Sonalee Kulkarni-Dipika Kakar Meet : मे महिन्यात टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्करला स्टेज २ लिव्हर कॅन्सर असल्याचे निदान झाले. त्यानंतर जूनमध्ये, अभिनेत्रीच्या यकृतातील घातक ट्यूमर शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकण्यात आला.

कॅन्सरवर उपचार घेत असलेल्या दीपिका कक्करची भेट घेण्यासाठी मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या घरी पोहोचली. याबाबत दीपिकाने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे.

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर आणि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या बालपणीच्या मैत्रिणी आहेत. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी खूप काळानंतर आपली जुनी मैत्रिण दीपिका कक्करला भेटली आहे.

दीपिका कक्करने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये त्या दोघी एकमेकांना प्रेमाने मिठी मारताना दिसत आहेत. याला दीपिकाने खास कॅप्शनदेखील दिले आहे, तर दीपिकाची स्टोरी रिपोस्ट करत सोनाली कुलकर्णीनेदेखील आपले प्रेम व्यक्त केले आहे.

सोनाली कुलकर्णी इन्स्टाग्राम स्टोरी

“सोनाली आणि दीपिका KV1 देहू रोडपासून आतापर्यंत… काही नाती कधीच बदलत नाहीत, काळजी, प्रेम, आपुलकी बदलत नाही… आम्ही दोघी सारख्या भेटत नसलो तरीदेखील आमच्यातलं नातं तसंच आहे. कायम माझ्याबरोबर राहण्यासाठी खूप धन्यवाद… लव्ह यू सोनाली.” ही स्टोरी रिपोस्ट करून सोनालीने “प्रेम… मला तुझा खूप अभिमान आहे…तू चीअरलीडर आहेस,” असं कॅप्शन दिलं आहे. दीपिका आणि सोनाली एकाच शाळेत शिकल्या आहेत.

काही दिवसांपूर्वीच दीपिका कक्करला कॅन्सरचं निदान झालं आहे. सध्या दीपिका यावर उपचार घेत आहे. अभिनेत्री आणि कुटुंबीयांना लिव्हरला असलेला ट्यूमर कॅन्सरचा असल्याचं समजल्यानंतर मोठा धक्का बसला होता. शोएब इब्राहिम कर्करोगाशी झुंजणाऱ्या दीपिकाच्या प्रकृतीशी संबंधित प्रत्येक लहान-मोठी माहिती त्याच्या सोशल मीडियावर शेअर करत राहतो.

आता शोएबने दीपिकाच्या तब्येतीबाबत एक नवीन खुलासा केला आहे. त्याने सांगितले की, अभिनेत्रीला पुढील आठवड्यात टार्गेटेड थेरेपी घ्यावी लागेल. त्यांच्या नवीनतम ब्लॉगमध्ये, या जोडप्याने याबद्दल संपूर्ण माहिती शेअर केली आहे. शोएब इब्राहिमने सांगितले की अलीकडेच ३ जुलै रोजी सर्जरीला एक महिना पूर्ण झाला.

सोनाली सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहे. ती इन्स्टाग्रामवर तिचे फोटो टाकत असते. सोनाली कुलकर्णीने आजवर मितवा, धुरळा, हंपी, झिम्मा, बकुळा नामदेव घोटाळे, नटरंग असे गाजलेले चित्रपट केले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.