मराठी अभिनेत्री पूजा सावंतचा ‘लपाछपी’ हा सिनेमा चांगलाच गाजला होता. या सिनेमातील तिच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल अनेक पुरस्कारांनी घेतली असून, तिच्या अभिनयकौशल्याला चारचाँद लावणाऱ्या या पुरस्कारांच्या यादीत आणखी एक मानाचा पुरस्कार सामील होणार आहे. भारतीय चित्रपटाचे जनक दादा साहेब फाळके यांच्या १४९व्या जयंतीप्रित्यर्थ स्माईल फाउंडेशनद्वारे आयोजित करण्यात येत असलेल्या दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी पूजाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून नावाजण्यात येणार आहे. येत्या २१ एप्रिल रोजी वांद्रे येथील सेंट अॅड्रयूज ऑडीटोरियममध्ये पूजाला हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

स्माईल फाउंडेशन अखत्यारीत देण्यात येणारा हा पुरस्कार दादासाहेब फाळके यांच्या कुटुंबियांकडून चित्रपटसृष्टीतील यशस्वी कलाकारांना त्यांच्या कामगिरीसाठी देण्यात येतो. त्यानुसार यावर्षीचा हा मान ‘लपाछपी’ सिनेमातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पूजाला मिळाला.

वाचा : लतादीदींच्या पत्राने जुही चावलाला सुखद धक्का

केवळ भारतातूनच नव्हे तर, जगभरातून ‘लपाछपी’ आणि पूजा सावंतच्या अभिनयाची दखल घेतली जात आहे. ‘श्रावणक्वीन’ झाल्यानंतर पूजा सावंतने ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. ‘क्षणभर विश्रांती’ या तिच्या पहिल्याच चित्रपटात तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. यानंतर झकास, सतरंगी रे, पोस्टर बॉईज , निळकंठ मास्टर, दगडी चाळ, भेटली तू पुन्हा, लपाछपी या चित्रपटात तिने आपले अभिनय कौशल्य दाखविले. नैसर्गिक अभिनय आणि सौंदर्याच्या बळावर पूजाने मराठी चित्रपटसृष्टीत आपले विशेष स्थान निर्माण केले असून, तिच्या चाहत्यांची संख्यादेखील दिवसागणिक वाढत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते.