होळी आणि धुळवडीचे नाते रंगांप्रमाणेच सुरातून अर्थात गाण्यांमधूनही व्यक्त होते. होळी व धुळवडीच्या आसपास विविध एफ.एम. रेडिओ स्टेशन्स तसेच दूरचित्रवाहिन्यांवरून होळी आणि धुळवडीची गाणी लागायला सुरुवात होते. त्यात अमिताभ बच्चन यांच्या ‘रंग बरसे भीगे चुनरवाली रंग बरसे’ या गाण्यासह ‘होली के दिन दिल खिल जाते है’, ‘आज ना छोडेंगे बस हमजोली खेलेंगे हम होली’, ‘आयी आयी रे होली’ आदी गाणी कानावर आदळायला लागतात. गेल्या काही वर्षांपासून विविध वृत्तवाहिन्यांनीही होळी व धुळवडीचा अन्य उत्सवांप्रमाणे ‘इव्हेंट’ करून टाकला असल्याने वेगवेगळ्या माध्यमातून होळीचे हे रंग आपल्यासमोर उलगडत जातात. यात होळीच्या गाण्यांबरोबरच हास्यकवी संमेलन, मुशायरा या कार्यक्रमांचाही समावेश असतो. राज कपूर हयात असताना ‘आरके’ स्टुडिओमध्ये साजरी होणारी धुळवड बॉलीवूडसाठी आकर्षणाचा मुख्य केंद्रबिंदू असायची. ‘आरके’ परिवाराने ही परंपरा पुढेही सुरू ठेवली आहे. ‘शो मॅन’ म्हणून ओळखले जाणारे सुभाष घई यांनीही धुळवड सुरू केली. बॉलीवूडमधील कलाकारांचा कित्ता गिरवित मराठी चित्रपट, नाटक आणि मालिका क्षेत्रातील मराठी कलाकारांनीही एकत्र येऊन धुळवड खेळायला गेल्या काही वर्षांपासून सुरुवात केली आहे. त्याला प्रतिसादही चांगला आहे.

होळी, धुळवड साजरी करण्यासाठी जी गाणी लावली जातात त्यात प्रामुख्याने हिंदी गाण्यांचाच समावेश असला तरी मराठीतही होळी व रंगपंचमीविषयक गाणी आहेत. हिंदीच्या तुलनेत ती कमी असली तरी होळी व रंगपंचमीची ही गाणी आजही लोकप्रिय आहेत. मराठीतील होळी किंवा रंगपंचमी गाणी ही प्रामुख्याने लावणी स्वरूपात किंवा राधा-कृष्ण यांना समोर ठेवून सादर झालेली आहेत. मराठीतील ही गाणी रसिकांच्या ओठावर आणि स्मरणात आहेत. यामध्ये ‘नटून थटून पंचीम आली औंदाच्या ग साली’, ‘आज गोकुळात रंग खेळतो हरी, ‘राधिके जरा जपून जा तुझ्या घरी’, ‘किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला’, ‘अग नाच नाच राधे उडवू या रंग, रंगामधी भिजलं तुझं गोरं गोरं अंग’, ‘खेळताना रंग बाई होळीचा होळीचा, फाटला गं कोना माझ्या चोळीचा’, ‘सख्या चला बागामंदी रंग खेळू चला’, ‘होळीचं सोंग घेऊन लावू नको लाडीगोडी’ ही गाणी विशेष लोकप्रिय आहेत.

मराठीतील ‘आई’ या चित्रपटात अभिनेत्री लीला गांधी यांच्यावर चित्रित झालेले ‘नटून थटून पंचीम आली औंदाच्या ग साली’ हे लोकप्रिय आहे. कवी आणि गझलकार सुरेश भट यांनी लिहिलेले ‘आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी’ हे आणखी एक मराठीतले ‘हिट’ होळी गाणे. हृदयनाथ मंगेशकर यांचे संगीत आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील हे गाणे लोकप्रिय असून स्नेहसंमेलनात या गाण्यावर आजही नृत्य केले जाते.

तो चटोर चित्तचोर वाट रोखतो

हात ओढूनी खुशाल रंग टाकतो

रंगवून रंगुनी गुलाल फासतो

असे सांगत सुरेश भट पुढे-

सांग श्यामसुंदरास काय जाहले

रंग टाकल्याविना कुणा न सोडले

ज्यास त्यास रंग रंग रंग लागले

एकटीच वाचशील काय तू तरी

असेही लिहून जातात.

जगदीश खेबूडकर यांनी लिहिलेले, प्रभाकर जोग यांनी संगीतबद्ध केलेले आणि आशा भोसले यांनी गायलेले ‘सतीचं वाण’ या चित्रपटातील ‘किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला’ हे गाणेही होळी आणि रंगपंचमीच्या निमित्ताने ऐकायला व पाहायला मिळते.

