यावर अ फॅमिली आऊटिंग, असे लिहिले आहे. त्यानंतर ते जंतर मंतर येथे पोहोचले असल्याचे दिसते. तरुण अनेक घोषणा देत असल्याचे पाहायला मिळते.
नीरदसुद्धा ‘चलो संसद’च्या घोषणा देत असल्याचे पाहायला मिळत आहे. व्हिडीओच्या शेवटी शांत बसणे हा पर्याय असू शकत नाही, असेही लिहिले आहे. नीरदने हा व्हिडीओ शेअर करताना सर्व कुटुंब दिल्लीला नारा देण्यासाठी पोहोचले, असे लिहिले. तसेच कॉक्रोज जनता पार्टीच्या इन्स्टाग्राम अकाउंटला टॅग केले आहे.
नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
नीरदच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. हजारो नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे. एकाने लिहिले, “तुझा अभिमान आहे.” दुसऱ्या एकाने लिहिले, “हे कधीच विसरणार नाही.” एकाने लिहिले, “सर्वांनी काळजी घ्या, सुरक्षित राहा.” आणखी एकाने लिहिले, “खूप छान, तुमचा अभिमान वाटतो.” एकाने लिहिले, “तुम्ही तिघंही खूप महत्वाचं उदाहरण तयार करीत आहात. फक्त बोलून नाही; तर कृतीतून तुम्ही प्रेरणा देत आहात.” आणखी एकाने लिहिले, “हे केल्याबद्दल थँक्यू”, अशा अनेकविध कमेंट्स आहेत. त्यामधून नेटकऱ्यांनी दिया, नीरद व चिन्मयी सुमीत यांचे कौतुक केले आहे; तसेच त्यांना सुरक्षित राहण्याचेही आवाहन केले आहे. तसेच अनेक कलाकारांनीदेखील त्यांचे कौतुक केले आहे.
दरम्यान, अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करीत या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.
