देशभरामध्ये नवरात्रोत्सवाचा उत्साह सुरु असतानाच या नऊ दिवसांमध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडितने देवीची नऊ रुपं साकारत सामाजिक मुद्द्यावर प्रकाश टाकला. त्यामुळे तेजस्विनीचे नवरात्रोत्सवातील फोटो चांगलेच चर्चेत आले. मात्र देवीची ही नऊ रुप साकारण्यासाठी आणि त्याचं फोटोशूट करण्यासाठी तेजस्विनीला तब्बल २७ तास लागल्याचं समोर आलं आहे.

एक थीम ठरवून नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रुपांमध्ये फोटोशूट करुन एक नवा संदेश समाजामध्ये पोहोचविण्याचा नवा ट्रेण्ड तेजस्विनीने सुरु केला. गेल्या तीन वर्षांपासून तेजस्विनी असं फोटोशूट करत आहे. यंदादेखील तिने समाजजागृती करणारे संदेश दिले आहेत. मात्र हे फोटोशूट करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागल्याचं दिसून येत आहे. तब्बल २७ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर तेजस्विनीचं देवीच्या रुपातील फोटोशूट पूर्ण झालं.

‘पहिल्या वर्षी फोटोशूट करताना आपण असा काही ट्रेंड सुरू करावा. असं मनात नव्हतं. त्यावेळी ब-याच कालावधीपासून मनात असलेली खदखद मांडावी, एवढंच डोक्यात होतं. आणि त्यावेळी मनाला भिडलेल्या सामाजिक प्रश्नांवर एक फोटोशूट केले. दुस-या वर्षी प्रत्येक दिवसाचं वेगवेगळ्या नऊ देवींच महात्म्य फोटोशूटव्दारे मांडलं. तर यंदा तिस-या वर्षी एक नागरिक म्हणून भेडसावणा-या काही सामाजिक मुद्द्यावर आपल्या पध्दतीने भाष्य करावं, असं वाटलं,’असं तेजस्विनीने सांगितलं.

पुढे ती म्हणते, ‘बऱ्याचदा कलाकार हा टीकेचा विषय असतो. आम्ही मत मांडलं तरी टीका होते किंवा नाही मांडलं तरी टीका होतेच. परंतु मी माझं मत मांडण्यासाठी फोटोशूटचा मार्ग अवलंबला त्यावेळी माझ्यावर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव झाला’. तेजस्विनीने असे फोटोशूट केल्यावर अनेक अभिनेत्रींनी आणि तिच्या चाहत्यांनीही असे फोटोशूट करायला सुरूवात केली. एका अर्थाने तेजस्विनी नवरात्री फोटोशूटमध्ये ट्रेंडसेटरच ठरली.