scorecardresearch

कर्तव्यदक्ष महिला तुरुंग अधिकार्‍याच्या भूमिकेत मुक्ता बर्वे

हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे

मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी अभिनेत्री मुक्ता बर्वे लवकरच एका नव्या धाटणीच्या चित्रपटामध्ये झळकणार आहे. ‘बंदिशाळा’ असं या चित्रपटाचं नाव असून हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित आहे. ‘बंदिशाळा’ या चित्रपटामध्ये मुक्ता मध्यवर्ती भूमिका साकारणार आहे. त्यामुळे तिची ही भूमिका पहाण्यासाठी चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. हा चित्रपट येत्या २१ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘जोगवा’, ‘पांगिरा’, ‘७२ मैल एक प्रवास’ या गाजलेल्या दर्जेदार चित्रपटांचे लेखक, प्रस्तुतकर्ते संजय कृष्णाजी पाटील हे या चित्रपटाची धुरा सांभाळत आहेत.

मिलिंद लेले दिग्दर्शित हा चित्रपट महिलाप्रधान असून ‘बंदिशाळा’ या सत्य घटनेवर आधारित या चित्रपटाची कथा लिहिण्यात आली आहे. चित्रपटाची कथाही संजय कृष्णाजी पाटील यांनी लिहिली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने संजय पाटील पहिल्यांदाच कादंबरी बाहेरील विषयावर लिखाण करत आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाची महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने कान्ससाठी निवड झाली असून ५६ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शनाच्या घोषित पुरस्कारासह ६ विभागांमध्ये नामांकने मिळाली आहेत.

शांताई मोशन पिक्चर्स’ या संस्थेची ही पहिली निर्मिती आहे. स्वाती संजय पाटील या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. ‘बंदिशाळा’ हा एक सामाजिक महत्वाकांक्षी चित्रपट असून त्याला एका कारागृहाची पार्श्वभूमी लाभली आहे. एका कर्तव्यदक्ष महिला तुरुंग अधिकार्‍याची कथा या चित्रपटातून उलगडण्यात येणार आहे. हा वेगळा विषय मुक्ता बर्वे या अभिनेत्रीने उत्तुंग शिखरावर पोहचविला आहे. तिने या चित्रपटात माधवी सावंत या महिला तुरुंग अधिकाऱ्याची भूमिका वठविली आहे. आजपर्यंतची सर्वाधिक आव्हानात्मक भूमिका तिला या निमित्ताने करायला मिळाली आहे.

हा चित्रपट मिलिंद लेले यांनी दिग्दर्शित केला आहे. ‘५६ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये’ सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शन घोषित पुरस्कारासह ६ विभागांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट निर्मिती, सर्वोत्कृष्ट चित्रपट निर्माता पदार्पण, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट गीतकार, सर्वोत्कृष्ट गायिका, सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीतासह पहिल्या सर्वोत्कृष्ट दहा चित्रपटामध्ये बाजी मारली आहे.

‘बंदिशाळा’या चित्रपटात मुक्ता बर्वे यांच्यासोबतच विक्रम गायकवाड, शरद पोंक्षे, हेमंगी कवी, सविता प्रभुणे, अशा शेलार, प्रवीण तरडे, अश्विनी गिरी, अजय पुरकर,माधव अभ्यंकर, शिवराज वाळवेकर, आनंद आलकुंटे, अभिजीत झुंजारराव, आनंदा कार्येकर, प्रसन्न केतकर, वर्षा घाटपांडे, सोनाली मगर, प्रताप कळके, राहुल शिरसाट, पंकज चेंबूरकर, लक्ष्मीकांत धोंड, अनिल राबाडे, उमेश बोलके, अनिल नगरकर आणि उमेश जगताप यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण, पुणे शहर, पुणे ग्रामीण, भोर तालुका, मुंबई अशा ठिकाणी करण्यात आले आहे. ही एक भव्य आणि उत्कंठावर्धक कलाकृती असून येत्या २१ जून २०१९ रोजी आपले मनोरंजन करण्यासाठी जवळच्या चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi actress mukta barve new marathi movie bandishala

ताज्या बातम्या