scorecardresearch

“मी सातवीत असल्यापासून…” पूजा सावंतला करायचं आहे ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीच्या बायोपिकमध्ये काम

याबरोबरच पूजाला पुन्हा ‘लपाछुपी’ सारख्या वेगळ्या भयपटात काम करायला आवडेल असंही तिने स्पष्ट केलं आहे.

“मी सातवीत असल्यापासून…” पूजा सावंतला करायचं आहे ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीच्या बायोपिकमध्ये काम

मराठी चित्रपटसृष्टिमध्ये सध्या बरेच वेगवेगळे प्रयोग होत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ‘दगडी चाळ’ हा चित्रपट. डॉन अरुण गवळी यांच्यावर साच्यातला चरित्रपट न बनवता एक वेगळं काल्पनिक कथानक या चित्रपटाच्या पहिल्या भागात पाहायला मिळाले होते. प्रेक्षकांनी या चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद दिला होता. आता या चित्रपटाचा दूसरा भाग प्रदर्शित होणार आहे. त्यानिमित्ताने ‘दगडी चाळ २’ चित्रपटाची स्टारकास्ट आणि दिग्दर्शक यांनी लोकसत्ता ऑनलाइनच्या ‘डिजिटल अड्डा’वर हजेरी लावली. अभिनेता अंकुश चौधरी, मकरंद देशपांडे, अभिनेत्री पूजा सावंत आणि चंद्रकांत कानसे यांनी यानिमिताने लोकसत्ता ऑनलाईन टीमशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.

याच मुलाखतीत पूजा सावंतने ‘दगडी चाळ’विषयी आणि त्यात काम करताना तिला आलेल्या अनुभवांविषयी गप्पा मारल्या. पूजा सावंतने भविष्यात तिला कोणत्या अभिनेत्रीचा बायोपिक किंवा वेगळी भूमिका करायला आवडेल याबद्दल खुलासा केला आहे. पूजाला स्वर्गीय अभिनेत्री स्मिता पाटील यांची भूमिका चारित्रपटात साकारायची इच्छा आहे. ही इच्छा तिने ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’च्या माध्यमातून व्यक्त केली आहे. स्मिता पाटील यांचं एकंदरच व्यक्तिमत्व, त्यांचा अभिनय आणि त्यांचा पडद्यावरचा वावर हेच यमागचं कारण असल्याचं पूजाने स्पष्ट केलं आहे. पूजाने सातवीत असताना जैत रे जैत पाहिला आणि तेव्हापासूनच तिच्या मनात स्मिता पाटील यांनी कायमचं घर केलं होतं.

याबरोबरच पूजाला पुन्हा ‘लपाछुपी’ सारख्या वेगळ्या भयपटात काम करायला आवडेल असंही तिने स्पष्ट केलं आहे. ‘लपाछुपी’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आणि पूजाच्या अभिनयाचं कौतुक झालं. त्यानंतर पूजाला अशा प्रकारचे बरेच चित्रपट ऑफर झाले. ‘लपाछुपी’सारखी वेगळी गोष्ट तिला इतर कथेत दिसली नाही म्हणून तिने ते चित्रपट करण्यास नकार दिला आहे.

येत्या १९ ऑगस्टला ‘दगडी चाळ २’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पहिल्या भागाचे आणि या दुसऱ्या भागाचेही दिग्दर्शन चंद्रकांत कानसे यांनी केले आहे. सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद देशपांडे यांना या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा डॅडींच्या अवतारात बागण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

आणखीन वाचा : सलमान खानही मराठी चित्रपटाच्या प्रेमात! अंकुश चौधरीच्या ‘दगडी चाळ २’साठी लिहिली खास पोस्ट

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi actress pooja sawant wants to work in this veteran actress biopic avn

ताज्या बातम्या