‘मराठी बाणा’ची पंधरा वर्षे

लावणी, जागरण आणि गोंधळ असे स्वरुप असलेला कार्यक्रम परदेशी लोकांना आवडला.

महाराष्ट्राच्या लोककला संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या अशोक हांडे यांच्या ‘मराठी बाणा’ या कार्यक्रमाचे आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या मुहूर्तावर रविवारी, ८ मार्चला दोन हजार प्रयोग पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर सलग पंधरा वर्षे रसिकांचे मनोरंजन करणाऱ्या ‘मराठी बाणा’ या कार्यक्रमाचा उलगडलेला जीवनप्रवास…

मलयगिरीचा चंदन गंधीत

धूप तुला दाविला

स्विकारावी पूजा आता

उठी उठी गोपाळा..

या भूपाळीने कार्यक्रमाचा पडदा उघडतो आणि संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, यांचे सूर आळवले जातात. लावणी, मुरळी, भारूड, जागरण, गोंधळ, द्वंद्वगीत, कोळीनृत्य, वारकरी दिंडी अशा एकेक लोककला सादर करत मराठी बाणा प्रेक्षकांच्या मनाची पकड घेतो. रंगमंचावरील तीर्थक्षेत्रे, देवळे, झाडे झुडपे यांच्या नेपथ्य आविष्कारामुळे महाराष्ट्राच्या लोककलेचे दर्शन घडते.  डमरू, झांज, हलगी, मृदूंग वाद्यांच्या तालावर प्रेक्षक दंग होऊन जातो. हे चित्र आहे ‘चौरंग’ निर्मित ‘मराठी बाणा ७० एमएम’  या कार्यक्रमाचे. एकीकडे महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोप पावली जात असतानाच या कार्यक्रमाला हाऊसफुलचा बोर्ड लागतो. सलग पंधरा वर्ष निव्वळ कलेच्या जोरावर प्रेक्षकांना नाटय़गृहात खेचण्याची किमया निर्माता दिग्दर्शक अशोक हांडे आणि त्यांच्या चमूने करून दाखवली आहे.

२००५ पासून सुरु झालेल्या या कार्यक्रमाला पंधरा वर्ष पूर्ण होत असून त्याचा दोन हजारावा प्रयोग रविवारी ८ मार्चला विलेपार्ले येथील दीनानाथ नाटय़गृहात होत आहे. ‘मराठी बाणा ७० एमएम’ असे शीर्षक असणाऱ्या या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या लोककला संस्कृतीचे दर्शन घडवले जाते. या कार्यक्रमाची सुरुवात मोठी रंजक आहे. अशोक हांडे यांचे ‘मंगल गाणी दंगल गाणी’, ‘आवाज की दुनिया’, ‘गाने सुहाने’, ‘आजादी पचास’, ‘माणिक मोती’ हे कार्यक्रम सुरु होते. त्यावेळेस रत्नागिरीला एकदा परदेशी लोकांसाठी मराठी संस्कृतीचे दर्शन घडवणारा कार्यक्रम सादर केला. लावणी, जागरण आणि गोंधळ असे स्वरुप असलेला कार्यक्रम परदेशी लोकांना आवडला. पुढे प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे हाच कार्यक्रम अनेक ठिकाणी सादर केला. अशा तऱ्हेने मराठी बाणा कार्यक्रमाचा जन्म झाल्याचे हांडे यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे कर्ता धर्ता अशोक हांडे हे यांचा पिंडही कलाकाराचाच. यावेळेस त्यांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.‘जुन्नरजवळील उंबरज हे माझे मूळ गाव, घरात वारकरी सांप्रदायाची परंपरा असल्याने माझ्यावर नकळतच लोककलेचे संस्कार होत गेले. गावावरून मुंबई येथे आल्यावर रंगारी बदक चाळ येथे माझे बालपण गेले. त्या काळी कामगार वस्तीत अमर शेखांची शाहिरी, लावण्या, भाषणे यातून होणारे समाजप्रबोधनाने मला खूप काही शिकवले. अशा रितीने माझ्यातील कलाकाराची जडणघडण झाली,’ असे अशोक हांडे सांगतात.

लाईव्ह संगीत हा कार्यक्रमाचा मुख्य आत्मा असल्याचे हांडे सांगतात. ‘प्रत्येक कार्यक्रमात काही वेगळे देण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळेच गेले १५ वर्षे या कार्यक्रमाची वाटचाल यशस्वीतेने सुरु आहे. याचे श्रेय ते सहकारी, कुटुंबाला आणि चोख व्यवस्थापनास देतात. हे टीमवर्क असून मला सहकाऱ्यांचीही उत्तम साथ लाभली असल्याचे नमूद करतात. कार्यक्रमाचे संगीत महेश खानोलकर तर नृत्य दिग्दर्शन सुभाष नकाशे आणि ग्रीष्मा अय्यर करतात. पूर्वी ज्येष्ठ नृत्यदिग्दर्शक सुबल सरकार नृत्य दिग्दर्शन करत होते. याचबरोबर दिलीप बनोटे ध्वनी संयोजनाची आणि सुनील जाधव प्रकाशयोजनेची जबाबदारी सांभाळतात.

आज त्यांच्याकडे १२५ ते १३० कलाकार कार्यरत आहेत. आतापर्यंत वाहतूक कोंडीमुळे अथवा पाऊस पाण्यामुळे एकदाही कार्यक्रमास उशिरा झाला नाही. व्यवस्थापन चोख असल्याने सगळे कार्यक्रम वेळेत पार पडले आहेत.अशोक हांडे यांना कुटुंबाची भक्कम साथ मिळाली आहे.  पत्नी रंजना कार्यक्रमाची आर्थिक बाजू सांभाळते. आज हांडे कुटुंबाची दुसरी पिढी या कार्यक्रमाची धुरा समर्थपणे पार पाडते आहे. मुलगा सुजय हांडे जाहिरात क्षेत्रात असून कार्यक्रमाची निर्मिती, समन्वय, नियोजनाची जबाबदारी सांभाळतो. तसेच नातवालाही गाण्याची आवड असल्याचे हांडे सांगतात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Marathi bana programme 2000 episode on world womens day zws