अभिनेत्री तेजस्विनी पंडितने आज देवीच्या रुपातील तिसरा फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या माध्यमातून तिने स्वच्छतेचा संदेश देण्यासोबतच स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. दरवर्षी नवरात्रीच्या काळात तेजस्विनी देवीच्या रुपातील वेगवेगळे फोटो शेअर करत असते. या फोटोच्या माध्यमातून ती कायम सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करत असते.

तेजस्विनीने तिच्या इन्स्टाग्रामवर स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या रुपातील एक फोटो शेअर केला आहे. जनतेच्या स्वच्छतेसाठी स्वत:च्या आरोग्याची काळजी न करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना तिने सलाम केला आहे. कोणताही ऋतू , परिस्थिती किंवा कोणतंही संकट असो स्वच्छता कर्मचारी कायम त्यांचं काम चोख बजावत असतात. खरंतर सध्या लॉकडाउनच्या काळात प्रत्येक जण वर्क फ्रॉम होम करतोय. मात्र, या कर्मचाऱ्यांना एक दिवसाचीदेखील सुट्टी मिळत नाहीये किंवा त्यांना घरी राहून कामदेखील करता येत नाहीये. त्यामुळेच तेजस्विनीने या कर्मचाऱ्यांच्या कार्याला सलाम केलं आहे.

“मला ना lockdown ची सुट्टी, ना work from home ची मुभा. तुझ्या स्वच्छ श्वासासाठी देह हा माझा सदैव उभा, देह हा माझा सदैव उभा…..”, असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे.

दरम्यान, यापूर्वी तेजस्विनीने मुंबई पोलीस, डॉक्टर यांच्या कार्याला सलाम केला आहे. तेजस्विनी दरवर्षी नवरात्रीमध्ये अनोख्या पद्धतीने देवीच्या वेशातील फोटो शेअर करत असते.