खेळ असा रंगला गं

खेळणारा दंगला

टिपरीवर टिपरी पडे

लपून छपून गिरिधारी

मारतो गं पिचकारी

रंगाचे पडती सडे

फेर धरती दिशा

धुंद झाली निशा

रास रंगाच्या धारात न्हाला

असे या गोपिका म्हणतात.

या गाण्यात विनोदी अभिनेते धुमाळ हे कृष्णाच्या वेषात आहेत तर सर्व गोपिका त्यांच्याभोवती फेर धरून गाणे म्हणताना व नृत्य करताना दाखविल्या आहेत. मराठीतील हे अजरामर गाणे आहे. हे गाणे रंगपंचमीसंबधित असले तरी ते प्रामुख्याने नवरात्रात गरब्याच्या वेळी हमखास वाजविले जाते. गाण्याचा ठेका गरबा शैलीतील आहे.

‘गोंधळात गोंधळ’ या चित्रपटातील ‘अगं नाच नाच राधे उडवू या रंग, रंगामधी भिजलं तुझं गोरं गोरं अंग’ हे मराठीतील आणखी एक लोकप्रिय गाणे. अशोक सराफ आणि रंजना यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्याचे गीतकार व संगीतकार अनुक्रमे जगदीश खेबूडकर व विश्वनाथ मोरे आहेत. सुरेश वाडकर व उत्तरा केळकर यांनी हे गाणे गायले आहे. शाळा किंवा महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनातील ‘रेकॉर्ड डान्स’साठी आजही हे गाणे घेण्यात येते.

‘खेळताना रंग बाई होळीचा होळीचा, फाटला गं कोना माझ्या चोळीचा’ हे मराठीतील आणखी एक हिट होळी गीत. सुलोचना चव्हाण यांच्या खास ठसकेबाज आवाजातील हे गाणे यादवराव रोकडे यांनी लिहिले असून संगीत विठ्ठल शिंदे यांचे आहे.

आम्ही तरण्या गं पोरी

जमलो गावाबाहेरी

सख्याची आली स्वारी

उडवली ती पिचकारी

घातला गं घेरा त्यानं टोळीचा, टोळीचा

फाटला गं कोना माझ्या चोळीचा

अशा शब्दात या युवती आपल्या भावना व्यक्त करतात.

मराठीत ‘रंगपंचमी’ या नावाचा एक चित्रपटही काही वर्षांपूर्वी येऊन गेला. ‘महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मीकी’ म्हणून ज्यांचा उल्लेख होतो त्या ग. दि. माडगूळकर यांनी या चित्रपटासाठी गाणी लिहिली होती. आशा भोसले आणि विठ्ठल शिंदे यांनी गायलेले व राम कदम यांनी संगीतबद्ध केलेले ‘आले रे आले रंगवाले, रंग फेका रंग फेका रंग फेका रे रंगवा एकमेका’ तसेच आशा भोसले यांनी गायलेले ‘आली बाई पंचीम रंगाची’ ही रंगपंचमीविषयक दोन गाणी या चित्रपटात आहेत. ‘आली बाई पंचीम रंगाची’ या गाण्यात नायिका

संक्रांतीला भेटू ऐसी

केली होती बोली

पुनव फाल्गुन होऊन गेली

तेव्हा स्वारी आली

अशा या वायदेभंगाची

आली बाई पंचीम रंगाची

अशा शब्दात आपली नाराजी व्यक्त करते.

या शिवाय दादा कोंडके यांच्या ‘ह्य़ोच नवरा पाहिजे’ चित्रपटातील ‘होळीचं सोंग घेऊन लावू नको लाडी गोडी, रंग नको टाकू माझी भिजेल गोरी साडी’ तसेच ‘नेसते नेसते पैठणी चोळी गं आज होळी गं’, ‘आज होळीचा रंग लुटा रं, लुटा रं लुटा होळीचा रंग लुटा रं’ आदी गाणी तसेच ‘सामना’ चित्रपटातील जगदीश खेबूडकर यांनी लिहिलेले, भास्कर चंदावरकर यांनी संगीतबद्ध केलेले आणि उषा मंगेशकर यांनी गायलेले ‘सख्या चला बागामंदी रंग खेळू चला’ हे गाणेही लोकप्रिय आहे. मराठी चित्रपटांमधील होळी व रंगपंचमी गाण्यांचा हा प्रवास अलीकडच्या ‘लई भारी’ या चित्रपटातील ‘आला होळीचा सण लय भारी’ या गाण्यापर्यंत येऊन थांबतो.

लय लय लय भारी

मस्तीची पिचकारी

जोडीला गुल्लाल रे

भीड भाड सोडून

बेभान होऊन

िधगाना घालू या रे

ये भांगेच्या तारेत

रंगाच्या धारेत

राडा चल घालू या

आला होळीचा सण लई भारी

चल नाचू या

अशा शब्दात नायक आपल्या भावना व्यक्त करतो.